बांगलादेशने १ जूनपासून नव्या स्वरूपातील चलनाच्या नोटा जारी केल्या आहेत. मुख्य म्हणजे या नोटांवर देशाचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान यांचा फोटो वगळण्यात आला असून त्याऐवजी सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूचित्रे देण्यात आली आहेत. हा उपक्रम मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने राबविला आहे. आतापर्यंत बहुतेक नोटांवर शेख मुजीबूर रहमान यांचे चित्र होते. त्यांना पाकिस्तानपासून मिळालेल्या देशाच्या मुक्ततेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. मात्र, आता त्यांचे चित्र नोटांमधून काढून टाकण्यात आले आहे आणि आता नोटांमध्ये राष्ट्रीय चिन्हे, वास्तुशिल्पीय खुणा आणि ऐतिहासिक वास्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांचे सांगणे आहे, नवीन डिझाइन राष्ट्रीय ओळख प्रतिबिंबित करण्यासाठी आहे आणि बनावटीला आळा घालण्यासाठी त्यात सुरक्षेची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी एएफपीला सांगितले, “नवीन डिझाइन अंतर्गत नोटांमध्ये कोणत्याही व्यक्तीचे चित्र नसतील, त्याऐवजी नैसर्गिक चित्रे आणि पारंपरिक चित्रे प्रदर्शित केली जातील. मुख्य म्हणजे नवीन नोटांवर हिंदू मंदिरांचे चित्र असल्याचेही दिसून येत आहे. त्यामागील नेमकं कारण काय? या हिंदू मंदिराचे वैशिष्ट्य काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

जारी करण्यात आलेल्या नवीन नोटा कशा दिसतात?
नव्याने जारी केलेल्या नोटांमध्ये १,००० रुपयांपासून ते २ रुपयांपर्यंतच्या सर्व चलनाचा समावेश आहे. या नोटांवर बांगलादेशच्या ऐतिहासिक आणि स्थापत्य वारशाचे वेगवेगळे घटक आहेत. प्रत्येक मूल्यावर रॉयल बंगाल टायगरचे वॉटरमार्क आहे, तसेच नोटेनुसार मध्यवर्ती बँकेचा मोनोग्रामदेखील आहे.
२ ते १००० रुपयांच्या नोटा | नोटेवरील वैशिष्ट्य |
१,००० रुपयांची नोट | ही नोट जांभळ्या रंगाची आहे. नोटेवर राष्ट्रीय शहीद स्मारक आणि राष्ट्रीय संसद भवन यांचे चित्रण आहे. |
५०० रुपयांची नोट | हिरव्या रंगाच्या या नोटेवर मध्यवर्ती शहीद मिनार आणि सर्वोच्च न्यायालय आहे, तसेच राष्ट्रीय फूल ‘शापला’देखील आहे. |
२०० रुपयांची नोट | पिवळ्या रंगाच्या या नोटेवर जुलै २०२४ च्या निदर्शनांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीचित्रांसह ढाका विद्यापीठाचे अपराजेयो बांगला शिल्प आहे. |
१०० रुपयांची नोट | ही नोट निळ्या रंगाची असून त्यावर समोरील बाजूस बागेरहाटमधील शैत-गुम्बुज मशीद आहे आणि दुसऱ्या बाजूस सुंदरबनमधील चित्र आहे. |
५० रुपयांची नोट | या नोटेमध्ये ढाकामधील प्रतिष्ठित राजवाडा अहसान मंझिल आणि बंगालच्या दुष्काळाचे चित्रण करणारे प्रसिद्ध कलाकार जैनुल आबेदीन यांचे चित्र आहे. |
२० रुपयांची नोट | १ जून रोजी सादर करण्यात आलेल्या या नोटेवर दिनाजपूरमधील १८ व्या शतकातील कांताजीव मंदिर आणि नौगाव जिल्ह्यात असणाऱ्या आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या पहाडपूर बौद्ध विहाराचे चित्र आहे. |
१० रुपयांची नोट | गुलाबी रंगाच्या या नोटेवर बैतुल मुकर्रम मशीद आणि निषेध भित्तीचित्रे आहेत. |
५ रुपयांची नोट | या नोटेवर समोरील बाजूस तारा मशीद आणि मागच्या बाजूला भित्तीचित्रे आहेत. |
२ रुपयांची नोट | हलक्या हिरव्या रंगाच्या या नोटेवर मीरपूरमधील शहीद बुद्धिजीवी स्मारक आणि मागे रायेर बाजार स्मारक आहे. |
या नोटा आता हळूहळू चलनात आणल्या जात आहेत. १,००० रुपये, ५० रुपये आणि २० रुपयांच्या नोटा पहिल्यांदा चलनात आणल्या गेल्या. ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, १० रुपये, ५ रुपये आणि २ रुपयांच्या नोटा हळूहळू चलनात येतील. बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेने आश्वासन दिले आहे की, नव्या नोटा चलनात आल्या असल्या तरी जुन्या नोटा आणि नाणी कायदेशीररित्या चलनात राहतील.
