Will Bangladesh Favour Pakistan and China : बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) जाहीर झाला. या निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने (बीएनपी) बहुमतासह दणदणीत विजय मिळवला. ‘जमात-ए-इस्लामी’ या धर्मवादी पक्षाला नाकारताना बांगलादेशी मतदारांनी बीएनपीच्या सुधारणावादी धोरणांच्या बाजूने कौल दिला. माजी पंतप्रधान शेख हसीना पायउतार झाल्यानंतर तब्बल १८ महिन्यांनी झालेल्या या निवडणुकीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून होते. यादरम्यान बीएनपीच्या विजयामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सुधारणार का? चीन व पाकिस्तानबरोबरच्या बांगलादेशच्या संबंधांचे काय होणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याविषयीचा हा आढावा…

बीएनपीच्या विजयामुळे बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे तारिक रहमान यांच्याकडे जाणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. तारिक रहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र असून त्या शेख हसीना यांच्या प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी मानल्या जात होत्या. २००९ मध्ये बांगलादेशात हसीना यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर रहमान हे त्यांच्या आईसह जवळपास दोन दशके लंडनमध्ये निर्वासित होते. देशात सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच ते मायदेशी परतले. बीएनपीने जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या आघाडीविरोधात निवडणूक लढवली आणि बहुमतासह विजय मिळवला.

पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी की धोक्याची घंटा?

बांगलादेशचे माजी पंतप्रधान जियाउर रहमान यांनी १९७८ मध्ये बीएनपीची स्थापना केली होती. अवामी लीगच्या भारत-समर्थित दृष्टिकोनाला पर्याय उभा करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील घटना पाहता बीएनपी आणि पाकिस्तानमधील संबंध सुरुवातीला तणावपूर्ण होते, तरीही जियाउर रहमान यांच्या पत्नी खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकारच्या काळात दोन्ही देशांमधील संबंध अधिक सुधारले. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या पक्षांशी बीएनपीची युती असल्याने त्यांच्यावर आरोपही झाले. बीएनपी आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयमध्ये साटेलोटे असल्याचा दावाही त्यावेळी अनेकांनी केला होता.

आणखी वाचा : बांगलादेशच्या निवडणुकीत विजय मिळवणारे हिंदू उमेदवार कोण? त्यांनी कोणाचा पराभव केला?

बांगलादेश-पाकिस्तानमधील व्यापाराची स्थिती काय?

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार तसा मर्यादितच आहे. पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांत सुमारे ८६५ दशलक्ष डॉलर्सचा व्यापार झाला, जो मागील वर्षाच्या सुमारे ७१२ दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत २० टक्क्यांनी जास्त होता. या काळात पाकिस्तानची बांगलादेशला होणारी निर्यात सुमारे ७८७ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढली; तर बांगलादेशची पाकिस्तानला होणारी निर्यात सुमारे ७८ दशलक्ष डॉलर्स इतकी होती, त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने व्यापारी तफावत मोठी असल्याचे समोर आले आहे. दोन्ही देशांमधील व्यापार हा कापड आणि कृषी उत्पादनांपुरता मर्यादित आहे. २००१ ते २००७ पर्यंत सत्तेत असलेल्या बीएनपीचे ऐतिहासिकदृष्ट्या पाकिस्तानशी तुलनेने चांगले संबंध राहिले आहेत. त्याउलट अवामी लीग पक्षाचे भारताशी जवळचे संबंध होते आणि त्यांनी पाकिस्तानला आपल्यापासून दूर ठेवले होते.

पाकिस्तान-बांगलादेशचे संबंध आणखीनच सुधारणार?

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजवटीत पाकिस्तान व बांगलादेशचे संबंध ताणले गेले होते. यादरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पाकिस्तानचे बांगलादेशवर बारकाईने लक्ष असेल. गेल्या काही महिन्यात पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांसह उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बांगलादेशमध्ये भेटीगाठी दिल्याचे समोर आले आहे. बांगलादेशला हाताशी धरून पाकिस्तान भारताला लक्ष्य करू शकतो, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान बांगलादेशची अंतर्गत सुरक्षा स्थिती कमकुवत झाल्यास किंवा इस्लामवादी गटांना अधिक कार्यक्षेत्र मिळाल्यास भारतासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, अशी चिंता काही भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान बीएसपीने निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तारिक रहमान यांचे अभिनंदन केले आहे.

बीएनपीच्या विजयामुळे चीनला होणार फायदा?

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी आणि चीनचे अनेक दशकांपासून चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. १९७५ मध्ये बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाल्यानंतर जियाउर रहमान यांनीच चीनबरोबर चांगले संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न केले होते. जियाउर रहमान यांच्या पत्नी आणि तारिक रहमान यांच्या आई खालिदा झिया यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात हे संबंध आणखीनच बळकट झाले. बीएनपीच्या नेतृत्वाखालील सरकारने १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ अशा दोन कार्यकाळांत चीनबरोबरचे संरक्षण सहकार्य आणि आर्थिक संबंध वाढवले.

चीन हा बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार

गेल्या दशकाहून अधिक काळ चीन हा बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला आहे. त्यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय व्यापार सुमारे १८ अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. चीनमधून बांगलादेशात होणारी निर्यात जवळपास ९५ टक्के असल्याचे सांगितले जाते. बांगलादेश आपल्या गारमेंट आणि उत्पादन क्षेत्रासाठी चिनी मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स, कच्चा माल आणि औद्योगिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. बीएनपीच्या विजयानंतर हे संबंध टिकून ठेवण्याचा चीनचा प्रयत्न असेल. ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमांतर्गत चीनने बांगलादेशात पायाभूत सुविधा, वीज प्रकल्प, पूल, बंदरे आणि वाहतूक मार्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. भारताला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमेजवळ चीनने ड्रोन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी नुकताच करार केला आहे.

हेही वाचा : Pulwama Attack : बालाकोट एअर स्ट्राइकने दहशतवादी आजही थरथरतात; ‘ऑपरेशन बंदर’ काय होतं?

बांगलादेशचा प्रयत्न नेमका काय असेल?

माजी पंतप्रधान शेख हसीना बांगलादेशच्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भारतात आश्रयास आहेत. ढाका येथील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली असून हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी वाढत आहे. गेल्या वर्षभरापासून भारत व बांगलादेश यांच्यातील संबंधात दुरावा निर्माण झाला आहे. सध्या दोन्ही देशांमधील व्यापारही काही प्रमाणात रडखडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारात काही हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या होत्या, त्यावरून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अंतरिम सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली होती. यादरम्यान बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यानंतर तारिक रहमान भारताबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणार की चीन आणि पाकिस्तानबरोबर आणखीनच जवळीक वाढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांना शुभेच्छा दिल्या आहेत.