Monsoon Ayurveda Health Tips to understand Vat Prakop: आधुनिक हवामानशास्त्रानुसार भारतात पाऊस आणणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटले जाते. परंतु, प्राचीन सुश्रुतसंहिता आणि आयुर्वेदानुसार या पश्चिमेकडील वाऱ्यांना ‘वारुण वारे’ असे संबोधले गेले आहे. निसर्गातील या बदलांचा थेट परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पावसाळ्यातील थंड आणि ओलसर वातावरणामुळे शरीरात वाताचा प्रकोप कसा होतो आणि आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वारूण वारे
वर्षा ऋतुमध्ये पश्चिमेकडून येणारे वारे वाहतात याचा उल्लेख राजनिघण्टु या ग्रंथामध्येही आढळतो. पाणी म्हणजेच वरुण देवतेला आणणारे या अर्थाने या वार्यांना आयुर्वेदाने ’वारुण वारे’ असे संबोधले आहे. वरुण देवता ही पश्चिम दिशेची अधिष्ठाती देवता आहे.
दिशा, वारा आणि त्याचे गुण- दोष
साहजिकच या ऋतूमध्ये पश्चिम दिशेचे म्हणजे वरुण देवतेचे वारे वाहू लागतात अशी मान्यता आहे. जोवर हे वारे ढगांना वाहून आणत नाहीत तोवर काही पाऊस येत नाही. निसर्गचक्रामध्ये आणि आपल्या आयुष्यातसुद्धा वार्यांचे किती महत्त्व आहे, हे इथे अधोरेखित होते. मात्र या प्रत्येक दिशेच्या वार्यांचेही स्वतःचे असे गुणदोष असतात, ज्यांचा आरोग्यावर बरा-वाईट परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेद शास्त्राने या वार्यांचा आरोग्यावर होणारा परिणामसुद्धा अभ्यासला. आपल्याकडे पाऊस घेऊन येणार्या या पश्चिम दिशेच्या वार्यांचे जे गुणदोष आहेत, ते पुढीलप्रमाणे-
म्हणून शरीरात वात वाढतो
पश्चिम दिशेकडून वाहून येणारे वारे हे अतिशय सूक्ष्म, रुक्ष (कोरडे) व खर (खरखरीत) असतात. ज्यामुळे ते शरीरामध्ये सूक्ष्मता, कोरडेपणा व खरखरीतपणा वाढवतात. हेच गुण वाताचे सुद्धा असल्याने या वार्यांनी शरीरामध्ये वात वाढतो. दुसरीकडे ते अतिशय तीक्ष्ण असल्याने रक्त व पित्त सुद्धा वाढवतात. एकंदरच या वार्यांमध्ये शोषक गुण आहे. त्यामुळेच शरीरामधील पाणी शोषण्याचा गुण त्यांच्यात असतो, जो मेद व चरबी घटवण्याचे व कफनाशनाचे कार्य करतो.

बल घटवणारे वारे
साहजिकच कफामुळे अर्थात शरीरामध्ये पाणी जमल्याने येणार्या सुजेमध्ये हे वारे उपकारक असतात आणि जखमांमधील द्रव शोषून जखमा भरण्यासही साहाय्यक होतात. हाच शोषक गुण शरीराला आवश्यक असणारा स्नेह व ओलावा शरीरामधून शोषत असल्याने हे पश्चिमेचे वारे शरीराचे बल कमी करुन शरीराला सुकवतात व क्षयाला कारणीभूत होऊ शकतात. त्याचमुळे या वार्यांना आयुर्वेदाने बल घटवणारे म्हटले आहे. (आयुर्वेदाने हजारो वर्षे निसर्गाचे निरिक्षण करून सांगितलेल्या या विचारांमागील अर्थ समजून घेऊन त्यांचा वैज्ञानिक अभ्यास व्हायला हवा.)
पावसाळ्यातील वातप्रकोप
ग्रीष्मातल्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा सूर्याच्या प्रखर किरणांमुळे शरीरामधील स्नेह (तेला-तुपाचा म्हणजेच चरबीचा अंश) कमी होत जातो आणि रुक्षता (कोरडेपणा) वाढत जातो, तेव्हा कोरड्या गुणांचा वात वाढतो. उन्हाळ्यातल्या रुक्ष (कोरड्या) वातावरणामुळे, कोरड्या वातावरणाला त्याच गुणांच्या (कोरडेपणा वाढवणार्या) कोरड्या व थंड आहाराची जोड मिळाल्यामुळे आणि रात्री जागरण,अति व्यायाम, अति परिश्रम, अति चालणे, अति समागम (मैथुन) यांसारख्या जीवनशैलीमधील वात वाढवणार्या चुकांमुळे ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात वात वाढतो व शरीरात जमत जातो; हा झाला वात-संचय.
उन्हाळ्यात वातप्रकोप का होत नाही?
