Prostate Cancer Symptoms: इस्त्रायलचे ७६ वर्षीय पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी आपण स्वतः प्रोस्टेट कॅन्सरसाठी (पुर:स्थ ग्रंथीचा कर्करोग) उपचार घेतले आणि आता बरे आहोत, असा खुलासा केला. त्यांच्या वार्षिक वैद्यकीय रिपोर्टबरोबर प्रसिद्ध झालेल्या माहितीत म्हटले आहे की, त्यांच्या शरीरात प्रोस्टेट कॅन्सरची प्राथमिक टप्प्यातील गाठ आढळून आली होती. या गाठीवर रेडिएशन थेरपीद्वारे (Targeted Radiation Therapy) उपचार करण्यात आले. निदान केव्हा झाले आणि उपचार केव्हा पार पडले याबाबत मात्र त्यांनी काहीही सांगितले नाही. या उशिरा झालेल्या खुलाशामुळे फक्त इस्रायलमध्येच नव्हे, तर जगभरात एक मूलभूत प्रश्न पुन्हा समोर आला आहे, तो म्हणजे सार्वजनिक आयुष्यातील प्रभावशाली पुरुष स्वतःच्या आरोग्याबद्दल इतके मौन का बाळगतात आणि त्याचा समाजाच्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेवर काय परिणाम होतो? त्याच पार्श्वभूमीवर पुरुषांमध्ये वाढणार्या या आजाराच्या लक्षणांचा घेतलेला हा आढावा.
पुरुषांचे आरोग्य ही ‘गुप्त’ गोष्ट?
नेतान्याहू प्रकरणाचे महत्त्व केवळ राजकीय नाही; तर ते पुरुषांच्या आरोग्यविषयक संस्कृतीवर प्रकाश टाकते. प्रोस्टेट कॅन्सर हा बहुतेकदा संथ गतीने वाढणारा कर्करोग असला, तरी तो सुरुवातीला जवळपास लक्षणविरहित असतो. म्हणूनच अनेक पुरुष तपासणी पुढे ढकलतात, आणि निदान उशिरा होते. नेतान्याहूंसारख्या हाय-प्रोफाइल नेत्याने आजार गुप्त ठेवणे हा वैयक्तिक निर्णयाचा भाग असला, तरी त्यातून पुरुषांचे आरोग्य ही एक ‘गुप्त’ किंवा चार भिंतींच्या आतली गोष्ट मानली जाते, असेच सूचित होते. भारतातही परिस्थिती तशीच आहे. भारतात पुरुषांचे आरोग्य हे अजूनही दुय्यम स्थानावरच आहे. त्यामुळेच प्रोस्टेट कॅन्सरचे वाढते प्रमाण समाजस्वास्थ्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

भारतीय पुरुषांसाठी धोक्याची घंटा
५० वर्षांवरील पुरुषांमध्ये आढळणारा हा रोग आता ५० वर्षांखालील पुरुषांमध्येही दिसू लागला आहे. आयसीएमआर आणि एनसीडीआयआर यांनी २०२३ साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, देशात ४२६४० नवीन रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, अवघ्या एका वर्षात २०२४ अखेरपर्यंत हा आकडा १.१५ लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्लोबोकॉन २०२३ च्या अहवालानुसार, हा भारतीय पुरुषांमधील सातवा सर्वात मोठा कॅन्सर ठरला असून, अवघ्या तीन वर्षांत यात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?
प्रोस्टेट म्हणजे पुरुषांच्या पुनरुत्पादन संस्थेतील एक लहान ग्रंथी. ही ग्रंथी मूत्राशयाखाली असते आणि वीर्याच्या द्रव घटकाच्या निर्मितीत मदत करते. हा द्रव शुक्राणूंना (Sperm) पोषण देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. शुक्राणूंना हालचाल करण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी या ग्रंथीचा स्राव अत्यंत आवश्यक असतो, या प्रक्रियेमुळे पुरुषाची प्रजनन क्षमता टिकून राहते. साधारणपणे तिचा आकार एका अक्रोडाइतका (Walnut-sized) असतो. या ग्रंथीतील पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर.
