ऑस्ट्रेलियामध्ये नवा इतिहास घडत आहे. लेफ्टनंट जनरल सुझान कॉयल यांच्या रूपाने त्या देशाला प्रथमच महिला लष्करप्रमुख मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी अलीकडेच एका निवेदनाद्वारे ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. “जुलै महिन्यापासून, ऑस्ट्रेलियन लष्कराच्या १२५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आपल्याला लष्करप्रमुखपदी एक महिला पाहायला मिळेल,” असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या लष्करात अधिकाधिक महिला अधिकाऱ्यांची भरती करण्याचा प्रयत्न सुरू असताना कॉयल यांची नियुक्ती जाहीर झाली. त्या येत्या जुलैमध्ये ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाच्या (एडीएफ) लष्करप्रमुख होतील. जुलै २०२२पासून लष्करप्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट जुलैमध्ये निवृत्त होत आहेत, लेफ्टनंट जनरल कॉयल त्यांची जागा घेतील.

कारकीर्दीची सुरुवात

लेफ्टनंट जनरल सुझान कॉयल यांना तीन दशकांचा लष्करी सेवेचा अनुभव असून त्यांनी अनेक वरिष्ठ कमांड पदे भूषवली आहेत. लेफ्टनंट जनरल कॉयल यांचा लष्करी प्रवास १९८७मध्ये सुरू झाला, त्यावेळी त्या आर्मी रिझर्व्हमध्ये भरती झाल्या. नंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन डिफेन्स फोर्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि १९९२ मध्ये रॉयल मिलिटरी कॉलेजमधून पदवी प्राप्त करून रॉयल ऑस्ट्रेलियन कोअर ऑफ सिग्नल्समध्ये रुजू झाल्या.

नेत्रदीपक कामगिरी

५५ वर्षीय लेफ्टनंट जनरल कॉयल या एडीएफच्या अवकाश आणि सायबर विभागाच्या तसेच ‘नॅशनल सपोर्ट ऑफ डिफेन्स’च्या प्रमुख आहेत. त्या जुलै २०२४ पासून चीफ ऑफ जॉइंट कॅपॅबिलिटीज या पदावर कार्यरत आहेत. ऑस्ट्रेलियन डिफेन्स फोर्स अकादमीमधून विज्ञान पदवी मिळवण्यापूर्वी, त्या १९८७ मध्ये आर्मी रिझर्व्हमध्ये सैनिक म्हणून दाखल झाल्या. त्यांनी १९९२मध्ये रॉयल मिलिटरी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली, त्यानंतर त्या रॉयल ऑस्ट्रेलियन कोअर ऑफ सिग्नल्समध्ये रुजू झाल्या.

यापूर्वी त्यांची इन्फॉर्मेशन वॉरफेअर हेड, फोर्सेस कमांड कमांडर, जॉइंट टास्क फोर्स कमांडर, ब्रिगेड कमांडर, अफगाणिस्तान टास्क ग्रुप कमांडर आणि १७ व्या सिग्नल रेजिमेंटच्या कमांडिंग ऑफिसर या पदांवर नियुक्ती झाली आहे. आपल्या कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल कॉयल यांनी सोलोमन बेटे, पूर्व तिमूर, अफगाणिस्तान आणि पश्चिम आशियामध्ये सेवा बजावली.

ऑस्ट्रेलियासाठी ‘ऐतिहासिक’ क्षण

ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या १२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची लष्करप्रमुखपदावर नियुक्ती झाली. सुझान कॉयल या ऑस्ट्रेलियन लष्कराच्या कोणत्याही सेवा शाखेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला असतील. संरक्षणतज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलियाने लेफ्टनंट जनरल सुझान यांची नियुक्ती करून युद्धात आधुनिक तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व आणि समुद्राखालील क्षमतांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देत असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या, ऑस्ट्रेलियन संरक्षण दलात महिलांचे प्रमाण सुमारे २१ टक्के आहे आणि वरिष्ठ नेतृत्व पदांवर त्यांचे प्रमाण १८.५ टक्के आहे. २०३०पर्यंत महिलांचे एकूण प्रमाण २५ टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे.

परिवर्तनाच्या वाटेवर

ऑस्ट्रेलियाचे संरक्षण दल एका मोठ्या परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात असताना लेफ्टनंट जनरल कॉयल पदभार स्वीकारणार आहेत. ‘द इव्हनिंग स्टँडर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, बदलत्या प्रादेशिक सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर युद्धसज्जता वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे सैन्य लांब पल्ल्यावर हल्ले करण्याची यंत्रणा, ड्रोन आणि प्रगत तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहे.

त्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या सशस्त्र दलांवर महिला सैनिकांना दुय्यम वागणूक दिल्याची टीका होत आहे. ऑक्टोबर २०२५मध्ये एडीफवर एक सामूहिक खटला दाखल करण्यात आला. त्यामध्ये हजारो महिला अधिकाऱ्यांना पद्धतशीर लैंगिक अत्याचार, छळ आणि भेदभावापासून संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यादृष्टीनेही लेफ्टनंट जनरल सुझान कॉयल यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

कोणत्या देशांमध्ये महिला लष्करप्रमुख?

कॅनडा, स्लोव्हेनिया, ब्रिटन या देशांमध्ये लष्करप्रमुख किंवा लष्कर उपप्रमुख या पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कॅनडाने जुलै २०२४ मध्ये लेफ्टनंट जनरल जेनी कॅरिग्नन यांची संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ) म्हणून नियुक्ती केली. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. कॅनडावर आपला संरक्षण खर्च वाढवण्यासाठी दबाव असताना लेफ्टनंट जनरल जेनी कॅरिग्नन यांना ही पदोन्नती मिळाली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये स्लोव्हेनियाने मेजर जनरल अलेन्का एर्मेन्क यांची स्लोव्हेनियन सशस्त्र दलांच्या प्रमुख (चीफ ऑफ द जनरल स्टाफ) म्हणून निवड करून इतिहास रचला होता.

त्या नाटो सदस्य राष्ट्रांच्या लष्कराचे नेतृत्व करणाऱ्याही पहिल्या महिला ठरल्या. मेजर जनरल ॲलन गेडर यांना नाटो चाचण्यांदरम्यान स्लोव्हेनियाच्या सशस्त्र दलाच्या खराब कामगिरीमुळे पदावरून दूर करण्यात आले होते, त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल जेनी कॅरिग्नन यांची नियुक्ती करण्यात आली. जून २०२४मध्ये, ब्रिटिश जनरल डेम शारो नेस्मिथ यांची व्हाइस-चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ (संरक्षण दलाच्या उपप्रमुख) या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वोच्च पदावर नियुक्ती होणाऱ्या आणि जनरल पद प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

nima.patil@expressindia.com