उन्हाळ्यात वात वाढत असूनही त्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप का होत नाही? त्याचे कारण म्हणजे उन्हाळ्यातली उष्णता. वातावरणातील उष्णतेमुळे शीत गुणांचा वात वाढत नाही आणि वाढला तरी तो इतका वाढत नाही की उसळून (प्रकुपित होऊन) रोगकारक होईल. मात्र पावसाळा सुरू होऊन वातावरणात थंडावा वाढला की, पावसाळ्यातील थंड-ओलसर वातावरण शरीरात आधीपासून जमलेल्या मुळात थंड गुणाच्या असलेल्या वाताचा प्रकोप व्हायला कारणीभूत होते. पावसाळ्यातला हा वातप्रकोप विविध वातविकारांना कारणीभूत होतो. त्यामुळे आपण जर उन्हाळ्यामध्येच आहारविहार सांभाळला आणि वातसंचय तितक्या तीव्रतेने होऊ दिला नाही तर पावसाळ्यात होणारा वातप्रकोप तेवढ्या तीव्रतेने होणार नाही.
वातप्रकोप म्हणजे काय?
वाताच्या गुण व कार्यामध्ये होणारी विकृतीस्वरुप वाढ म्हणजे ‘वातप्रकोप’. मुळात वात हा शीत (थंड), रुक्ष (कोरडा), चल (सतत हलणारा-गतिमान), लघू (हलका), सूक्ष्म (स्वरुपाने सूक्ष्म व न दिसणारी अशी सूक्ष्म कार्ये करणारा), अमूर्त (दृश्य स्वरूप नसलेला), खर (खरखरीत), विशद (स्वच्छता करून बुळबुळीतपणा कमी करणारा), दारूण(कठीणता निर्माण करणारा) अशा गुणधर्मांचा आहे. या वात-गुणांमध्ये होणारी वाढ म्हणजे वातप्रकोप. शरीराच्या विविध पेशींमध्ये, अवयवांमध्ये (त्यांच्या रचनेमध्ये व क्रियांमध्येसुद्धा) जेव्हा वर दिलेले वाताचे थंडावा, कोरडेपणा,हलकेपणा,खरखरीतपणा वगैरे गुण (खरं तर दोष) वाढतात, तेव्हा त्या-त्या शरीर-पेशींमध्ये,अवयवांमध्ये वात वाढलेला असतो.
थंड व ओलसर वातावरणामुळे वातप्रकोप
ऋतुचक्राचा विचार केल्यास पावसाळ्यात निसर्गामध्ये होणारे विविध बदल हे जसे सृष्टीमध्ये उलथापालथ घडवतात, तसेच बदल शरीरामध्येही होतात.ज्यामध्ये प्रामुख्याने वाताच्या या गुणधर्मांमध्ये वाढ होते, ज्याला आयुर्वेद ‘वातप्रकोप’ म्हणतो. हा वातप्रकोप ग्रीष्म ऋतूनंतर (उन्हाळ्यानंतर) येणार्या वर्षा ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये होतो, जो त्या ऋतूमधील निसर्गबदलाच्या व हवामानाच्या परिणामी होतो. पावसाळ्यातले थंड, ओलसर वातावरण वाताचा प्रकोप व्हायला कारणीभूत होते. पावसाळ्यानंतरच्या गरम वातावरणाच्या शरद ऋतुमध्ये तो वातप्रकोप आपसूक कमीसुद्धा जातो.
वाताचा संबंध अन्न आणि दिनचर्याच वाताच्या मूळाशी
अन्यथाही मानवी चुकांमुळे शरीरसंचालक वाताचा प्रकोप होतो. आपल्या रोजच्या व्यवहारातल्या अनेकानेक चुकांमुळे वाताचा प्रकोप होतो.वाताचा प्रकोप होतो म्हणजे वात बळावतो-विकृत होतो व आजारांना कारणीभूत होतो. प्रमाणाने व गुणांनी वाढणारा वात शरीरामध्ये अनेक उलथापालथी घडवून आणतो. ती कारणे कोणती व शरीरात होणार्या उलथापालथी (विकृती) कोणत्या, हे जाणून घेणे वाचकांना उपयुक्त सिद्ध होईल. कारणे माहीत असतील तर त्यांचे निराकरण करण्याचे उपायसुद्धा तुम्हाला लक्षात येतील. महत्त्वाचे म्हणजे या चुका तुमच्या आमच्या नित्य दिनचर्येशी, आहाराशी, रोजच्या व्यवहारांशी निगडीत आहेत. दुर्दैव म्हणजे रोजचे अन्न आणि व्यवहार आपल्या आजारांना कारणीभूत आहेत, हेच मुळात आपल्याला माहीत नसते.
संदर्भसूची
- सुश्रुतसंहिता १.२०.२६,२७,
- सुश्रुतसंहिता ६.६४.४८
- अष्टाङ्गसंग्रह १.३.३९,
- अष्टाङ्गसंग्रह१.४.३२
- अष्टाङ्गसंग्रह १.२१.१०,११
- अष्टाङ्गसंग्रह१.१.२८
- भावप्रकाश, पूर्वखंड,२०६
- चरकसंहिता ६.३०.३०९
- चरकसंहिता १.१.५९
- चरकसंहिता१.१२.४
