अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा अपघात झाल्यानंतर एअर इंडिया विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. या अपघातानंतर एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक अडचणी किंवा इतर त्रुटींच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अशातच आता एका महिला डॉक्टरने एअर इंडियाचे विमान क्रॅश करण्याची धमकी दिल्याने तिला अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या सुरतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात ही घटना घडली. विमानात गोंधळ निर्माण केल्याबद्दल आणि अपघात घडवण्याची धमकी दिल्याबद्दल या महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? अशा गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

प्रकरण काय?

  • मंगळवारी (१७ जून) दुपारी बंगळुरूमध्ये ही घटना घडली. डॉक्टर हिरल मोहनभाई व्यास असे गोंधळ घालणाऱ्या महिलेचे नाव आहे, ती येलहंका येथील रहिवासी आहे.
  • एअर इंडियाच्या विमान एआय १७१ च्या अपघातानंतर काही दिवसांतच ही घटना घडल्याने विमानातील प्रवासी घाबरले होते.
  • एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला अपघाताची धमकी दिल्याचा आरोप या महिला डॉक्टरवर आहे.
  • ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, येलहंका येथील ३६ वर्षीय डॉ. हिरल मोहनभाई व्यासला या घटनेनंतर विमानातून खाली उतरवण्यात आले आणि अटक करण्यात आली.
या आठवड्याच्या सुरुवातीला मंगळवारी दुपारी बंगळुरूमध्ये ही घटना घडली. डॉक्टर हिरल मोहनभाई व्यास असे गोंधळ घालणाऱ्या महिलेचे नाव आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. हिरल यांचा सीट नंबर २०F होता. मात्र, त्यांनी त्यांचे समान पहिल्याच रांगेत ठेवले, त्यामुळे त्यांना त्यांचे सामान स्वतःच्या सीटजवळील ओव्हरहेड डब्यात ठेवण्याची विनंती कॅबिन क्रूने केली. त्यानंतर डॉ. हिरलने विमान क्रॅश करण्याची धमकी दिली, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यानंतर केबिन क्रूने वैमानिकाला या गोंधळाची माहिती दिली. क्रू आणि वैमानिकाने तिला शांत करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र तरीदेखील तिने सहकार्य करण्यास नकार दिला. ‘एनडीटीव्ही’ने वृत्त दिले की, ती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर प्रवाशांवरही ओरडली. त्यानंतर वैमानिक आणि क्रूने विमानतळ सुरक्षा आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांनी तिला विमानातून बाहेर काढले. तक्रारीनुसार, ही घटना १७ जून रोजी दुपारी २.४५ ते ५.३० वाजेपर्यंत सुरू होती.

पोलिसांनी सांगितले की, केआयए पोलिस ठाण्यामध्येही तिचे आक्रमक वर्तन सुरूच होते. तिच्यावर पोलिस ठाण्यातही अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. “पोलिस ठाण्यात अशा प्रकारची अपशब्द वापरण्याची ही पहिलीच वेळ होती,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘बिझनेस स्टँडर्ड’ला सांगितले. तिचे पती बंगळुरूमधील एका शैक्षणिक संस्थेत काम करतात आणि मूळ ओडिसाचे राहिवासी आहेत. तिच्या पतीने पोलिसांना सांगितले की, तिने डॉक्टर म्हणून काम आता थांबवले आहे आणि कुटुंबाला भेटण्यासाठी ती गुजरातला जात आहे. त्याने असेही सांगितले की, तिने यापूर्वीही अशाच प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण केला होता.

अशा वागणुकीसाठी शिक्षेची तरतूद काय?

बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी डॉ. हिरल व्यासवर भारतीय न्याय संहिताच्या कलम ३५१(४) (निनावी संदेशाद्वारे गुन्हेगारी धमकी देणे) आणि ३५३(१)(ब) (सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन घडवून आणणारी विधाने) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, कलम ३(१)(अ) नागरी विमान वाहतूक सुरक्षेविरोधात बेकायदा कृत्य करणे, या अंतर्गतदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३(१)(अ) मध्ये विमानाची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या विमानातील हिंसाचाराच्या कृत्यासाठीही शिक्षेची तरतूद आहे.

काही दिवसांपूर्वी अशाच स्वरूपाच्या एका घटनेत २२ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीनगर येथील सदाद मोहम्मद बाबा नावाच्या तरुणाने विमानतळाच्या टर्मिनल १ वरील प्रस्थान गेट ८ मधून जबरदस्तीने जाण्याचा प्रयत्न केला. त्याला सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी थांबवले तेव्हा त्याने एका सुरक्षा अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. पोलिसांनी या तरुणावर भारतीय न्याय संहिताच्या कलम १३२ (सरकारी सेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा बळजबरी), २२१ (सरकारी सेवकाच्या सरकारी कामात अडथळा आणणे) आणि ३२९(२) (गुन्हेगारी अतिक्रमण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय किंवा अधिकाराशिवाय त्याच्या मालमत्तेत, जसे की जमीन, घर किंवा इतर ठिकाणी प्रवेश करणे) या कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअर इंडियाच्या अपघातानंतरही तांत्रिक अडचणींचे सत्र कायम

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान एआय १७१ च्या अपघातात २४२ पैकी २४१ प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लंडनला निघालेले विमान लगेचच कोसळले. विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर हे विमान कोसळल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या सुमारे २९ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली किंवा वळवण्यात आली आहेत. एअरलाइन्सने उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि सुदूर पूर्वेकडील शहरांना जोडणाऱ्या १६ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. २१ जून ते १५ जुलैदरम्यान हे तीन मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.