Ballpoint Pen Invention History : आज खिशात सहज मावणारा, काही रुपयांत मिळणारा आणि कोणत्याही वेळी वापरता येणारा बॉलपेन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. मात्र बॉलपेनचा प्रवास सोपा नव्हता.
१८८८ मध्ये जॉन जे. लाऊड यांनी एका वेगळ्याच प्रकारच्या पेनचं पेटंट मिळवलं. या पेनाने लाकूड, चामडं आणि खरखरीत पृष्ठभागांवर लिहिता येईल अशी त्यांची कल्पना होती. पेनच्या टोकाला बसवलेला एक छोटासा फिरणारा धातूचा चेंडू ही या शोधाची खासियत होती. ३० ऑक्टोबर १८८८ रोजी या शोधाचं पेटंट मंजूर झालं. लाऊड यांचं पेन कागदावर नीट न चालल्याने शोध पेटंटपुरताच राहिला. पुढील पाच दशकं अनेकांनी यावर काम केलं; पण शाईचा प्रवाह नियंत्रित करणं कठीण होतं. पुढे हंगेरीतल्या एका पत्रकाराने आणि त्याच्या रसायनशास्त्रज्ञ भावाने यावर उपाय शोधून आधुनिक बॉलपेनचा शोध लावला.
आज खिशात सहज मावणारा, काही रुपयांत मिळणारा आणि कोणत्याही वेळी वापरता येणारा बॉलपेन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. या लोकप्रियतेमागे विज्ञान, औद्योगिक उत्पादन, युद्धकाळातल्या गरजा, बाजारपेठेचं गणित आणि जाहिरातबाजी अशा अनेक गोष्टींचा वाटा होता. फाऊंटन पेनच्या वर्चस्वाला पर्याय निर्माण करणाऱ्या या छोट्याशा उपकरणाने लिहिण्याची पद्धतच बदलून टाकली.
फाऊंटन पेनच्या अडचणी
माणसाने लिहायला सुरुवात केली, तेव्हापासूनच लेखणीचा प्रवास रंजक राहिला आहे. पण, थेट बॉलपेनचा इतिहास समजून घेण्याआधी फाऊंटन पेनचा काळ समजून घ्यावा लागेल. ‘एनसायक्लोपीडिया’वरील नोंदीनुसार, प्राचीन काळात गुहेच्या भिंतींवर दगडाने ओरखडे काढण्यापासून सुरू झालेला हा प्रवास नंतर चिनी ब्रश, बांबूच्या काड्या आणि पक्ष्यांच्या पिसांपासून बनवलेल्या ‘क्विल पेन’पर्यंत पोहोचला. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये धातूच्या निबचा वापर सुरू झाला. त्यानंतर १८८४ मध्ये अमेरिकेच्या लुईस एडसन वॉटरमन यांनी स्वतःची शाईची टाकी असलेलं पहिलं फाऊंटन पेन बाजारात आणलं; त्यामुळे प्रत्येक वेळी शाईत लेखणी बुडवण्याची गरज उरली नाही.
तिथून पुढे अनेक दशकं फाऊंटन पेनने जगभरावर राज्य केलं. फाऊंटन पेन हे त्या काळात प्रतिष्ठेचं आणि ऐटीचं लक्षण मानलं जायचं; पण फाऊंटन पेनच्या काही अडचणी कायम होत्या. त्यात ठरावीक कालावधीने पातळ शाई भरावी लागायची. शाईची बाटली जवळ ठेवावी लागायची. सगळ्यात मोठा त्रास म्हणजे शाई सांडण्याचा. पेनमधून शाई गळणं, लिहिताना कागदावर शाईचे डाग पडणं, लवकर न सुकणाऱ्या शाईमुळे टीपकागदाचा अतिरिक्त खर्च करावा लागणं किंवा अणकुचीदार निबमुळे कागद फाटणं हे प्रकार सर्रास घडायचे. विशेषतः प्रवासात किंवा वेगाने लिहिताना या अडचणी अधिक जाणवायच्या.