चलनी नोटांमधून देशाच्या संस्थापकाचे चित्र का हटविण्यात आले?
मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर या नवीन नोटा जारी केल्या जात आहेत. २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील व्यापक निदर्शनांनंतर मुजीबूर रहमान यांच्या कन्या शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारला सत्तेवरून हटविण्यात आले, तेव्हापासून अंतरिम सरकार गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशमध्ये सत्तेत असलेल्या शेख कुटुंबाच्या वारशाच्या कथा मिटवण्याचे प्रयत्न करत आहे. शिक्षण क्षेत्रात, राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळाने (एनसीटीबी) २०२५ मधील शैक्षणिक वर्षासाठी ४४१ शालेय पाठ्यपुस्तकांमधील मजकूर सुधारित केला आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाचे संदर्भ पुस्तकांमधून काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते नवीनरित्या मांडण्यात आले आहेत.
काही नवीन पुस्तकांमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेचे श्रेय जनरल झियाउर रहमान यांना देण्यात आले आहे. ते एक लष्करी नेते आणि बांगलादेशचे राष्ट्रपती राहिले आहेत. ‘डेली स्टार’ने वृत्त दिले आहे की, ४०० दशलक्षाहून अधिक सुधारित पाठ्यपुस्तके आधीच शाळांना वितरित करण्यात आली आहेत. युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकारने जामुना कायद्यातही सुधारणा केली आहे. या दुरुस्तीमुळे मुजीबूर रहमान आणि १९७० च्या निवडणुकीत निवडून आलेल्या ४०० हून अधिक राजकीय नेत्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून असणारा अधिकृत दर्जा काढून टाकण्यात आला आहे. त्यांचा उल्लेख आता मुक्तीयुद्धाचे सहकारी म्हणून करण्यात आला आहे.
नोटांवर असलेल्या हिंदू मंदिराचे महत्त्व
सर्वात मुख्य बाब म्हणजे नव्याने डिझाइन करण्यात आलेल्या २० रुपयांच्या नोटेवर कांताजीव मंदिराचे चित्र आहे. १८ व्या शतकातील हे हिंदू मंदिर टेराकोटा वास्तुकला आणि त्याच्या सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखले जाते. डिसेंबर २०१५ मध्ये रास मेळा उत्सवादरम्यान या मंदिरावर बॉम्ब हल्ला झाला होता. या हल्ल्यासाठी आयएसआयशी संलग्न असलेल्या न्यू जमातुल मुजाहिदीन बांगलादेश (न्यू जेएमबी)च्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. असे असले तरी या गटाने अधिकृतपणे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नव्हती.
२०२४ पासून मंदिराच्या परिसरात मशीद बांधल्या जात असल्याच्या बातम्या आल्या, तेव्हा हे मंदिर वादाचे केंद्र ठरले. या वृत्तानंतर हिंदू समुदायाने तीव्र आक्षेप घेतला. बांगलादेशच्या नोटांवर केवळ हिंदू मंदिराचा नसून सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक संरचनांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, १०० रुपयांच्या नोटेवर शैत गुम्बाड मशीद, १० रुपयांच्या नोटेवर बैतुल मुकर्रम मशीद आणि ५ रुपयांच्या नोटेवर तारा मशिदीचे चित्र दिसून येत आहे. २० रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूस पहाडपूर मठ आहे, जे बौद्ध धार्मिक स्थळ आहे आणि दक्षिण आशियातील सर्वात महत्त्वाच्या प्राचीन मठांपैकी एक आहे. हा मठ आठव्या शतकातील असून पाल राजवंशाच्या काळात बांधला गेला आहे.
नवीन चलनावर टीका
अंतरिम सरकारच्या नवीन चलनावर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय निरीक्षकांनी अंतरिम सरकारवर देशाच्या इतिहासातील शेख मुजीबूर रहमान यांचे योगदान कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. १९७१ मध्ये नऊ महिन्यांच्या मुक्ती युद्धादरम्यान त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्या काळात भारतानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, बांगलादेश बँकेचे असे सांगणे आहे की, नवीन मालिका चलन सुरक्षा बळकट करण्यासाठी आहे आणि हे राष्ट्रीय एकता, विविधता आणि सांस्कृतिक वास्तूचे प्रतीक आहे.