Ayatollah Seyyed Ali Khamenei : १९८९ मध्ये इराणचे प्रमुख होण्यापूर्वी साधारण सात ते आठ वर्षे आधी अयातुल्ला खामेनी यांनी भारताचा दौरा केला होता. १९८० ते १९८१ या कालावधीत धर्मगुरु म्हणून खामेनी यांनी कर्नाटक आणि काश्मीरचा दौरा केला होता. यानंतर काही वर्षांनी तेहरान या ठिकाणी त्यांनी भारतीय नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी भारत दौऱ्याच्या आठवणी जागवल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु आणि मौलाना आझाद यांचं कौतुक केलं होतं. भारतातील धार्मिक विविधता आणि विविध समुदायाचे लोक एकत्र राहणं या सगळ्या परंपरेचं त्यांनी कौतुक केलं होतं. इराणचे सर्वोच्च नेते होण्याआधी त्यांनी केलेला भारत दौरा ऐतिहासिक ठरला होता यात शंकाच नाही.

खामेनी अलीपूरमध्ये गेले होते

इराणच्या दस्तावेजातून ही माहितीही समोर आली आहे की वयाच्या ४१ व्या वर्षी म्हणजेच इराण क्रांतीनंतर दोन वर्षांनी आणि ऑक्टोबर १९८१ मध्ये राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारण्याच्या काही कालावधी आधी खामेनी यांनी भारताचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी बंगळुरू तसंच अलिपूरला भेट दिली होती. अलिपूर हे कर्नाटकच्या राजधानीपासून साधारण ७५ किमीवर असलेलं गाव आहे. अलिपूरमध्ये शिया मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो हे खामेनी यांना ठाऊक होतं. त्यामुळेच त्यांनी हा दौरा केला होता. खामेनी यांच्या या दौऱ्याची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरही देण्यात आली होती. १९८१ मध्ये बंगळुरु आणि अलिपूरमध्ये मुस्लिम समुदायाच्या मोठ्या गर्दीने त्यांचं स्वागत केलं होतं. १९८१ ते ८२ च्या दरम्यान इराण सरकारच्या मदतीने मिळून बांधण्यात आलेल्या एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यासाठीच त्यांनी या अलिपूरचा दौरा केला होता. अलिपूर या ठिकाणी खामेनी यांनी केलेला दौरा महत्त्वाचा ठरला. आजही या गावात इराणी मदरसे आहेत. तसंच इथले विद्यार्थी तेहरान आणि मशहद सारख्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. १९८० च्या दशकात या सगळ्याची सुरुवात झाली होती.

श्रीनगरमध्ये काही सभांना खामेनी यांनी संबोधित केलं होतं

इराणच्या लेखांमध्ये आलेल्या माहितीनुसार १९८१ मध्ये खामेनी यांनी काश्मीर दौराही केला होता. खामेनी यांनी श्रीनगरमध्ये काही सभा घेतल्या होत्या. काश्मिरी कार्यकर्ते कल्बी हुसैन रिजवी यांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यात त्या काळी धार्मिक तणाव वाढला होता. अशा काळात खामेनी यांनी या भागाचा दौरा केला होता. शुक्रवारी त्यांनी जुम्मा नमाजचं पठण केलं. काश्मीरच्या मौलवींसमोर उभं राहून त्यांनी १५ मिनिटं भाषण केलं होतं.

Supreme Leader Ayatollah Ali Khamenei Death
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचा मृत्यू (फोटो-सोशल मीडिया)

रिझवी यांनी आणखी एका दिवसाची आठवण सांगितली होती

रिझवी यांनी या दिवसाची आणखी एक आठवण सांगितली, त्यांनी त्यांच्या लेखात लिहिलं होतं की खामेनी यांनी जे भाषण केलं त्या दिवसापर्यंत शिया आणि सुन्नी या समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद होते. जर एखादा शिया मुसलमान सुन्नी मशिदीत गेला तर नंतर सुन्नी समुदाय मशिद पवित्र करायचा. आमची मशिद शिया धर्माचा माणूस आल्याने मशिद अपवित्र झाली असं म्हणायचे. मात्र खामेनी यांच्या भाषणाने हे सगळं चित्र बदललं. शिया आणि सुन्नी मुस्लिमांना एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या भाषणाचा प्रभाव चांगल्या पद्धतीने पडला. शिया समाजातील मुस्लिमांसाठी सुन्नी मशिदींमध्ये जाऊन नमाज पठण करणं ही गोष्ट सामान्य झाली. कुठल्याही भीतीशिवाय आणि दहशतीशिवाय शिया समाज आणि सुन्नी समाज एकरुप झाला त्यांच्यात आदानप्रदान वाढलं आणि परस्पर संबंधही सुधारले. १५ मिनिटांच्या त्यांच्या भाषणाचा हा सकारात्मक परिणाम झाला हे मान्य करावंच लागेल असं रिझवी यांनी त्यांच्या लेखात म्हटलं होतं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

खामेनी यांनी केली होती महात्मा गांधींची स्तुती

२०१२ मध्ये पंतप्रधान पदावर असलेल्या मनमोहन सिंह यांनी तेहरानचा दौरा केला होता. त्यावेळी खामेनी यांनी त्यांना भारत दौऱ्याबाबत माहिती दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीतील नोंदींनुसार खामेनी यांनी या बैठकीत महात्मा गांधींच्या देशप्रेमाचं कौतुक करत त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले होते. तसंच पंडित नेहरुंच्या आठवणीही त्यांनी जागवल्या होत्या. यावेळी त्यांनी भारताचा जो दौरा केला त्याची आठवण मनमोहन सिंह यांना सांगितली होती. तसंच भारतातील धार्मिक वैविध्याचं त्यांनी कौतुक केलं होतं. त्यावेळी खामेनी यांनी सांगितलं होतं की कबीर स्ट्रीट नावाच्या एका गल्लीत मी गेलो होतो, त्यावेळी शिख समुदायाच्या सदस्यांना मी भेटलो होतो, ते विविध प्रकारचे व्यवसाय करत होते. शिख धर्म आणि भारतातली विविधतेली एकता ही त्यांना ठाऊक होती अशी आठवण त्यांनी मनमोहन सिंह यांना सांगितली होती.

खामेनी यांचा दौरा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला

१९८९ मध्ये इराणचे प्रमुख झाल्यानंतर खामेनी यांनी एकही औपचारिक किंवा राजकीय भारत दौरा केला नाही. भारतीय नेते त्यांना तेहरानला जाऊन भेटले होते, तसंच बहुपक्षीय परिषदांमध्ये त्यांची भेट भारतीय नेत्यांशी झाली होती. खामेनी यांनी त्यांच्या भाषणात भारताचा उल्लेख अनेकदा केला होता, तसंच त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद आणि कवी मोहम्मद इकबाल यांचाही उल्लेख अनेकदा केला होता. त्यांनी १९८१ मध्ये केलेला दौरा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला होता. खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता या आठवणीही ताज्या झाल्या आहेत. त्यांचा इराणचे प्रमुख होण्यापूर्वीचा भारत दौरा हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला होता.