देशामध्ये राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका खेळण्यासाठी दाखल झाला. मंगळवारी दोन सामन्यांची मालिका संपुष्टात आली, तेव्हा बांगलादेशने या मालिकेत २-० असे निर्भेळ आणि ऐतिहासिक यश मिळवले. बांगलादेशचा हा मालिका विजय महत्त्वाचा का, त्यांच्या या कामगिरीमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेवर काय परिणाम होईल, पाकिस्तानच्या निराशाजनक मालिकेचे कारण काय, आणि भारतासमोर बांगलादेश खडतर आव्हान उभे करेल का, याचा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामगिरी विशेष का?

बांगलादेशमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचारामुळे सर्वांचे लक्ष वेधले. यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना आपला देश सोडून पलायन करावे लागले. देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. अशातच बांगलादेशने पाकिस्तान संघाचा दौरा केला. घरच्या मैदानावर सामने होणार असल्याने पाकिस्तानचे पारडे जड समजले जात होते. त्यातच अनुभवी बांगला खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, मायदेशातील कठीण परिस्थितीचा सामना करताना मानसिक दृष्ट्या भक्कमपणा दाखवणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंनी पहिल्या कसोटीत दहा गडी राखून विजय मिळवल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. दुसऱ्या कसोटीत पावसामुळे पहिला दिवस वाया जाऊनही बांगलादेशने सहा गडी राखून विजय नोंदवताना पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी मालिका जिंकली. २००१ मध्ये दोन्ही देशांमध्ये कसोटी सामना झाला होता. त्यानंतर एकूण सहा मालिका झाला. त्यामध्ये पाकिस्तान संघाने पाच मालिकांत यश संपादन केले होते. त्यामुळे बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात हा विजय ऐतिहासिक आहे. चंडिका हथुरासिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी संघात बदल करीत अनेक युवा खेळाडूंना संधी दिली, त्याचा फायदाही संघाला झाला आहे.

हे ही वाचा… विश्लेषण: म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीत घट का?

कोणते खेळाडू निर्णायक?

मेहदी हसन मिराजने या मालिकेत आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने दोन्ही कसोटीत मिळून १५५ धावा केल्या. यासह सर्वाधिक १० गडीही बाद केले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत मिराजची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. अनुभवी मुश्फिकुर रहीम (२१६ धावा) आणि लिटन दास (१९४ धावा) यांनी फलंदाजीत चमक दाखवली. रहीमने पहिल्या कसोटी सामन्यात निर्णायक १९१ धावांची खेळी केली होती. तसेच, दासने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १३८ धावांचे योगदान दिले होते. गोलंदाजीत मिराजला हसन महमूद (८ गडी), नाहिद राणा (६ गडी), शाकिब अल हसन (५ गडी) यांनी चांगली साथ दिली होती.

पाकिस्तानवर नामुष्की का ओढवली?

बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला त्यांच्यावर चहूबाजुंनी टीका होत आहे. नवीन प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा संघ या मालिकेत उतरला होता. मात्र, मोहम्मद रिझवान (२९४ धावा) व खुर्रम शहझाद (९ गडी) वगळता इतर कोणत्याही खेळाडूला योगदान देता आले नाही. पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिल्याने पाकिस्तान संघ व्यवस्थापनावर ताशेरे ओढण्यात आले. दुसऱ्या कसोटीतही खेळाडूंमध्ये समन्वय पहायला मिळाला नाही. पाकिस्तानचा वलयांकित फलंदाज बाबर आझम याची कसोटीतील अपयशी मालिका यावेळीही सुरूच राहिली. इतर फलंदाजांनाही फारशी चमक दाखवता आला नाही. दोन्ही सामन्यांतील पहिल्या डावात धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात सपशेल निराशा केली. कर्णधार शान मसूदही दबावाच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरला. त्यातच कमी अनुभवी गोलंदाजांना संघात स्थान दिल्याचा फटकाही पाकिस्तानला बसला.

हे ही वाचा… बलात्काराच्या दोषींना थेट फाशी; पश्चिम बंगाल विधानसभेत मंजूर झालेले अपराजिता विधेयक काय आहे? राज्यं राष्ट्रीय कायद्यात बदल करू शकतात का?

‘डब्ल्यूटीसी’ गुणतालिकेची स्थिती कशी?

पाकिस्तानविरुद्धच्या २-० अशा निर्भेळ यशानंतर बांगलादेश (४५.८३ टक्के) जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. सध्या गुणतालिकेत भारत (६८.५२ टक्के) व ऑस्ट्रेलिया (६२.५० टक्के) संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. या वर्षाअखेरीस होणाऱ्या भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेनंतर गुणतालिकेचे चित्र अधिक स्पष्ट होईल. बांगलादेश आता या महिन्यात भारताचा दौरा करणार असून ते दोन कसोटी सामने खेळणार आहेत. भारतानंतर बांगलादेश संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. यामध्येही ते दोन सामने खेळतील. दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्यातही कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र, याचे वेळापत्रक अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही. बांगलादेशला एकूण सहा कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यांनी आपल्या याच कामगिरीत सातत्य राखल्यास ते इतर संघांच्या अडचणी वाढवू शकतात.

बांगलादेश संघ भारत दौऱ्यावर…

भारत व बांगलादेश संघांमध्ये १९ सप्टेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तेव्हा बांगलादेशचा प्रयत्न कामगिरीत सातत्य राखण्याचा राहील. भारताला मायदेशात पराभूत करणे ही सोपी गोष्ट नाही. पण, बांगलादेश एखादी कसोटी जिंकण्यातही यशस्वी ठरले, तरी भारतासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. त्यातच भारतातील खेळपट्ट्या या फिरकीला अनुकूल समजल्या जातात. बांगलादेशकडे चांगले फिरकीपटू असल्याने या मालिकेत चांगली चुरस पहायला मिळेल. भारतीय संघ गेल्या १२ वर्षांत घरच्या मैदानावर खेळलेल्या ४५ कसोटी सामन्यांतून केवळ चारच सामन्यांत पराभूत झाला आहे. तसेच, भारताने या वर्षांमध्ये एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारत दौऱ्यात बांगलादेशचे लिटन दास, मुश्फिकुर रहीम, अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराज आणि युवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा निर्णायक भूमिका पार पाडू शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh historic victory over pakistan in cricket and challenges ahead indian team print exp asj
Show comments