BAT BMS App : भारतीय तरुणांमध्ये मोबाईलचे वेड काही वेगळेच असते. पण त्याहूनही अधिक मोबाईलमधील अॅप्समध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची आणि ट्रेंडच्या मागे धावण्याची त्यांना सवय जडलेली असते. आता भारतीय तरुण मात्र एका चिनी अॅपचा भररस्त्यात ई-रिक्षा थांबवण्यासाठी वापर करत आहेत. त्यामुळे रिक्षावाल्यांसाठी ही नवी डोकेदुखी ठरत आहेत.
सध्या इंटरनेटवर नवा ट्रेंड आला आहे. मोबाईल वापरकर्ते बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) नावाच्या चिनी स्मार्टफोन ॲपचा वापर करुन रस्त्याच्या मध्येच ई-रिक्षा थांबवत आहेत, या ट्रेंडचे व्हिडिओ सोशल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
माहितीनुसार, बॅट-बीएमएस (BAT-BMS) हे मोबाईल अॅप आहे. या अॅपमधून ई रिक्षाला नियंत्रित केले जाऊ शकते. ब्लूटूथद्वारे तिरीस (रिक्षा) किंवा इलेक्ट्रिक स्कूटरला कनेक्ट करता येते. याचा वापर करुन वापरकर्ते डिस्चार्ज स्विच बंद करतात, ज्यामुळे वाहन पुढे जाऊ शकत नाही.
हे अॅप म्हणजे ई-रिक्षा तसेच स्कूटरमधील एक देखभालीचे साधन आहे. प्रत्यक्षात मात्र, अॅपचा वापर खोडसाळपणे केला जात आहे. याचे कारण असे की, ई-रिक्षांमध्ये अनेक स्वस्त, चिनी बनावटीच्या बॅटरी पॅक बसवलेले आहेत, ज्यामध्ये आधीच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असते. मात्र ब्लुटूथ कनेक्शनसाठी कोणताही पासवर्ड, पिन किंवा प्रमाणीकरणाचा नियमच नाही.
व्हायरल व्हिडिओंमध्ये दिसून येते की, तरुण भररस्त्यात तत्काळ वाहने थांबवत आहेत, ज्यामुळे चालकाला जोरदार धक्का बसतो, परिणामी त्याच्या मृत्यूचा धोकाही वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या अॅपचे धोके आणि सुरक्षेसंबंधीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तपासणीनंतर आता हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
BAT-BMS हे नेमकं कसं काम करतं?
बॅटरीचे व्यवस्थापन करणारे हे एक साधन आहे. जे चीनमधील शेन्झेन यांनी शेन्झेन ग्रेनर्जी तंत्रज्ञान वापरुन बनवले आहे. याचे वायरलेस कनेक्शन लिथिअम बॅटरींना जोडले जाते. याबाबतची एक चिंताजनक बाब म्हणजे, अॅपची ब्लूटूथ पेअरिंग क्षमता १० ते १५ मीटरच्या आत काम करते. अधिकृत वेबसाइटनुसार, अॅपमुळे व्होल्टेज, तापमान आणि करंटसह बॅटरीच्या स्थितीचे रिअल-टाइम निरीक्षण करणे शक्य होते. तसेच हे ॲप बॅटरीच्या कार्यक्षमतेवर अचूक नियंत्रण साधण्याची सोय देते, ज्यामुळे वापरकर्त्यांना बॅटरी कंट्रोल करता येतात.
मॅक्सव्होल्ट एनर्जीचे संस्थापक मुकेश गुप्ता यांनी सांगितले की, बीएमएस युनिट्स प्रामुख्याने बॅटरीची स्थिती, ट्रेंड्स आणि चार्जिंगमधील बदलांचा अंदाज घेण्यासाठी बसवले जातात, ज्यामुळे बॅटरी उत्पादकांना वाहन ट्रॅक करणे सोयीचे होते. गुप्ता यांनी असेही नमूद केले की, बॅटरीचे आयुष्य, वापराची पद्धत आणि लोकेशन यावर सतत देखरेख ठेवण्यासाठी टेलिमॅटिक्स प्रणालीचा वापर केला जातो. ही प्रणाली बॅटरीचे निरीक्षण कऱण्यासोबतच गरज पडल्यास ती दूरवरुन बंद करण्याची सुविधाही देते.
हे ॲप वापरकर्त्यांना बॅटरीचे दूरस्थपणे (Remotely) नियंत्रण करण्याची सुविधा देते. त्यामुळे भारतात अनेक जण या सुविधेचा गैरवापर करत असल्याचे आढळून आले आहे.
काही बजेटमध्ये असणाऱ्या ई-रिक्षा आणि स्कूटरमध्ये या बीएमएस प्रणालीचा वापर केला जातोय, पण सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. त्या अॅपमधील ब्लुटुथची डिफॉल्ट सेंटिंग सुरुच ठेवली जाते, त्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना कोणत्याही पासवर्ड शिवाय त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. त्यामुळे ते वाहनाचा वीजपुरवठा त्वरित बंद करुन ते अचानक भरस्त्यात थांबवल्या जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, गैरप्रकारांमुळे हे ॲप आयओएस ॲप स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. पण गूगल प्ले स्टोअरवर अजून उपलब्ध आहे. पण माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस. कृष्णन यांनी सांगितले की, ॲप्स प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहेत.
इंटरनेटवर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
अनेकांनी लिहिलं की, ‘ही बदला घेण्याची वेळ आहे.’ एका व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, तिरी वाल्यांनी खूप सतावलं आहे, आता त्यांना भोगावं लागेल. (बहोत परेशान किया है तिरी वालों ने, अब इनकी रेल बनेगी).
मात्र, व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमुळे ऑनलाइन धोका उद्धवत असल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात येत आहे. या ट्रेंडमुळे अपघात किंवा वाहतूक कोंडी होऊ शकते, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले आहे. हे अॅप ‘काहींसाठी मजा, पण काहींसाठी उपजीविकेचे साधन आहे,’ असेही एकाने म्हटले. तर, दुसरा म्हणतो, ‘कल्पना करा, जर वाहन रस्त्याच्या मधोमध थांबले तर… ते लोकांच्या जीवावर बेतू शकते.’
‘ई-रिक्षा चालवणारा बरोबर असो वा नसो, अॅपचा वापर करुन रिक्षा मध्येच थांबवण्याची परवानगी कोणालाही देऊ नये. ते सुद्धा माणसेच आहेत आणि ती ई-रिक्षा त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे,’ असे एकाने म्हटले आहे. टाइम्स इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
