Iran vs GCC Conflict: आखातातील बहारिन या देशाने ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’चे (GCC) प्रतिनिधित्व करत इराण विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) एक ठराव आणला आहे. बहारिन हा ‘जीसीसी’चा सर्वात लहान सदस्य देश आहे. पश्चिम आशियातील युद्धात इराणकडून आजूबाजूच्या देशांवर हल्ले केले जात आहेत. त्याची झळ बहारिनला देखील बसली आहे. इराण विरोधात आणलेला ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ४ एप्रिल रोजी पटलावर आणला जाणार होता. परंतु, दोन देशांमुळे त्याची तारीख पुढे ढकलली आहे. बहारिनकडे याच महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC)अध्यक्षपद सोपवले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बहारिन या छोट्या देशाने इराण विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. बहारिनच्या ठरावाला जवळपास १३६ देशांचे समर्थन मिळाले असले तरी दोन देशांनी मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे इराण यूएनमध्ये कारवाई होण्यापासून तात्पुरता बचावला आहे. नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात.

‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’च्या वतीने इराणविरोधात ठराव?

इराण होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे तेल व नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या परवानगीनेच या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्याची मुभा दिली जात आहे. १९७० नंतर पहिल्यांदाच जगावर सर्वात मोठे तल संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर बहारिनने इराणविरोधात ठराव आणला आहे. बहारिनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) २८ फेब्रुवारी रोजी इराण विरोधातील ठरावाचा मसुदा सुपूर्द केला होता. त्या ठरावाची ‘रिझोल्युशन २८१७’ अशी नोंद करण्यात आली. बहारिनने ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’चे प्रतिनिधित्व करत हा ठराव आणला आहे. ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’मध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवैत, कतार, ओमान आणि जॉर्डन या देशांचा सहभाग आहे. या ठरावाला जगभरातील १३६ देशांचे समर्थन मिळाल्याचे बहारिनच्या यूएनमधील सदस्यांनी सांगितले.

चीन, रशियाचा इराणला पाठिंबा?

बहारिनच्या ठरावाला अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्स या देशांनी देखील समर्थन दिले आहे. तर चीन व रशियाने मात्र या ठरावावर कोणतीच भूमिका न घेता एक प्रकारे इराणला समर्थन दिले. अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून दिल्या जात असलेल्या प्रत्युत्तराला हाताळण्यात हा ठराव तसेच त्याला मिळत असलेले आंतरराष्ट्रीय समर्थन निरूपयोगी ठरले असे दोन्ही देशांनी म्हटले आहे. दरम्यान, रशिया व चीनचे इराणला समर्थन मिळत असल्याने संयुक्त राष्ट्रसंघात इराणविरोधात होणाऱ्या निर्णयापासून इराणचा बचाव झाला आहे. हा ठराव ४ एप्रिल रोजी यूएनमध्ये मांडला जाणार होता. परंतु, तो चीन व रशियामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

इराणविरोधात अरब राजवटींची सामंजस्याची भूमिका?

सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे दोन देश’गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’मधील महत्वाचे देश आहेत. बहारिनने जो ठराव आणला तो मुख्यत: या दोन देशांकडूनच आणला जात असे. परंतु, इराणच्या हल्ल्यांची झळ सौदी अरेबिया व यूएई या दोन्ही देशांना बसली आहे. एकट्या यूएईने इराणचे शेकडो ड्रोन उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, इराण विरोधात युद्ध छेडण्याचे अरब मधील राजवटींनी टाळले आहे. युद्धात अरब देश सहभागी झाल्यास पायाभूत सुविधांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. दरम्यान, इराणच्या हल्ल्यांनी बहारिनचे थेट नुकसान झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जाहीरनाम्यातील कलम ५१ नुसार बहारिनने स्व-संरक्षण करण्याचा अधिकार यूएनकडे मागितला आहे.

बहारिनमधील राजेशाही आणि शिया मुस्लिमांची संख्या

बहारिनमध्ये राजेशाही आहे. बहारिनच्या परराष्ट्र धोरणाबाबत आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार बहारिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांच्याकडे आहेत. तर बहारिनचे परराष्ट्र मंत्री अब्दुललतिफ बिन राशिद अल झयानी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव पटलावर ठेवला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहणे जगासाठी परवडणारे नसल्याने सर्व देशांनी बहारिनला युएनएससी मध्ये साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. इराण युद्धात बहारिनने ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’चे एक प्रकारे नेतृत्वच हाती घेतले आहे.

बहारिन व इराणमधील संबंध कसे आहेत?

बहारिन आणि इराणमधील संबंध मागील काही दशकांपासून बिघडलेले आहेत. बहारिनच्या अंतर्गत राजकारणात तसेच इतर गोष्टींमध्ये इराण हस्तक्षेप करतो, असे बहारिनचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये टोकाचे वाद आहेत. २०२३ आणि २०२४ मध्ये दोन्ही देशांचे संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे पुन्हा एकदा दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. बहारिनमध्ये शिया मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे, तर बहारिनचे राजे हे सुन्नी मुस्लिम आहेत. त्यामुळे बहारिनवर इराण व सौदी अरेबिया यांचा प्रभाव कायम असतो.

बहारिनचा इराणवर कोणता आरोप? कोणती भीती?

बहारिनच्या भूभागात इराण दहशतवाद्यांना खतपाणी घालतो, असा आरोप अनेकदा केला आहे. सध्या इराणने बहारिनवर हल्ले केले. त्यामुळे इराण हा शत्रू देश असल्याची खात्री बहारिनला पटली आहे. सार्वभौमत्वाला इराणमुळे धोका निर्माण झाला असल्याचे देखील बहारिनकडून सांगण्यात आले. इराणचे सर्वोच्च नेते व शिया मुस्लिमांचे नेते असलेल्या अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर बहारिनमध्ये शिया मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. त्यावेळी अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. इराण युद्धामुळे येमेन मधील हुती जसे युद्धात सहभागी झाले तसे बहारिनमधील शिया मुस्लिम सहभागी होऊ नये, अशी भीती बहारिनला वाटत आहे. दरम्यान, बहारिन व येमेन या दोन्ही देशांमध्ये विकासाच्या बाबतीत खूप फरक आहे. बहारिनची अर्थव्यवस्था मजबूत असून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत. तसेच अमेरिकेचे सैन्य बहारिनमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. येमेनमध्ये डोंगराळ भाग अधिक असून तिथे हुथी बंडखोर लपतात. तिथूनच दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभागी होतात.