Tariq Rahman Avoid India Visit : एखाद्या देशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्या देशाचे प्रमुख कोणत्या देशाचा आधी दौरा करतात यावरून त्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचा अंदाज लावला जातो. तसेच तो देश त्याच्या आजूबाजूच्या देशांपैकी कोणत्या देशाला प्राधान्य देतोय, हेही त्यावरून कळते. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी त्यांच्या पहिल्या विदेश दौऱ्यासाठी मलेशियाची निवड केली आहे. २१ व २२ जून रोजी रहमान मलेशियाची राजधानी क्लालालंपुरचा दौरा करतील व त्यानंतर २३ जून रोजी ते चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
बांगलादेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या पंतप्रधानांना भारत व चीन या दोन्ही देशांनी आमंत्रण दिले होते. बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणावर या दोन्ही देशांचा प्रभाव कायम राहिला आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रहमान यांना नवी दिल्लीत येण्याचे आमंत्रण देणारे पत्र पाठवले होते. त्यानंतर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि चीनचे पंतप्रधान (प्रीमिअर) लि कियांग यांनीही रहमान यांना आमंत्रण दिले होते. कोणत्या देशाचा दौरा करायचा याबाबत बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीची (BNP) बैठक झाल्याची माहिती स्थानिक वृत्त संस्थांनी दिली आहे. भूतान व सौदी अरेबियाचा दौरा करण्याबाबतही विचारविमर्श झाल्याचे सांगण्यात येते.
रहमान यांचे परराष्ट्र धोरण कसे आहे?
बांगलादेशमधील नव्या सरकारने ‘बांगलादेश फर्स्ट’चे परराष्ट्र धोरण अवलंबले आहे. यावरून बांगलादेश इतर देशांशी कशाप्रकारे संबंध प्रस्थापित करणार आहे, याची कल्पना येते. भारत व चीन हे आशियातील दोन प्रमुख देश आहेत. या दोन्ही देशांची निवड न करता पहिल्या दौऱ्यासाठी रहमान यांनी मलेशियाला प्राधान्य दिले आहे. परंतु, ते मलेशियानंतर चीनचा दौरा करणार आहेत. त्यामुळे भारताचे या घडामोडीकडे बारीक लक्ष आहे. बांगलादेशात चीनने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि विकासात्मक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलिउर रहमान यांनी भारत व चीन या दोन्ही देशांचे दौरे केले आहेत.
तारिक रहमान यांनी पारंपरिक दौऱ्याला कसा छेद दिला?
शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान असताना भारताची बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका होती. शेख हसीना यांचा अवामी लिग पक्ष सत्तेत असताना दिल्ली व ढाकामधील भागीदारी वाढली होती. संरक्षण, व्यापार, दळणवळणाशी संबंधित प्रकल्प, दहशतवाद विरोध या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये संबंध चांगले होते.
ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शेख हसीना यांच्या सरकारवर भारताला विश्वास होता. तर बांगलादेशला परराष्ट्र धोरणात भारताची मदत मिळत होती. १९९६ ते २०२४ दरम्यान शेख हसीना यांनी भारताचा १३ वेळा दौरा केला. त्यातील दोन वेळा त्या पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आल्या होत्या. रहमान यांनी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी इतर देशाला प्राधान्य देऊन स्वत:चे एक वेगळे व स्वतंत्र परराष्ट्र धोरण असेल असा संदेश दिला आहे.
बांगलादेशसाठी मलेशियाचे महत्त्व काय?
मलेशियात सध्या बांगलादेशातील अंदाजे ८ लाख नागरिक काम करत आहेत. हे नागरिक मलेशियात पैसे कमावून बांगलादेशातील कुटुंबियांना पाठवतात. बांगलादेशातील अनेक कुटुंब आर्थिक स्त्रोतासाठी मलेशियातून पाठवल्या जाणाऱ्या पैशांवर अवलंबून आहेत. दुसऱ्या देशातून अशा स्वरूपात पैसा येत असल्यास देशाचा परकीय चलन साठा वाढतो. तसेच आर्थिक स्थिरता प्राप्त होते.
मलेशिया व बांगलादेश यांच्यात स्थलांतरित मजूरांवरून सध्या मतभेद आहेत. मलेशियातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार करून बांगलादेशी नागरिक नोकऱ्या मिळवतात असा संशय मलेशियाला आहे. त्यामुळे १ जून २०२४ पासून मलेशियाने बांगलादेशी मजूरांच्या स्थलांतराला स्थगिती दिली आहे. रहमान यांच्या दौऱ्यात हा सर्वात महत्त्वाचा विषय मानला जात आहे. मलेशियात अंदाजे १२ हजार बांगलादेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पायाभूत सुविधा ते तंत्रज्ञान आणि फायनान्स या क्षेत्रांमध्ये मलेशियाने प्रगती केली आहे. बांगलादेशात मलेशियातून गुंतवणूक मिळावी याला बांगलादेश प्राधान्य देणार आहे.
बांगलादेश व चीनमधील संबंध कसे?
पंतप्रधान तारिक रहमान हे मलेशियाचा दौरा केल्यानंतर लगेच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बांगलादेशने थेट चीनला न जाता मलेशियाचा मार्ग निवडल्याचे दिसते. बांगलादेश चीनकडून जवळपास २५ अब्ज डॉलर्सची आयात करतो. चीनने बांगलादेशातील वाहतूक, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांतील प्रकल्पांना अर्थसाहाय्य आणि पाठबळ दिले आहे.
चीनी गुंतवणूक हा बांगलादेशच्या विकास धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे. २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर चीनसोबत नवीन अर्थसाहाय्य आणि नवीन प्रकल्पांबाबतच्या चर्चांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चीन दौऱ्यादरम्यान ज्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘तिस्ता नदी व्यापक व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवन प्रकल्प’. तिस्ता नदी उत्तर बांगलादेशातील लाखो लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
भारतासाठी काय महत्त्वाचे?
भारत व बांगलादेश दरम्यान ४ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची सीमारेषा आहे. ही भारताची शेजारील देशासोबत असलेली सर्वात लांब सीमारेषा आहे. बांगलादेश अनेक प्रकारच्या वस्तू आणि औद्योगिक कच्च्या मालासाठी भारतावर अवलंबून आहे, तर भारताच्या ईशान्येकडील राज्यांना बांगलादेशी भूभागातून जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचा मोठा फायदा होतो. दोन्ही देश ऊर्जा सहकार्य, वाहतूक दळणवळण यंत्रणा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या माध्यमातूनही एकमेकांशी जोडलेले आहेत.
राजनैतिक पातळीवर बांगलादेशी आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये आधीच बैठका झाल्या आहेत. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीउर रहमान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे बांगलादेशकडून सांगण्यात आले. तसेच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व तारिक रहमान यांची भेट होईल, असे संकेतही देण्यात आले होते. दरम्यान, ‘अवामी लीग’च्या राजवटीकडून ‘बीएनपी’च्या (BNP) नेतृत्वाकडे झालेला हा सत्तापालट भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नवीन आव्हाने घेऊन आला आहे. यातील सर्वात संवेदनशील मुद्द्यांपैकी एक म्हणजे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा विषय असून त्यांचे भारतातील वास्तव्य बांगलादेशमध्ये अजूनही संताप निर्माण करत आहे.
