Ayushman Bharat 10 lakh health cover भारतातील वैद्यकीय खर्च वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य‘ योजनेची सुरुवात केली होती. देशातील सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत प्रति कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच मिळत आहे. मात्र, काही पात्र नागरिकांना एकूण १० लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च मिळतो आहे. ‘आयुष्मान भारत‘अंतर्गत १० लाखांपर्यंत मोफत उपचार कसा मिळतो? त्यासाठीच्या अटी काय आहेत? जाणून घेऊयात…

१० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

गेल्या वर्षी सरकारने आपल्या ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य’ योजनेची व्याप्ती वाढवून, त्यात ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते. मात्र, १० लाख रुपयांच्या आरोग्य विमा कवचाबाबतच्या काही अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केल्यामुळे ७० किंवा त्याहून अधिक वयाचे सदस्य असलेल्या कुटुंबांना आता एकूण १० लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच मिळू शकते.

हे अतिरिक्त पाच लाख रुपयांचे संरक्षण केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांसाठी राखीव आहे. याचा अर्थ असा की, जर कुटुंबाचे पाच लाख रुपयांचे सामान्य कवच पती, पत्नी किंवा मुलांच्या उपचारासाठी पूर्णपणे वापरले गेले, तर ते त्यांच्या वृद्ध पालकांसाठी राखीव असलेले अतिरिक्त पाच लाख रुपये वापरू शकत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे आरोग्य विमा कवच दोन भागांत विभागलेले आहे :

  • ५ लाख रुपये : पती, पत्नी आणि मुलांसाठी
  • ५ लाख रुपये : ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी

आनंदाची बातमी म्हणजे ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे ज्या संयुक्त कुटुंबामध्ये वृद्ध सदस्य एकत्र राहतात, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

पात्रता काय आणि उत्पन्नाचे निकष काय?

या योजनेसाठी पात्रतेचा एकमेव निकष म्हणजे व्यक्तीचे वय ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पन्न, नोकरी किंवा आर्थिक स्थितीची कोणतीही अट नाही. तुमचे वय ७० पेक्षा जास्त असल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात.

नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. ‘आधार’द्वारे ई-केवायसी केले जाते आणि त्यानंतर आयुष्मान कार्ड दिले जाते. इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. आधार कार्डवर फक्त जन्माचे वर्ष नमूद असल्यास सरकारने स्पष्ट केले आहे की, आधार कार्डवर नमूद केलेल्या जन्माच्या वर्षाच्या पुढील वर्षाची १ जानेवारी ही अधिकृत जन्मतारीख मानली जाईल.

कुटुंबात ७० वर्षांवरील एकापेक्षा जास्त सदस्य असतील, तर स्वतंत्र नोंदणी आवश्यक आहे का?

कुटुंबातील ७० वर्षांवरील पहिल्या सदस्याची नोंदणी झाल्यानंतर, उर्वरित पात्र ज्येष्ठ नागरिकांना ‘Add Member’ या पर्यायाद्वारे त्याच कुटुंबात समाविष्ट केले जाऊ शकते.

ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र आयुष्मान कार्ड मिळेल का?

७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना योजनेंतर्गत स्वतंत्र आयुष्मान कार्ड दिले जाईल.

ऑनलाइन आयुष्मान कार्ड आणि उपचार

ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान कार्डासाठीचा अर्ज आयुष्मान भारत पोर्टल किंवा आयुष्मान अ‍ॅपद्वारे ऑनलाइन करता येतो. नोंदणीच्या पहिल्या दिवसापासूनच उपचारांची सुविधा उपलब्ध होते. कोणत्याही आजारावर किंवा उपचारासाठी कोणताही ‘वेटिंग पीरियड’ (प्रतीक्षा काळ) नाही.
या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. एखाद्या व्यक्तीला निवृत्तिवेतन मिळत असले किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळत असले तरी ७० वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतो.

कुटुंबात आजी-आजोबा ७० पेक्षा जास्त वयाचे असतील, तर संरक्षण कसे मिळेल?

पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच ‘कुटुंब’ आधारावर दिले जाते. त्याचा अर्थ असा की, ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक त्या पाच लाख रुपयांच्या मर्यादेतच कव्हर केले जातील. प्रत्येकाला स्वतंत्र पाच लाख रुपयांचे संरक्षण मिळणार नाही. एकूणच आयुष्मान भारत योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करणे दिलासादायक आहे; परंतु या फायद्यांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी विम्याच्या या विशिष्ट अटी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ऑनलाइन आयुष्मान कार्ड काढण्यासाठी काय करावे?

  • ‘आयुष्मान’ ॲप डाऊनलोड करा.
  • तुम्ही गूगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान’ ॲप डाऊनलोड करू शकता किंवा सरकारी वेबसाइटला भेट देऊन कार्डासाठी अर्ज करू शकता.
  • ॲप डाऊनलोड केल्यावर मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा.
  • पात्रता तपासा.
  • पात्र असाल, तर आधार ई-केवायसी करा.
  • फोटो अपलोड करा आणि कार्ड डाऊनलोड करा