सरकारचे सर्व नियम पायदळी तुडवत, गरजू महिलांच्या जीवाशी खेळ करत त्यांच्या शरीरात बेजबाबदारपणे स्त्री बीज निर्माण करून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात समोर आला. या प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. हा एक राज्यस्तरीय टोळीचा नियोजनबद्ध व्यवसाय असल्याचे आता समोर येते आहे.

स्त्री बीज म्हणजे काय ?

स्त्रीला गर्भवती होण्यासाठी आवश्यक असलेले अंडाणू म्हणजे स्त्री बीज अशी ओळख डॉक्टरांकडून करून दिली जाते. ज्या स्त्रियांच्या शरीरात सक्षम स्त्री बीज तयार होत नाही, ते टिकून राहत नाहीत त्यांच्यासाठी स्त्री बीज दात्याकडून घेतले जातात. पुरुषाच्या शुक्राणूसोबत प्रक्रिया करून गर्भधारणा केली जाते. ही कायदेशीर प्रक्रिया असून यात कमालीची गोपनीयता, खबरदारी पाळली जाते. सरकारच्या नियमानुसार प्रक्रिया केली जाते. त्यासाठी काही लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. राज्य सरकारचे यासाठी धोरणही अस्तित्वात आहे.

स्त्री बीजाची निर्मिती कशी झाली?

बदलापुरात उघडकीस आलेल्या स्त्री बीज विक्रीच्या प्रकरणात वैद्यकीय नियम आणि मार्गदर्शन तत्त्वे पायदळी तुडवून स्त्री बीज निर्मिती करण्यात आली. यासाठी महिलांना सलग दहा दिवस स्त्री बीज निर्मितीसाठी इंजेक्शन द्यावे लागतात. त्यानंतर त्यांना एक परिपक्व स्त्रीबीजासाठी आणखी एक इंजेक्शन द्यावे लागते. पुढे ३६ तासांनी हलकी भूल देऊन ही स्त्री बीजे काढली जातात. पुरुष शुक्राणूसोबत हे स्त्री बीज संकरित करून एम्ब्रिओ तयार करून तो महिलांच्या गर्भधारणेसाठी वापरला जातो. या सर्व प्रक्रियेत निरिक्षण आणि अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मदत लागते. मात्र बदलापुरात ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीररित्या झाली.

प्रक्रिया बेकायदेशीर कशी?

बदलापुरात झालेल्या स्त्री बीज विक्री प्रकरणात तीन मध्यस्थ महिलाच स्त्रियांशी संपर्क साधून त्याच इच्छुक महिलांना बीज निर्मितीची इंजेक्शन देत असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांना कोणत्याही सुरक्षेशिवाय ही इंजेक्शन दिली गेली. त्यानंतर त्यांची अवैधरित्या सोनोग्राफी तपासणीही केली गेली. या सर्व गोष्टींना आवश्यक इंजेक्शन, औषधे विठ्ठलवाडी येथील एका औषध विक्रेत्याने उपलब्ध करून दिली. यात महिलांना २५ ते ३५ हजारांपर्यंत स्त्री बीजासाठी पैसे देण्यात आले. पुढे हे स्त्री बीज १ लाखांपर्यंत विकण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात लाखोंचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. यात दलाल, सोनोग्राफी, औषध विक्रेते आणि आयव्हीएफ केंद्र सहभागी होते.

महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतात?

एक महिला एकदाच स्त्री बीज दान करू शकते. मात्र बदलापुरात एका महिलेने एकापेक्षा अनेकदा स्त्री बीज विक्री केल्याचा संशय आहे. या प्रक्रियेत महिलेच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात. हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. बदलापुरातील प्रकरणात एका महिलेला १५ पेक्षा जास्त वेळा इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती आहे. महिलांची आर्थिक हलाखीची स्थिती पाहून हे प्रकार केल्याचा संशय आहे. नियमानुसार ही प्रक्रिया कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून केली जाते. या महिलेची आरोग्य तपासणी करूनच प्रक्रिया करतात. त्यासाठी सदृढ महिलेची निवड निकषांवर होते.

बदलापुरात हा व्यवसाय कसा चालायचा?

बदलापुरातील ही स्त्री बीज विक्रीचा व्यवहार व्हाट्सअपवर चालत असल्याची माहिती आहे. महिलांना ठाण्यातील एका मोठ्या रुग्णालयात नेऊन स्त्री बीज तयार केले जायचे. स्त्री बीज करता महिला शोधणे, ⁠कागदपत्रे तयार करणे, ⁠सोनोग्राफी करणे, ⁠त्या करता रुग्णालयात दाखल करणे, स्त्री बीजाकरता लागणारे इंजेक्शन आणणे, स्त्री बीजाची प्रक्रिया होऊन एम्ब्रायो तयार होऊन त्यांची गर्भधारणा होईपर्यंत याबाबत संवाद व्हाट्सअॅपवरच केला जात होता. सर्व माहिती छायाचित्रे, चित्रफिती, वैद्यकीय अहवाल व्हाट्सअॅपद्वारे पाठवले जायचे.