देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये विधान परिषदेच्या २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून काँग्रेसला खोचक टोला लगावला. यापूर्वी निवडणुकीतील पराभवाचे खापर काँग्रेसने अनेकदा ईव्हीएमवर फोडले आहे. द्विसदनी विधिमंडळ व्यवस्था असलेल्या देशातील काही मोजक्याच राज्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका घेतल्या जातात. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या काँग्रेसवरील टीकेनंतर ईव्हीएम आणि मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोणत्या निवडणुका अद्यापही मतपत्रिकांद्वारे घेतल्या जातात आणि त्यामागील कारणे काय? त्याविषयी जाणून घेऊ…

कोणकोणत्या राज्यांत मतपत्रिकांद्वारे मतदान?

देशातील बहुतांश ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आजही मतपत्रिकांद्वारे घेतल्या जातात. केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली होती. या अहवालानुसार, देशातील तब्बल ५३ टक्के राज्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानासाठी मतपत्रिकांचाच वापर केला जातो. केरळ, सिक्कीम, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, या तीन राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व प्रभागांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाते. मात्र, इतर राज्यांमध्ये ईव्हीएम आणि मतपत्रिका अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो. सुमारे २२ टक्के राज्यांनी काही प्रभागांमध्ये ईव्हीएमचा वापर सुरू केला आहे, तर उर्वरित प्रभागांमध्ये अजूनही मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाते.

काही निवडणुकांत मतपत्रिकांचाच वापर का होतो?

पंचायत राजच्या वरिष्ठ स्तरांवर म्हणजेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करणाऱ्या राज्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये १७ टक्के राज्ये सर्व प्रभागांमध्ये ईव्हीएमचा वापर करतात, असेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालात नमूद आहे. मतपत्रिकांचा वापर करणाऱ्या काही राज्यांनी निधीची कमतरता आणि ईव्हीएमच्या वापराबाबत मतदारांमध्ये जनजागृतीचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले होते. मात्र, हेच मतदार विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान करतात. त्यामुळे मतदारांना ईव्हीएम वापरण्याची माहिती नाही, हा युक्तिवाद योग्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच, मतपत्रिकांची मोजणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते आणि ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उमेदवारांना निवडणूक चिन्हे कशी दिली जातात?

याबाबत महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील माजी सरपंच कल्याण कुमार यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी तहसीलदारांकडून उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जातात. त्याकरिता उमेदवारांकडून तीन पर्याय मागवले जातात आणि त्यापैकी एक चिन्ह त्यांना दिले जाते. ही चिन्हे नेहमीच्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नसतात. त्यांच्या मते, अशा निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय विचारसरणीपेक्षा उमेदवाराचा मतदारांशी असलेला थेट जनसंपर्क अधिक महत्त्वाचा ठरतो. उमेदवार मतदारांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी किती मदत करतो, यावर त्याचे यश अवलंबून असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत बिहारमधील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती आदींच्या निवडणुका साधारणपणे एकाच काळात घेतल्या जातात. अशा वेळी मोठ्या संख्येने ईव्हीएम उपलब्ध करून देणे आणि त्यांचा वापर करणे अवघड ठरू शकते. त्यामुळे मतपत्रिकांचा वापर करणे अधिक सोयीचे ठरते. मात्र, मतपत्रिकांद्वारे मतदान झाल्यास मतमोजणीची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट होत असल्याचेही त्यांनी मान्य केले.

ईव्हीएमवर उमेदवारांचे नाव क्रमानुसार कसे ठरते?

काही राज्यांमध्ये पारंपरिक राजकीय पक्षांच्या चिन्हांऐवजी वेगळी निवडणूक चिन्हे असतानाही ईव्हीएमद्वारे पंचायत निवडणुका कशा घेतल्या जातात, याबाबत माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी स्पष्टीकरण दिले. ईव्हीएममध्ये आवश्यक ती निवडणूक चिन्हे समाविष्ट करण्यासाठी ‘सिम्बॉल लोडिंग’ नावाची प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारांची चिन्हे थेट ईव्हीएमवर अपलोड केली जातात, असे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकांबाबत माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी म्हणाले की, या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमद्वारे घ्यायच्या की मतपत्रिकांद्वारे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला असतो. उदाहरणार्थ, दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका ईव्हीएमद्वारे घेतल्या जातात. मात्र, पंजाब सरकारने २०२६ मध्ये महापालिका निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