बॉल पेनचा जन्म
याच काळात अमेरिकेतले वकील जॉन जे. लाऊड हे छंद म्हणून चामड्यावर काम करत होते. चामड्यावर कापण्याच्या खुणा करण्यासाठी पेन्सिल उपयोगी पडत नव्हती आणि फाऊंटन पेनचा वापरही सोयीचा नव्हता, त्यामुळे खरखरीत पृष्ठभागावर सहज लिहिता येईल असं उपकरण तयार करण्याचा त्यांनी विचार केला. ‘पेन्स.कॉम’वरील ‘द इन्व्हेन्टर बिहाइंड द मॉडर्न बॉलपॉईंट पेन’ या लेखानुसार, लाऊड यांनी पेनच्या टोकाला एका छोट्या सॉकेटमध्ये धातूचा चेंडू बसवला. हा चेंडू फिरू शकत होता. पृष्ठभागावर पेन फिरवलं की चेंडूही फिरायचा आणि त्याच्याबरोबर शाई पृष्ठभागावर उतरायची. आजच्या बॉलपेनमध्येही याच मूलभूत तत्त्वाचा वापर केला जातो.
३० ऑक्टोबर १८८८ रोजी लाऊड यांना या उपकरणाचं पेटंट मिळालं. त्यांच्या पेटंटमध्ये लाकूड, जाड कागद आणि इतर खरखरीत पृष्ठभागांवर लिहिण्याच्या उपयोगाचा उल्लेख होता. पण, या शोधात एक मोठी उणीव होती. चामड्यावर लिहिण्यासाठी वापरलेला चेंडू कागदावर लिहिताना खूप खरखरीतपणे फिरत होता, त्यामुळे अक्षरं नीट उमटत नव्हती. परिणामी, या पेनला व्यावसायिक बाजारपेठ मिळाली नाही आणि त्याचं पेटंट कालांतराने संपुष्टात आलं.
या अपयशानंतरही पुढची काही दशकं बॉलपेनच्या रचनेत सुधारणा होत राहिल्या. डॉ. चागंटी कृष्णकुमारी यांनी ‘बॉलपॉईंट पेन – ॲन एपॉनिमस इन्व्हेन्शन’ या लेखात या सुधारणांबद्दल लिहिलं आहे. बॉलपेनची रचना सुधारू पाहणाऱ्या अनेक संशोधकांसमोर शाईच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवण्याची मूलभूत समस्या होती. शाई पातळ असेल तर ती गळते आणि घट्ट असेल तर पेनच्या टोकात अडकते. चेंडू सॉकेटमध्ये खूप घट्ट बसवला तर शाईचा प्रवाह थांबतो आणि सैल बसवला तर शाई जास्त प्रमाणात बाहेर पडते. म्हणजेच चेंडू आणि शाई यांच्यातलं योग्य संतुलन साधणं आवश्यक होतं.
लास्लो बिरो यांचं योगदान
बॉलपेनच्या इतिहासाला निर्णायक वळण मिळालं ते हंगेरियन पत्रकार लास्लो बिरो यांच्यामुळे. ‘पेन्स.कॉम’च्या उपरोल्लेखित लेखानुसार, पत्रकार म्हणून काम करताना बिरो यांना फाऊंटन पेनच्या शाईच्या गळतीचा आणि सुकण्यास लागणाऱ्या वेळेचा कंटाळा आला होता. एकदा वर्तमानपत्राच्या छपाईची शाई लवकर सुकते हे पाहिल्यानंतर, त्यांनी ती पेनमध्ये वापरण्याचा विचार केला. पण, ही घट्ट शाई फाऊंटन पेनच्या निबमधून वाहू शकत नव्हती.
हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दंतवैद्य आणि रसायनशास्त्रज्ञ असलेले त्यांचे भाऊ जॉर्जी बिरो यांची मदत घेतली. दोघांनी मिळून शाईचा घट्टपणा आणि पेनच्या टोकाची रचना बदलण्याचे प्रयोग केले. त्यांनी लाऊड यांच्या चेंडू आणि सॉकेटच्या संकल्पनेचा वापर करत अशी रचना केली, ज्यात फिरणारा चेंडू कागदावर शाई सोडेल आणि पेन बंद असताना शाई सुकणार नाही. अशा प्रकारे, पेनच्या टोकाची रचना आणि शाईच्या रसायनशास्त्राच्या यशस्वी समन्वयातून कागदावर वापरण्यायोग्य आधुनिक बॉलपेनचा शोध लागला.
