CJP Impact on Bankipur Bypoll : अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वातील विद्यार्थी आंदोलनाने केवळ केंद्र सरकारलाच हादरा दिलेला नाही, तर बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीतही भाजपाला हादरा दिल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. सीजेपीच्या आंदोलनाचा मतदारांवर प्रभाव पडला, ज्यामुळे ही मते प्रशांत किशोर यांच्या पथ्यावर पडली. परिणामी प्रशांत किशोर यांच्या राजकीय पदार्पणाचा मार्ग सुकर झाला.

३० जुलैला पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यातच पराभव पत्करावा लागला. तरुणांमधील असंतोषाचा या निवडणुकीवर मोठा प्रभाव पडल्याने भाजपाचे बांकीपूरमधील तीन दशकांचे वर्चस्व संपुष्टात आले, असे विश्लेषकांचे मत आहे.

जंतरमंतरवरील आंदोलनाचा बांकीपूरच्या निकालावर परिणाम?

भाजपाचा अभेद्य गड ढासळला

बांकीपूर हा जवळपास तीन दशकांपासून भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सलग पाच वेळा विजय मिळवत दबदबा कायम राखला, तर त्यांच्या वडिलांनीही १९९५ ते २००५ या काळात बांकीपूरचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, भाजपाच्या या अभेद्य गडात तरुण मतदारांचा मोठा प्रभाव पडला. नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) तब्बल ३७ दिवस आंदोलन केले. या आंदोलनामुळे भाजपाविरोधात नाराजी वाढली आणि त्याचा थेट परिणाम बांकीपूरच्या निकालावर दिसून आल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. भाजपाविरोधातील कौल जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या पथ्यावर पडला. १९ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने किशोर यांनी विजय मिळवला.

तरुण मतदारांची निर्णायक भूमिका

बांकीपूरला बिहारमधील प्रमुख शैक्षणिक केंद्र मानले जाते. येथे विद्यापीठे, महाविद्यालये आणि स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग संस्थांची संख्या मोठी आहे; त्यामुळे नीट पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पारदर्शकतेचा अभाव आणि बेरोजगारीसारखे मुद्दे थेट तरुण मतदारांशी जोडले गेले. यामुळे तरुण मतदार पर्यायी पक्षाकडे म्हणजेच जनसुराज्य पक्षाकडे वळल्याचे यातून दिसते. परिणामी, सत्ताधारी एनडीएला मोठा फटका बसला आहे असेही राजकीय विश्लेषक नमूद करतात.

बिहार पोलिसांच्या कारवाईचाही परिणाम

दिल्लीप्रमाणेच बिहारमध्येही सीजेपीच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर हिंसक कारवाई केली; तर राज्यभरात सुमारे ७०० विद्यार्थ्यांना ताब्यातदेखील घेण्यात आले होते. या कारवाईनंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर सीजेपीने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने माघार घेतली आणि विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या कठोर कारवाईमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली, ज्यामुळे ते अन्य पक्षांकडे वळले, असेही राजकीय विश्लेषक म्हणाले आहेत.

पारंपरिक मतदारांचेही विभाजन

सीजेपीच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या सरकारविरोधी वातावरणाचा जातीय समीकरणांवरही परिणाम झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे. पाटणा शहरातील भाजपाचा मजबूत आधार मानल्या जाणाऱ्या भूमिहार, ब्राह्मण यांसारख्या सवर्ण मतदारांपैकी काही मतदारांचा कल जनसुराज्य पक्षाच्या बाजूने दिसून आला. सरकारविरोधातील नाराजी व्यक्त करण्यासाठी या मतदारांनी अन्य राजकीय पर्याय निवडल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

मतदानाची घटलेली टक्केवारीही ठरली निर्णायक

बांकीपूरमध्ये यंदाच्या पोटनिवडणुकीत केवळ ३४.३० टक्के मतदान झाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत हे प्रमाण ४१.४५ टक्क्यांवर होते. राजकीय वातावरणातील अस्थिरता आणि मतदारांमधील निराशेमुळे मतदानाची टक्केवारी घटल्याचे मानले जात आहे. घटत्या मत टक्केवारीचा भाजपाच्या पारंपरिक संघटनात्मक ताकदीला फटका बसला, तर प्रशांत किशोर यांच्या टार्गेटेड प्रचार मोहिमेला त्यांना सत्ताविरोधी मते स्वत:कडे वळवून घेण्याची संधी मिळाली, असेही निरीक्षकांनी नमूद केले आहे.

आरजेडीची जागा जनसुराज्यने घेतली?

नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनामुळे या निवडणुकीचा केंद्रबिंदू रोजगार, शिक्षण व्यवस्था आणि सरकारची जबाबदारी हे मुद्दे ठरले; त्यामुळे पारंपरिक विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रचारात मागे पडल्याचे दिसून आले. आरजेडीच्या उमेदवार रेखा गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. भाजपाविरोधात मतदान करू इच्छिणाऱ्या मतदारांनी आरजेडीऐवजी जनसुराज्य पक्षाला पर्याय म्हणून स्वीकारल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.