उशिरा निदान घातक ठरू शकते
डॉ. देवेंद्र कुमार शर्मा (डायरेक्टर, युरोलॉजी आणि रीनल ट्रान्सप्लांट, CK बिर्ला हॉस्पिटल्स, जयपूर) यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना संगितले की, या आजारात सुरुवातीच्या अवस्थेत कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाही. त्यामुळे लक्षणे नाहीत म्हणजे धोका नाही हा समज अत्यंत धोकादायक ठरतो. रोगाचे निदान लवकर झाल्यास उपचारांमध्ये यश मिळण्याचे प्रमाण अधिक असते; उशिरा निदान झाल्यास रोग हाडे, लिम्फ नोड्स किंवा इतर अवयवांत पसरू शकतो.
लक्षणं काय आणि डॉक्टर काय सांगतात?
लक्षणांचा विचार केला तर सुरुवातीला वारंवार लघवीला जाणे, रात्री अनेकदा उठावे लागणे, लघवी सुरू करण्यास त्रास होणे, लघवीचा प्रवाह कमी होणे, लघवीत किंवा वीर्यात रक्त दिसणे अशी चिन्हे आढळू शकतात. रोग प्रगत अवस्थेत गेल्यावर पाठदुखी, हाडदुखी, अनपेक्षित वजन घटणे, अशक्तपणा, इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा लघवीवर नियंत्रण न राहणे अशी गंभीर लक्षणे दिसू शकतात. मात्र हीच लक्षणे सौम्य प्रोस्टेट वाढ, संसर्ग किंवा इतर मूत्रसंस्थेच्या तक्रारींमध्येही दिसू शकतात; म्हणून स्वतः निष्कर्ष काढण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉ. शर्मा पुढे यांनी संगितले की, या आजारात लघवीवर परिणाम होतो. हे बदल इतर कारणांमुळेही होवू शकतात. त्यामुळे कुठल्याही स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डॉ. अरुण कुमार बालकृष्णन (मॅनेजिंग डायरेक्टर, प्रमुख युरोलॉजिस्ट, रोबोटिक सर्जन व युरो-ऑन्कोलॉजिस्ट, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड युरोलॉजी, चेन्नई) यांनीही डॉ. शर्मा यांच्या मताला दुजोरा देत म्हटले आहे की, ही लक्षणे गंभीर असू शकतात. वेळेवर युरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन योग्य चाचण्या केल्यास उपचार अधिक यशस्वी होतात. जागरूकता वाढवणे आणि पुरुषांना नियमित आरोग्य तपासणीस प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
Prostate-Specific Antigen
प्रोस्टेट कॅन्सरच्या निदानासाठी PSA म्हणजे Prostate-Specific Antigen ही रक्तचाचणी महत्त्वाची ठरते. ही चाचणी रक्तातील PSA चे प्रमाण मोजते. परंतु PSA वाढला म्हणजे कॅन्सरच आहे, असा अर्थ होत नाही; सौम्य प्रोस्टेट वाढ किंवा प्रोस्टेटायटिसमुळेही तो वाढू शकतो. म्हणून PSA ही निदानाची अंतिम चाचणी नसून एक स्क्रिनिंग किंवा पुढील तपासण्यांचा दिशादर्शक आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर शारीरिक तपासणी, MRI आणि बायोप्सी सुचवू शकतात. डॉ. शर्मा सांगतात, लक्षणं दिसेपर्यंत रोग बर्याचदा प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो. त्यामुळे PSA ही रक्तचाचणी वेळीच करणे महत्त्वाचे आहे.
शहरी भागातही कमी चाचण्या
पश्चिमी देशांमध्ये PSA स्क्रिनिंग नियमित होत असल्यामुळे ८०-९०% प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांचे निदान लवकर करता येते. भारतात मात्र ७०-८०% प्रकरणे प्रगत अवस्थेत आढळतात. २०२३ साली भारतात शहरी भागातील फक्त १७ टक्के पुरुषांनी वयाच्या पन्नाशी नंतर ही चाचणी करून घेतल्याचे एलसीडीआयआरच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. शहरी भागात जर चाचण्याचे प्रमाण अत्यल्प असेल तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याची कल्पना करता येऊ शकते. ग्रामीण भागात हे प्रमाण ५ टक्यांपेक्षाही कमी आहे.