पुढे युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्याने या शोधाच्या व्यावसायिक विस्ताराला अडथळा निर्माण झाला. ‘बीबीसी’साठी स्टीफन डॉवलिंग यांनी लिहिलेल्या ‘द चीप पेन दॅट चेंज्ड रायटिंग फॉरएव्हर’ या लेखानुसार, ज्यू असल्यामुळे नाझी छळाच्या भीतीने बिरो बंधूंनी १९४१ मध्ये युरोप सोडलं आणि अर्जेंटिनामध्ये स्थलांतर केलं. तिथं त्यांना त्यांचे सहकारी जुआन जॉर्ज मेने यांची मदत मिळाली. तिघांनी मिळून बॉलपेनचं उत्पादन सुरू केलं. १९४३ मध्ये अर्जेंटिनामध्ये ‘बायरोम’ नावाने या पेनची विक्री सुरू झाली. बिरो आणि मेने या नावांच्या संयोगातून हे नाव तयार झालं. अर्जेंटिनामध्ये आजही बॉलपेनसाठी बायरोम हा शब्द वापरला जातो.
रेनॉल्ड्सचा धक्कादायक डाव
डॉ. चागंटी कृष्णकुमारी आणि स्टीफन डॉवलिंग यांच्या लेखांनुसार, बॉलपेनच्या व्यावसायिक विस्ताराला दुसऱ्या महायुद्धामुळे चालना मिळाली. उंचीवरील हवेच्या दाबातल्या बदलांमुळे फाऊंटन पेनमधून शाई गळत असल्याने वैमानिकांना अडचणी येत. बॉलपेनमध्ये ही समस्या कमी असल्यामुळे ब्रिटिश रॉयल एअर फोर्सने ३० हजार पेनची मागणी नोंदवली. ब्रिटिश सैनिकांना हे पेन फारच आवडलं. युद्धकाळात बॉलपेनला मिळालेलं हे मोठं व्यावसायिक यश होतं.
युद्धानंतर अमेरिकेतल्या एव्हरशार्प आणि एबरहार्ड फॅबर कंपन्यांनी मोठी किंमत मोजून बिरो यांच्या पेनचे उत्तर आणि मध्य अमेरिकेतले हक्क मिळवले. पण, या कंपन्यांना मागे टाकलं ते मिल्टन रेनॉल्ड्स या व्यावसायिकानं. अर्जेंटिनात ‘बायरोम’ पेन पाहिलेल्या रेनॉल्ड्स यांनी बिरो यांच्या पेटंटमधील काही तांत्रिक बाबी टाळून स्वतःचं पेन विकसित केलं. २९ ऑक्टोबर १९४५ रोजी न्यूयॉर्कच्या गिंबेल्स डिपार्टमेंट स्टोअरमध्ये ‘रेनॉल्ड्स रॉकेट’ची विक्री सुरू झाली. त्याची किंमत १२.५० डॉलर होती, जी आजच्या तुलनेत १८० डॉलरपेक्षा अधिक ठरते. गिंबेल्सने मागवलेल्या ५० हजार पेनपैकी ३० हजार पेन पहिल्याच आठवड्यात विकले गेले.
‘टाइम’च्या वृत्ताचा आधार घेत बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सहा महिन्यांत विक्रीतून ५.६ दशलक्ष डॉलर्सहून अधिक उत्पन्न मिळालं. पण, वाढत्या लोकप्रियतेबरोबर स्पर्धाही तीव्र झाली. अनेक कंपन्यांनी बॉलपेनचं उत्पादन सुरू केलं. फाऊंटन पेन उत्पादकही या बाजारात उतरले. महागड्या पेनची मागणी घटली आणि ग्राहक रिफिलला प्राधान्य देऊ लागले. बॉलपेनची उपयुक्तता सिद्ध झाली असली, तरी ते सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून देण्याचं आव्हान कायम होतं.
मार्सेल बिक यांनी केलं बॉलपेनचं लोकशाहीकरण
बॉलपेनला खऱ्या अर्थाने लोकप्रिय बनवण्याचं श्रेय फ्रेंच उद्योगपती मार्सेल बिक यांना दिलं जातं. बाजारातल्या महागड्या, धातूच्या बॉलपेनऐवजी कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी त्यांनी ओळखली. स्टीफन डॉवलिंग यांच्या लेखानुसार, १९४६ मध्ये बिक यांनी लास्लो बिरो यांच्या मूळ ब्रिटिश पेटंटचे हक्क मिळवले. पेनच्या टोकावरच्या स्टीलच्या चेंडूऐवजी अधिक टिकाऊ टंगस्टन कार्बाइडचा वापर करण्यावर त्यांनी काम केलं. १९५० मध्ये त्यांनी ‘बिक क्रिस्टल’ बाजारात आणलं आणि १९५३ मध्ये ‘सोसायटी बिक’ कंपनी स्थापन केली.
