विश्लेषण: ऑस्ट्रेलियाने चलनी नोटांवरून महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र का हटविले? | australia decide to remove queen elizabeth photo from currency | Loksatta

विश्लेषण: ऑस्ट्रेलियाने चलनी नोटांवरून महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र का हटविले?

ब्रिटिश राजगादीवर विराजमान झालेले राजे चार्ल्स तृतीय यांचे छायाचित्र छापले जाणार नसून त्याऐवजी ऑस्ट्रेलियन संस्कृतीचे प्रतीक असलेले चिन्ह छापण्यात येणार आहे.

australia currency queen elizabeth
ऑस्ट्रेलियाने चलनी नोटांवरून महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र का हटविले? (फोटो – रॉयटर्स)

संदीप नलावडे

ऑस्ट्रेलियाच्या पाच डॉलरच्या नोटेवर आतापर्यंत ब्रिटिश सम्राज्ञी एलिझाबेथ यांचे छायाचित्र होते. मात्र आता हे छायाचित्र हटविण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया देशाच्या रिझर्व्ह बँकेने पाच डाॅलरच्या नोटेवर ब्रिटिश राजेशाहीची प्रतीके काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्याने त्यांच्याऐवजी ब्रिटिश राजगादीवर विराजमान झालेले राजे चार्ल्स तृतीय यांचे छायाचित्र छापले जाणार नसून त्याऐवजी ऑस्ट्रेलियन संस्कृतीचे प्रतीक असलेले चिन्ह छापण्यात येणार आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या बँकेने काय निर्णय घेतला?

रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलिया (आरबीए) ही ऑस्ट्रेलियातील शीर्ष बँक असून या बँकेने गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या पाच डॉलरच्या नोटेवरून ब्रिटिश राजसत्तेचे चिन्ह हटविण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या पाच डॉलरच्या नोटेवर ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र छापण्यात येते. मात्र पाच महिन्यांपूर्वी महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्याने रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने नोटेवरून राणी एलिझाबेथ यांचे चिन्ह हटविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची या निर्णयाला संमती आहे, असे ‘आरबीए’कडून सांगण्यात आले. 

ब्रिटिश राजेशाहीऐवजी नव्या नोटेवर काय दाखविले जाणार?

ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र काढून टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी ब्रिटिश राजगादीवर विराजमान झालेले राजे चार्ल्स यांचे छायाचित्र मात्र छापण्यात येणार नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व्ह बँकेने सांगितले. सप्टेंबर २०२२ मध्येच रिझर्व्ह बँकेने हे स्पष्ट केले होते. पाच डॉरलच्या नोटेवर स्वदेशी प्रतीके छापण्यात येणार आहे, जी ऑस्ट्रेलियाची संस्कृती आणि राष्ट्रभाव दर्शविणार आहेत. ऑस्ट्रेलियाची संस्कृती विशेषतः तेथील मूलनिवासींचा इतिहास दाखवणारी प्रतीके आणि इतिहास नव्या नोटेवर असणार आहे. नोटेच्या एका बाजूला ऑस्ट्रेलियाची संसद दाखविली जाणार आहे. या नव्या चलनी नोटेची रचना स्वदेशी समूह करणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. 

विश्लेषण : कर्नाटकच्या सेक्स सीडीचं प्रकरण पुन्हा का चर्चेत आलं आहे?

ऑस्ट्रेलियाच्या चलनी नोटांवर ब्रिटिश महाराणीचे छायाचित्र छापण्याचे कारण…

ब्रिटिश राजघराण्याचा प्रमुख हा ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंडसह १५ राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) देशांचा राष्ट्रप्रमुख मानला जातो. मात्र आजकाल ती भूमिका मोठ्या प्रमाणात प्रतीकात्मक आहे. बँक ऑफ इंग्लंडने १९६० मध्ये प्रथमच एक पौंडाच्या चलनी नोटेवर महाराणी एलिझाबेथ छापण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही राष्ट्रकुल देशांनीही आपल्या चलनी नोटांवर ब्रिटिश महाराणीचे छायाचित्र छापले. ऑस्ट्रेलियाच्या पाच डॉलर आणि एक डॉलरच्या नोटेवर महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र छापण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या चलनी नोटेवर महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र छापण्याचा निर्णय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा होता, असे ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आता आमच्या चलनी नोटा बदलण्यात येणार असून आमच्या देशाची प्रतीकेच या नोटांवर छापणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ऑस्ट्रेलियन सरकारची भूमिका काय?