चाचणी कधी करावी?
Mayo Clinic आणि इतर वैद्यकीय मार्गदर्शक स्रोतांनुसार, ५० वर्षे वय झाल्यानंतर पुरुषांनी प्रोस्टेट तपासणीबाबत डॉक्टरांशी बोलावे. परंतु ज्यांच्या कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचा इतिहास आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या वडिलांना किंवा भावाला प्रोस्टेट कॅन्सर झाला असेल, तर त्या व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका सामान्य पुरुषांपेक्षा दोन पटीने जास्त असतो. त्यांनी ४० ते ४५ वर्षांदरम्यानच तपासणीबाबत विचार सुरू करावा. शिवाय, BRCA1 आणि BRCA2 जनुकातील दोष असलेल्या पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. इतकेच नाही, तर त्यांच्यातील कॅन्सर हा अधिक ‘अॅग्रेसिव्ह’ (Aggressive) म्हणजे वेगाने पसरणारा असू शकतो. अशा पुरुषांना स्वादुपिंडाचा (Pancreatic) आणि पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे अशा पुरुषांनी वेळोवेळी तापसणीला प्राधान्य द्यावे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने जेनेटिक टेस्ट करून घ्यावी.
पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर वाढण्याची प्रमुख कारणे
प्रोस्टेट कॅन्सरची झपाट्याने वाढत चाललेली ही समस्या मुख्यत्वे शहरी भागात अधिक आढळते. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू या शहरांमध्ये नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. IARC च्या GLOBOCAN 2022 भारत फॅक्टशीटनुसार भारतात २०२२ साली प्रोस्टेट कॅन्सरची अंदाजे ३७,९४८ नवी प्रकरणे आणि १८,३८६ मृत्यू नोंदले गेले. हे प्रमाण स्तन, तोंड, गर्भाशयमुख किंवा फुफ्फुसांच्या कर्करोगाइतके चर्चेत नसले तरी ते दुर्लक्ष करण्याइतके लहान नाही. भारतामधील शहरीकरण, वाढते आयुर्मान, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च-चरबीयुक्त आहार या सर्वांचा एकत्रित परिणाम प्रोस्टेट कॅन्सरच्या वाढत्या जोखमीशी जोडला जातो. एम्स दिल्लीच्या २०२४ च्या अहवालानुसार, प्रोस्टेट कॅन्सर रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्ण लठ्ठ, तर ३५ टक्के मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाने त्रस्त होते. दारू व तंबाखू सेवनामुळेही हा त्रास वाढत असल्याचे दिसून येते.
मोजक्या रुग्णालयांत आधुनिक उपचार सुविधा
याहून गंभीर बाब म्हणजे भारतात निदान बहुधा उशिरा होते. यामागे लाज वाटणे, आरोग्य तपासणीबाबत उदासीनता, पुरुषांनी वेदना वा लक्षणे दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती, प्राथमिक पातळीवरील कमी जागरूकता आणि विशेष सेवा मिळण्यातील असमानता हे घटक कारणीभूत ठरतात. महानगरांतील काही तृतीयस्तरीय रुग्णालयांत रोबोटिक सर्जरी, प्रगत रेडिएशन आणि मल्टिडिसिप्लिनरी कॅन्सर केअर उपलब्ध असली, तरी देशाच्या बहुतेक भागात निदान व उपचार यांच्यामध्येच अंतर पडते. परिणामी, लवकर निदान होणारा रोग उशिरा आणि अधिक खर्चिक स्वरूपात समोर येतो.
टाटा मेमोरियलमध्ये रोबोटिक सर्जरी, एम्समध्ये ब्रेकीथेरपी, आणि जेआयपीएमईआरमध्ये लॅप्रोस्कोपिक प्रोस्टेटेक्टॉमी उपलब्ध आहे. परंतु ग्रामीण व निमशहरी भागात अशा सुविधांचा अभाव आहे. प्रधानमंत्री जनस्वास्थ्य योजनेत मोफत उपचार असले तरी एनएचएच्या २०२४ च्या आकडेवारीनुसारर केवळ ८ टक्के रुग्णांनी याचा लाभ घेतला होता. बाकी ९२ टक्के रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये काही लाखांपर्यंत खर्च करावा लागला.
