Understand the impact of Back Pain Belt and Knee Cap and long-term dependency: कंबरदुखी झाली की कंबरेचा बेल्ट आणि गुडघा दुखू लागला की नी-कॅप वापरणे ही सध्या फॅशन झाली आहे. मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळणारी ही साधनं लोक डॉक्टरांना न विचारता वापरतात. पण हे ‘एक्सटर्नल सपोर्ट्स’ तुमच्या शरीराला कायमची सवय लावून अपंग तर बनवत नाहीत ना? यावर तज्ज्ञांचे काय मत आहे, ते सविस्तर पाहूया.

सपोर्ट्स म्हणजे काय आणि ते कसे काम करतात?

बेल्ट, कॉर्सेटस् आणि नी-कॅप यांना एकत्रितपणे एक्सटर्नल सपोर्टस् (external supports) म्हटलं जातं. यांचा उद्देश असतो दुखऱ्या भागाला तात्पुरता आधार देऊन त्या भागावरचा ताण कमी करणं, हालचाल मर्यादित करणं. उदाहरणार्थ, कॉर्सेटमुळे कंबरेला स्थिरता येते, नी-कॅप गुडघ्याभोवती घट्ट आधार देते आणि हालचाली नियंत्रित करते. त्यामुळे त्या भागावर अचानक येणारा ताण कमी होतो आणि वेदना काही प्रमाणात आटोक्यात येतात.

सपोर्ट लावल्यावर आराम का वाटतो?

अनेकदा रुग्ण आम्हाला सांगतात की, कंबरेला कॉर्सेट लावलं की आम्हाला बरं वाटतं किंवा नी कॅप लावली की गुढग्याला आराम वाटतो. यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत.

Award Banner
  • हालचाल थोडी कमी होते, त्यामुळे वेदना कमी जाणवतात
  • त्या भागाला स्थिरता मिळते, ज्यामुळे मेंदूला सुरक्षिततेचा संदेश मिळतो
  • उष्णता टिकून राहते, ज्यामुळे स्नायूंचा कडकपणा कमी वाटतो
  • हलका दाब (compression) मिळाल्यामुळे संवेदनांमध्ये बदल होतो
Back pain belt and knee cap uses for joint relief | कंबरदुखीचा बेल्ट आणि नी-कॅपचे फायदे | Side effects of wearing back support belt daily | गुडघ्याला नी-कॅप लावण्याचे तोटे आणि फिजिओथेरपी
बेल्ट, कॉर्सेटस् आणि नी-कॅप (Image Gemini)

म्हणूनच कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल सपोर्ट वापरल्यावर तात्पुरता आराम मिळणं स्वाभाविक आहे.
पण इथेच खरी अडचण सुरू होते. एक्सटर्नल सपोर्ट्सचा वापर चुकीचा नाही, पण त्यांचा सतत आणि दीर्घकाळ वापर समस्या निर्माण करू शकतो. कारण आपलं शरीर स्वतःच्या नैसर्गिक सपोर्ट सिस्टम घेऊन तयार झालेलं आहे स्नायू, लिगामेंट्स आणि मज्जासंस्था.

जेव्हा आपण बाह्य सपोर्टवर अवलंबून राहतो

…तेव्हा शरीर त्या भागाचं काम कमी करू लागतं, उदाहरणार्थ:

  • कॉर्सेट सतत वापरल्यास कंबरेचे स्नायू हळूहळू अकार्यक्षम होतात
  • नी-कॅपवर अवलंबून राहिल्यास गुडघ्याभोवतालचे स्नायू कमकुवत होतात
  • मनगट किंवा इतर सांध्यांसाठी ब्रेस सतत वापरल्यास हालचालींचं नैसर्गिक नियंत्रण कमी होतं

यामुळे सुरुवातीला मिळालेला आराम हळूहळू उलट परिणाम करू शकतो.

‘सवय’ फक्त शरीराची नाही, मनाचीही

अनेक वेळा रुग्ण सांगतात “कंबरेला कॉर्सेट नसलं की भीती वाटते”, “नी-कॅप नसली की जिने चालताना तितका आत्मविश्वास वाटत नाही.” ही सवय केवळ शारीरिक नसते, तर मानसिक असते. मेंदू त्या सपोर्टला ‘सुरक्षितते’शी जोडतो. त्यामुळे सपोर्ट काढल्यावर असुरक्षित वाटतं. परिणामी हालचाल कमी होते, आणि स्नायू अजून कमकुवत होतात
.
अशा प्रकारे एक चक्र तयार होतं:
सपोर्ट → कमी हालचाल → अकार्यक्षमता → अधिक सपोर्ट

मग सपोर्ट्स वापरायचे की नाही?

उत्तर आहे, हो, पण योग्य वेळी आणि मर्यादेत.
सपोर्ट्स काही परिस्थितींमध्ये खूप उपयुक्त असतात:

  • शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीच्या काळात
  • अचानक झालेल्या इजेनंतर
  • खूप वेदना असताना तात्पुरता आधार म्हणून
  • विशिष्ट काम करताना अतिरिक्त सपोर्ट म्हणून

उदाहरणार्थ, जड वजन उचलताना कंबरेसाठी कॉर्सेट तात्पुरता उपयोगी ठरू शकतो. पण तो दिवसभर वापरणं आवश्यक नाही.

योग्य वापर कसा असावा?

सपोर्ट्सचा वापर ‘काठी’ (crutch) म्हणून नव्हे, तर ‘पूल’ (bridge) म्हणून करायला हवा म्हणजे शरीर पुन्हा सक्षम होईपर्यंतचा तात्पुरता आधार.

फिजिओथेरेपीमध्ये यावर विशेष भर दिला जातो:

  • स्नायूंची ताकद वाढवणं
  • हालचालींची गुणवत्ता सुधार करणं
  • संतुलन आणि नियंत्रण वाढवणं
  • शरीरावरचा भार हळूहळू वाढवणं

जेव्हा शरीर सक्षम होतं, तेव्हा सपोर्ट्सचा वापर हळूहळू कमी केला जातो.

दीर्घकाळासाठी काय महत्त्वाचं?

दीर्घकाळासाठी खरा उपाय म्हणजे:

  • शरीराची ताकद
  • हालचालींची सवय
  • योग्य भार सहन करण्याची क्षमता
  • आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास

हे घटक मजबूत असतील, तर बाह्य सपोर्टची गरज कमी होते.

महत्त्वाची गोष्ट

काही वेळा लोक ‘जास्त सुरक्षिततेसाठी’ सतत नी-कॅप किंवा बेल्ट वापरतात. पण जास्त संरक्षण दिलं, तर शरीर स्वतःचं संरक्षण करणं विसरतं. त्यामुळे संतुलन साधणं महत्त्वाचं आहे.

…तर शरीराची नैसर्गिक क्षमता कमी होऊ शकते

बेल्ट, कॉर्सेट आणि नी-कॅप हे वाईट नाहीत पण ते कायमस्वरूपी उपायही नाहीत. ते तात्पुरते सहाय्यक आहेत. योग्य वापर केल्यास ते मदत करतात, पण त्यांच्यावर अवलंबून राहिल्यास शरीराची नैसर्गिक क्षमता कमी होऊ शकते.

खरा सपोर्ट बाहेरून नाही, तर शरीराच्या आत तयार होतो.
तो विकसित करणं, हेच खऱ्या अर्थानं फिजियोथेरेपी उपचाराचं उद्दिष्ट आहे.