विद्यापीठांच्या निवडणुकांमध्येही दोन्ही मतदान पद्धती

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानेही ‘पंजाब म्युनिसिपल इलेक्शन रूल्स, १९९४’ अंतर्गत निवडणुकीत मतपत्रिका आणि ईव्हीएम या दोन्ही पद्धतींचा वापर करण्याची तरतूद असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाला यापैकी कोणतीही एक पद्धत निवडण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. दरम्यान देशातील विविध विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकाही ईव्हीएम तसेच मतपत्रिकेच्या माध्यमातून घेतल्या जातात. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक हर्ष अत्री यांनी सांगितले की, ईव्हीएममध्ये उमेदवारांची नावे वर्णानुक्रमानुसार असतात. या निवडणुकांमध्ये उमेदवाराचे नाव आणि मतपत्रिकेवरील त्याचा क्रमांक महत्त्वाचा असतो. दुसरीकडे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (JNUSU) निवडणुका मात्र मतपत्रिकांद्वारे घेतल्या जातात.

एकल संक्रमणीय मतपद्धती म्हणजे काय?

एकल संक्रमणीय मतपद्धतीद्वारे (Single Transferable Vote) होणाऱ्या निवडणुकांमध्ये मात्र मतपत्रिकांचाच वापर करणे बंधनकारक असते. भारतीय संविधानाच्या कलम १७१ नुसार, विधान परिषदेच्या निवडणुका या एकल संक्रमणीय गुप्त मतदान पद्धतीने घेतल्या जातात. या पद्धतीमध्ये मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांसमोर पसंतीक्रमानुसार पहिला, दुसरा, तिसरा अशा क्रमाने मते नोंदवावी लागतात. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला मिळालेले मत पुढील पसंतीच्या उमेदवाराकडे हस्तांतरित करता येते. राज्यसभेच्या निवडणुकाही याच पद्धतीने घेतल्या जातात. या निवडणुकांमध्ये मतदार म्हणजेच आमदार मतपत्रिकेवर उमेदवारांना पसंतीक्रम देतात. एखाद्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी किती मते आवश्यक आहेत, हे ठरवण्यासाठी विशिष्ट सूत्राचा वापर केला जातो. त्यानुसार, मतदान करणाऱ्या एकूण आमदारांच्या संख्येला निवडणूक होणाऱ्या जागांच्या संख्येत एक मिळवून येणाऱ्या संख्येने भागले जाते. त्यानंतर मिळालेल्या उत्तरात एक मिळवून विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा निश्चित केला जातो.

राज्यसभा निवडणुकीत मतांची मोजणी कशी होते?

उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या राज्यात राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या आमदारांची एकूण संख्या २०० इतकी आहे. अशा वेळी २०० या संख्येला चार अधिक एक म्हणजेच पाचने भागले जाईल, ज्याचे उत्तर ४० इतके येईल. त्यात एक मिळवल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ४१ ठरवला जाईल. त्यामुळे ज्या उमेदवाराला ४१ मते मिळतील, तो विजयी घोषित होईल. मात्र, या निवडणुकांमध्ये एकल संक्रमणीय मतपद्धतीचा अवलंब केला जात असल्याने केवळ पहिल्या पसंतीच्या मतांवरच निकाल ठरत नाही. राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी खुल्या मतपत्रिकेचा वापर केला जातो. त्यामुळे आमदारांना उमेदवारांसमोर पहिली, दुसरी, तिसरी अशा क्रमाने पसंती नोंदवता येते. मात्र, सर्व जागा भरल्या गेल्या नाहीत, तर निवडून आलेल्या उमेदवाराला मिळालेली अतिरिक्त मते पुढील पसंतीच्या उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात. ज्या आमदारांचा पहिल्या पसंतीचा उमेदवार आधीच विजयी झाला आहे, त्यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला ही अतिरिक्त मते मिळतात.

पहिल्या पसंतीची मते कमी पडल्यास काय होते?

समजा, एखाद्या उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेल्या ४१ मतांऐवजी ४५ मते मिळाली, तर त्याच्याकडे चार अतिरिक्त मते असतील. ही चार मते संबंधित आमदारांनी दुसरी पसंती दिलेल्या उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात. एकापेक्षा अधिक विजयी उमेदवारांकडे अतिरिक्त मते असल्यास, सर्वाधिक अतिरिक्त मते असलेल्या उमेदवाराची मते सर्वप्रथम हस्तांतरित केली जातात. तरीही सर्व जागा भरल्या गेल्या नाहीत, तर पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला निवडणूक प्रक्रियेतून बाद केले जाते. त्यानंतर त्याच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मते इतर उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात. सर्व जागा भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. अशा प्रकारे एकल संक्रमणीय मतपद्धतीमध्ये मतदारांनी नोंदवलेल्या पसंतीक्रमानुसार मते हस्तांतरित करून उर्वरित जागांसाठी विजयी उमेदवार निश्चित केले जातात.