ऑस्ट्रेलिया हा देश पूर्णपणे प्रजासत्ताक नसून ब्रिटिश राजघराण्याच्या प्रतीकात्मक आधिपत्याखाली आहे. ब्रिटिश राजे चार्ल्स तृतीय आता ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रप्रमुख आहेत. मात्र सध्या ऑस्ट्रेलियात सत्तास्थानी डाव्या विचारसरणीकडे झुकलेले मजूर पक्षाचे सरकार आहे. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेत आवश्यक बदल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सार्वमतासाठी हे सरकार दबाव टाकत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा नोटांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दीड वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्यांच्या राष्ट्रगीतातही बदल केला होता. हा देश ‘तरुण आणि मुक्त’ असल्याचा संदर्भ काढून टाकण्यात आला होता. ऑस्ट्रेलियातील नागरिक हे जगातील जुन्या संस्कृतीचे भाग आहेत, हे दर्शविण्यासाठी हा बदल करण्यात आला होता. ब्रिटिश वसाहतीचा पूर्वी भाग असलेल्या अनेक देशांनी प्रजासत्ताक स्वीकारले. ऑस्ट्रेलियाही ब्रिटनशी आपले संवैधानिक संबंध किती प्रमाणात टिकवून ठेवायचे यावर चर्चा करत आहे.  

विश्लेषण : अदानी एंटरप्रायझेसने ‘एफपीओ’ का गुंडाळला?

कोणत्या देशांच्या चलनी नोटांवर राणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र?

इंग्लंडसह ब्रिटिश वसाहती असलेल्या अनेक देशांच्या चलनी नोटांवर राणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलया, न्यूझीलंड आणि मध्य अमेरिकेतील बेलिज या कॅरेबियन देशाच्या चलनी नोटांवर राणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र आहे. एकाच वेळी किमान ३३ भिन्न चलनांवर राणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र असून याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही नोंद केली आहे. अँटिग्वा आणि बार्बुडा, डॉमिनिका, ग्रेनाडा, मॉन्टसेराट, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया आणि सेंट व्हिन्सेंट या लहान कॅरेबियन देशांसाठी असलेल्या ‘ईस्टर्न कॅरेबियन सेंट्रल बँके’ने जारी केलेल्या नोटा आणि नाण्यांवरही महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र आहे. अनेक देशांनी त्यांच्या चलनी नोटांवर महाराणीचे छायाचित्र छापणे आधीच बंद केले आहे.

१९६२ मध्ये जमैकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यांनतर त्यांच्या मध्यवर्ती बँकेने चलनी नोटांवर महाराणी एलिझाबेथ यांच्याऐवजी मार्कस गार्वे यासारख्या राष्ट्रीय नायकाला स्थान दिले. सेशेल्समधील नोटांवर आता राणीऐवजी स्थानिक वन्यजीव आहेत. त्रिनिदाद आणि टोबॅगो हे प्रजासत्ताक झाल्यावर त्यांनीही नोटांमध्ये बदल केले. १९९७ मध्ये ब्रिटनने हाँगकाँग ही आपली वसाहत चीनला दिल्यानंतर त्यांच्या नोटांवर चिनी ड्रॅगन आणि गगनचुंबी इमारतींना स्थान देण्यात आले. ब्रिटनमधील चलनी नोटांवर राणी एलिझाबेथ यांच्या ऐवजी आता राजे चार्ल्स तृतीय यांचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेतला असला तरी यास वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येते. कॅनडा, न्यूझीलंड या देशांनी तात्काळ चलनी नोटांमध्ये बदल करणार नसल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 10:08 IST
Next Story
विश्लेषण: शुभमन गिल भारतीय फलंदाजीचा तारणहार ठरणार का?