बिक क्रिस्टलच्या यशामागे त्याची रचनाही महत्त्वाची होती. त्याची पारदर्शक बॉडी असल्यामुळे आतली शाई किती शिल्लक आहे, हे सहज समजायचं. षटकोनी आकारामुळे पेन हातात व्यवस्थित पकडता यायचं आणि टेबलावर ठेवल्यावर ते सहज घरंगळत नव्हतं. शाईचा प्रवाह, पेनची पकड आणि उत्पादनाचा खर्च या सगळ्यांचा विचार करून त्याची रचना केली होती. ‘पेन्स.कॉम’च्या लेखानुसार, १९६० च्या दशकातल्या ‘राईट्स द फर्स्ट टाईम, एव्हरी टाईम!’ या जाहिरात मोहिमेने बिक क्रिस्टलची लोकप्रियता वाढवली. महागडं पेन जपून वापरण्याऐवजी सहज वापरून संपल्यावर बदलण्याची मानसिकता यातून रुजली. २००६ पर्यंत या पेनच्या १०० अब्जांहून अधिक नगांची विक्री झाल्याचा उल्लेख स्टीफन डॉवलिंग यांच्या लेखात आहे.
बॉलपेन लोकप्रियतेच्या शिखरावर
बॉलपेनच्या लोकप्रियतेमागे त्याचं तंत्रज्ञान आणि सहज उपलब्धता हे दोन्ही घटक महत्त्वाचे ठरले. फाऊंटन पेनसाठी शाईची बाटली, रिफिल आणि विशेष काळजी आवश्यक होती. पण, बॉलपेन खिशात ठेवणं, प्रवासात वापरणं आणि तो वापरून वेगवेगळ्या पृष्ठभागांवर लिहिणं सहज शक्य होतं, त्यामुळे दैनंदिन लेखनासाठी त्याचा वापर वेगाने वाढला. लेखनापलीकडे बॉलपेनने चित्रकलेतही स्थान निर्माण केलं. मॅट रोटा यांच्या ‘द आर्ट ऑफ बॉलपॉइंट : एक्सपेरिमेंटेशन, एक्सप्लोरेशन, अँड टेक्निक्स इन इंक’ या पुस्तकात रेषांची घनता, शेडिंग, क्रॉसहॅचिंग आणि वेगवेगळ्या पोतांची निर्मिती यांसारख्या तंत्रांमधून बॉलपेन वापरून केलेल्या चित्रनिर्मितीची उदाहरणं आढळतात.
बॉलपेनचं सांस्कृतिक अस्तित्व सिनेमांमध्येही दिसून येतं. ‘ब्रेकिंग अवे’ (१९७९), ‘रेन मॅन’ (१९८८) आणि ‘नर्ड्स इन पॅराडाइज’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमातल्या प्रसंगांचा उल्लेख सॅनफोर्ड लेव्हिन यांच्या ‘बेस्ट मुव्ही सीन्स’ या पुस्तकात आहे. ‘विवा जपाता!’ (१९५२) या सिनेमात १९१० च्या काळातल्या प्रसंगात बॉलपेन दाखवल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला गेला आहे; कारण त्याचा प्रत्यक्ष वापर १९४० च्या दशकात सुरू झाला होता.
फाऊंटन पेनची जागा बॉलपेनने घेतली, असं म्हणताना मात्र फाऊंटन पेन पूर्णपणे कालबाह्य झालं असा अर्थ होत नाही. आजही त्याला स्वतंत्र ग्राहकवर्ग आहे. त्या पेनच्या लेखनशैलीला विशेष महत्त्व आहे. पण, दैनंदिन वापरात बॉलपेनने मिळवलेलं स्थान वेगळं आहे. बॉलपेन वापरण्यासाठी कोणतंही विशेष कौशल्य लागत नाही आणि शाई भरण्याची कटकटही राहिलेली नाही. एखाद्या शोधाचं यश मोजताना त्या शोधाचं सामान्य माणसाच्या आयुष्यातलं स्थान काय आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं आणि त्याअर्थी, बॉलपेन हा निश्चितच एक यशस्वी शोध ठरला आहे.
