अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टने दोन महत्त्वाच्या पदांवरील तसेच प्रभावी व्यक्तींचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीत अपहाराचा आरोप झाल्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला. २०२० मध्ये राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन केल्यानंतर एक सर्वात मोठा बदल करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. त्यानुसार राम मंदिर ट्रस्टकडून मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओची नियुक्ती केली जाणार आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र असे अधिकृत नाव असलेली राम मंदिर ट्रस्ट नेमकं काय आहे? तिला कोण चालवतं? तिच्यावर कोणाचे नियंत्रण आहे? आणि भारतातील इतर मंदिरांपेक्षा या ट्रस्टची कार्यपद्धती वेगळी का आहे?
राम मंदिर ट्रस्ट अस्तित्वात कशी आली?
अयोध्या राम मंदिर प्रकरणात नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तीन महिन्यांच्या आत सरकारने एका योजनेअंतर्गत ट्रस्ट स्थापन करावी व त्या ट्रस्टकडे वादग्रस्त जमीन हस्तांतरित करावी, असे निर्देश कोर्टाने त्यावेळी दिले. अयोध्या कायदा, १९९३ नुसार केंद्र सरकारने ५ फेब्रुवारी २०२० रोजी एक राम मंदिर ट्रस्ट स्थापन केली. तसेच संपादित केलेली जमीन एका राजपत्राद्वारे ट्रस्टच्या नावावर केली.
राज्य सरकारने मंजूर केलेल्या कायद्यानुसार तिरूपती, जगन्नाथ, वैष्णोदेवी व काशी विश्वनाथ मंदिराचे व्यवस्थापन होते. परंतु, राम मंदिराबाबत परिस्थिती वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा २०१९ चा निकाल, अयोध्या येथील विशिष्ट क्षेत्राचे संपादन अधिनियम, १९९३, केंद्र सरकारची योजना आणि सुचना आणि ट्रस्टचा करारनामा (ट्रस्ट डीड) यांनुसार राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट ही एखादी खासगी धार्मिक ट्रस्ट नाही, तसेच एखाद्या कायद्यानुसार स्थापित झालेली मंदिर समितीही नाही. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट ही इतरांपेक्षा वेगळी ठरते. ही एक सार्वजनिक धार्मिक ट्रस्ट आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून ही ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे.
राम मंदिर ट्रस्ट कोण चालवतं?
१५ विश्वस्त असलेल्या राम मंदिर ट्रस्टला मंदिराबाबत निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. महंत नृत्य गोपाल दास हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वय व खालावलेल्या प्रकृतीमुळे मंदिराच्या दैनंदिन कामात ते लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या कामाची जबाबदारी त्यांच्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस असलेल्या चंपत राय यांच्यावर होती. चंपत राय हे राम मंदिर ट्रस्टचे एक प्रमुख चेहरा होते. देणगीतील अपहारानंतर त्यांनी राजीनामा दिला. तो ट्रस्टने स्वीकारला आहे.

ट्रस्ट डीडनुसार ट्रस्टमध्ये कायमस्वरूपी विश्वस्त, नामनिर्देशित विश्वस्त आणि माजी सरकारी अधिकारी यांचा समावेश असेल, असे नमूद करण्यात आले आहे. धार्मिक प्रमुख व्यक्ती, केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार यांना ट्रस्टमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून ही तरतूद करण्यात आली. राम मंदिराचे बांधकाम एका वेगळ्या समितीच्या देखरेखीत झाले. त्या समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा होते. नृपेंद्र मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य सचिव आहेत.
ट्रस्टमध्ये वरिष्ठ वकील के. परासरन, केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे आणि उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी म्हणून आयएएस अधिकारी संजय प्रसाद आणि शशांक त्रिपाठी यांचा समावेश आहे. ट्रस्ट मधील इतर विश्वस्त हे हिंदू समाजातील महत्त्वाचे व्यक्ती असून त्यांनी राम जन्मभूमि आंदोलनात सहभाग नोंदवला होता. राम मंदिराचे प्रशासन मुख्यत: ट्रस्टचे विश्वस्तांकडूनच चालवले जाते.
सीईओची नियुक्ती का केली जाणार?
राम मंदिराचे प्रशासन सांभाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय राम मंदिर ट्रस्टने घेतला आहे. २०२० मध्ये ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर राम मंदिर व्यवस्थापनात होणारा हा सर्वात मोठा प्रशासनिक बदल आहे. राम मंदिराच्या सध्याच्या व्यवस्थापनानुसार, राम मंदिराशी संबंधित महत्त्वाचे निर्णय विश्वस्त घेतात. राम मंदिराचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सीईओची नियुक्ती केली जाणार आहे.
भारतातील अनेक जुन्या व महत्त्वाच्या मंदिरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सीईओंकडे सोपवण्यात आली आहे. तिरूमला तिरूपती देवस्थानमचा कारभार एका आयएएस असलेल्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या देखरेखीत चालतो. वैष्णोदेवी मंदिराचे व्यवस्थापन सीईओच्या, जगन्नाथ मंदिराचे व्यवस्थापन मुख्य प्रशासकाच्या आणि काशी विश्वनाथ मंदिराचे व्यवस्थापन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीत चालते. राम मंदिर देणगीत अपहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर सीईओची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंदिराच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणि एक कार्यक्षम व्यवस्थापन प्रणाली राबवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
अयोध्येतील दानपेटी उघडण्याची व्यवस्था कशी आहे?
अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून दान स्वीकारण्यासाठी ३५ हुंडी आहेत. या हुंडी नेमण्यात आलेल्या एका अधिकृत व्यक्तीकडून, तसेच ट्रस्ट अधिकारी व एसबीआय बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडल्या जातात. त्यानंतर त्यातील दान मंदिराच्या मोजणी केंद्रात (काउंटिंग हॉल) नेले जाते. दानाची मोजणी करण्याचे काम ट्रस्टचे कर्मचारी व एसबीआयचे कर्मचारी करतात. निवृत्त झालेले बँक अधिकारी सुभाष श्रीवास्तव यांच्या देखरेखीत पैशांची व दागिन्यांची मोजणी केली जाते. दरम्यान, संपूर्ण दान प्रक्रिया सुरळीत चालावी याची जबाबदारी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. मोजणी झाल्यानंतर सगळे दान ट्रस्टच्या एसबीआय बँकेतील खात्यात जमा केले जाते.
