इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अंत्यविधी आता पार पडणार आहे, यासाठी लाखो लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पण, एक सवाल सध्या चर्चेत आहे तो म्हणजे अयातुल्ला अली खामेनींचे पुत्र मोजताबा खामेनी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार का? इराणच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ४ जुलैपासून ते ९ जुलै अशा सहा दिवसांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, ज्याची सांगता खामेनी यांचे जन्मस्थान असलेल्या ईशान्येकडील मशहद शहरात होणार आहे. खामेनी यांच्या दफनविधीने (सुपूर्द ए खाक) कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्याच्या एक दिवसआधी, नजफ आणि कर्बला या पवित्र शहरांमधून खामेनींची अंत्ययात्रा काढली जाणार आहे. इराणच्या प्रादेशिक प्रभावाचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
इराणच्या माजी सर्वोच्च नेत्याच्या अंत्यविधीला जगभरातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे शहबाज शरीफ तसेच चीन, अफगाणिस्तान आणि भारतातून महत्त्वाचे नेते दाखल होणार आहेत. शिवाय लाखो इराणी नागरिकही सोहळ्यात सहभागी होतील. पण, खामेनींच्या अंत्यविधीला त्यांचे पूत्र उपस्थित राहणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे.
पत्नीच्या अंत्यविधीलाही अनुपस्थित
अमेरिका आणि इराणमधील सुरू झालेल्या युद्धात फेब्रुवारीमध्ये अली खामेनी यांच्या घरावर जोरदार हल्ले करण्यात आले. यामध्ये मोजताबा खामेनी यांच्या पत्नी झहरा हदाद-आदेल यांचाही दुर्दैवी मृ्त्यू झाला. १ जुलैला झहरा आदेल यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तेहरानमधील फरहांग हायस्कूलमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले, तिथे त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना शिकवले होते. त्या विधीसाठी त्यांचे वडील, तसेच कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि शिक्षक उपस्थित होते. मात्र, त्यांचे पती खुद्द मोजताबा खामेनी उपस्थित राहिले नाहीत.
अयातुल्ला अली खामेनींच्या अंत्यविधीलाही मुकणार?
पत्नीच्या अंत्यविधीनंतर आता मोजताबा खामेनी स्वत:च्या वडिलांच्या अंत्यविधीलाही मुकणार आहेत. इराणने अंत्यविधीसाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तेहरानचे कार्यवाहक महापौर अलीरेझा झकानी यांनी असे सांगितले की, माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासाठी होणारा हा सोहळा ‘राजधानीच्या इतिहासातील सर्वात मोठा मेळावा’ असणार आहे, त्यामुळे लाखो लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. तेहरानमधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मोजताबा त्यांच्या वडिलांच्या अंतिम संस्कारांना उपस्थित राहणार नाहीत, कारण सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
खामेनी यांचे भारतातील प्रतिनिधी अयातुल्ला हकीम इलाही यांनी इंडिया टुडेला सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यांनी असेही नमूद केले की, ‘मी गेल्या आठवड्यात इराणमध्ये होतो आणि माझ्या काही मित्रांना भेटलो, जे मोजताबा खामेनींना भेटले होते. त्यांनी सांगितलं की, मोजताबा यांना बाहेर यायचे आहे, लोकांना भेटायचे आहे, पण सुरक्षा व्यवस्था त्यांना परवानगी देत नाही,’ असे इलाही म्हणाले. तसेच ‘हे खूप धोकादायक आहे आणि आम्ही त्यांना सुरक्षा पुरवू शकत नाही.’ मला वाटते की ते बाहेर येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने अजूनही स्थिती धोकादायक आहे. अमेरिका आणि इस्रायल या प्रसंगाचा वापर मोजताबा खामेनी यांना लक्ष्य करण्यासाठी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावाही अयातुल्ला हकीम इलाही यांनी केला.
मोजताबा खामेनी अजूनही नजरेआड
फेब्रुवारीमध्ये वडिलांच्या निधनानंतर सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे स्वीकारली, पण तेव्हापासून मोजताबा अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. त्यांनी केवळ लेखी निवेदनांद्वारेच जनतेशी संवाद साधला आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी आणि नेतृत्व करण्याच्या क्षमतेविषयी जनमानसात प्रश्न निर्माण होत आहेत.
याबद्दल खासदार सालार वेलायत मदार यांनी इराण वायरला स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘नजफ, कोम आणि मशहद येथील विद्वानांचे मत आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार, सध्या मोजताबा यांची कोणतीही नवीन चित्रे किंवा कलाकृती प्रकाशित केली जात नाहीत. कारण शत्रू विशिष्ट माध्यमांतून आणि तेल अवीव युनिव्हर्सिटी ऑफ ऑकल्ट सायन्सेससारख्या विद्यापीठांमध्ये मोजताबा यांना लक्ष्य करण्याची चर्चा सुरू आहे. यामधील गूढ शस्त्रांच्या माध्यमातून त्यांना हानी पोहोचवण्याची शक्यता आहे.
खामेनी यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम कसा?
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्काराची जोरदार तयारी सुरू आहे. हा सोहळा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अंत्यविधींपैकी एक मानला जात आहे.
सहा दिवस चालणारे हे अंत्यविधी इराणसह शेजारील इराकमधील एकूण पाच शहरांमध्ये पार पडणार आहेत. शनिवारी या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्या दिवशी खामेनी यांचे पार्थिव तेहरानमधील ग्रँड मसल्ला प्रार्थना संकुलात नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्काराचे कार्यक्रम सोमवारपर्यंत सुरू राहणार आहेत. या काळात तेहरानच्या प्रमुख रस्त्यांवरून अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यानंतर ७ जुलै रोजी पवित्र शहर कोम येथे धार्मिक विधी पार पडतील. पुढे इराकमधील नजफ आणि कर्बला या पवित्र शहरांमध्येही अंत्यविधीचे पुढील टप्पे पार पडणार आहेत.
यानंतर ९ जुलै रोजी खामेनी यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मशहद येथे आणले जाणार आहे. तेथे शासकीय इतमामात त्यांच्यावर दफनविधी (सुपूर्द ए खाक) करण्यात येणार आहे.
