Bangladesh Hindu Priest Tortured : भारताच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशात एका हिंदू पुजाऱ्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुभाष देऊरी असे २५ वर्षीय पुजाऱ्याचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २९ जून रोजी सुभाषचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले आणि त्याच्या कुटुंबियांकडे खंडणीही मागितली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी त्याचा शारीरिक आणि मानसिक छळही केला, असे स्थानिक माध्यमांच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची ढाका पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील जगन्नाथ विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी व मंदिराचा पुजारी सुभाष देऊरी याचे सोमवारी (२९ जून) एका टोळक्याने अपहरण केले. त्यानंतर अज्ञातस्थळी नेऊन त्याला अमानुष मारहाण केली. त्यातील काही आरोपींनी सुभाषचा शारीरिक व मानसिक छळही केला. या घटनेवर बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेचे प्रवक्ते काजल देबनाथ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ढाका येथील एका हिंदू पुजाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. हा प्रकार लुटमारीचा होता की त्यामागे अन्य काही कारण होते याची आम्ही माहिती घेत आहोत, असे त्यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले.
मंगळवारी (३० जून) पहाटे सुभाष हा जुना ढाका परिसरातील एका रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडून होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी अधिकारी मोहम्मद फारुक म्हणाले की, सध्या सुभाषवर आपत्कालीन विभागात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. त्याला मारहाण करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. स्थानिक माध्यमांनुसार, सुभाष हा ढाकापासून पश्चिमेला सुमारे १७० किमी अंतरावर असलेल्या मगुरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. कायद्याचे शिक्षण घेत असल्यामुळे तो ढाका येथे आपल्या मित्रांबरोबर भाड्याच्या खोलीत राहतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सुभाष परिसरातील एका मंदिरात पुजारी म्हणूनही काम करतो.
सुभाषचा रूममेट दुरोज साहा याने सांगितले की, सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर काही वेळातच मला त्याच्या मोबाइलवरून फोन आला. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत सुभाष फोनवरून बोलत होता. त्याने मला काही पैसे पाठवण्याची विनंती केली; पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी त्याला मदत करू शकलो नाही. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी सुभाषच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. सुभाषची बहीण जया स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हणाली की, मंगळवारी पहाटेच्या सुमारास आम्हाला सुभाषच्या मोबाइलवरून एका अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि ३० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न पाठवल्यास सुभाषची हत्या करण्याची धमकीही त्यांनी दिली.
अपहरणकर्त्यांनी पैसे जमा करण्यासाठी आपल्या बँक खात्याचा क्रमांकही दिला. त्यानंतर आम्ही त्या खात्यात २६ हजार रुपये जमा केले. पैसे मिळाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुभाषला जुन्या ढाका परिसरातील एका रस्त्यावर फेकून दिले, असेही जयाने स्थानिक माध्यमांना सांगितले. दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुभाषला परिसरातील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर त्याने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती मित्रांना सांगितली. अपहरणकर्त्यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला, कपडे काढून अपमानित केले आणि कुटुंबीयांकडे पैशांची मागणी करण्यास भाग पाडले, सुभाषने मित्रांना सांगितल्याचे स्थानिक माध्यमांच्या नमूद करण्यात आले आहे. या अपहरण आणि मारहाणीमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी बांगलादेशातील वेगवेगळ्या भागांत दोन हिंदू पुरुषांची हत्या करण्यात आली होती. स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुसार, कोपालिया बाजार परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी कारखानदार व एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री सुमारे १० वाजता नरसिंगडी जिल्ह्यात शरद मणी चक्रवर्ती या ४० वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. जानेवारीत कालीगंज येथील एका ४० वर्षीय हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दोन पुरुषांनी तिला झाडाला बांधले, तिचे केस जबरदस्तीने कापले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तसेच, डिसेंबर २०२५ मध्येही बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात एका हिंदू तरुणाला जमावाने बेदम मारहाण करून ठार मारल्याची घटना समोर आली होती.
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराची ही मालिका सामाजिक कार्यकर्ते शरीफ हादी यांच्या मृत्यूनंतर सुरू झाली. गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली होती. इतक्यावरच न थांबता त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकण्यात आला होता. या घटनेमुळे भारतात तीव्र संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, तारिक रहमान यांनी फेब्रुवारीमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशातील अल्पसंख्याकांना अनेक मोठमोठी आश्वासने दिली होती. कोणताही जातीय भेदभाव न करता प्रत्येकाला देशात समान वागणूक आणि संरक्षण दिले जाईल, असे ते म्हणाले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच त्यांची आश्वासने हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात बांगलादेशच्या उत्तरेकडील गाईबांधा जिल्ह्यातील पलाशबारी येथे उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीला तेथील कट्टरपंथीयांनी तीव्र विरोध केला होता. त्यावरून वाद वाढतच असल्यामुळे तेथील प्रशासनाला भीतीपोटी मूर्ती उभारण्याचे काम तातडीने थांबवावे लागले होते.
