Supari contract killing महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. ते काल सायंकाळी बीडमध्ये दाखल झाले. त्यावेळी एका मोठ्या जमावाने राज ठाकरे यांचा ताफा अडवला. जमलेल्या अनेकांकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्ह असलेले झेंडे दिसत होते. दरम्यान, राज ठाकरे यांचं स्वागत ज्या ठिकाणी केलं जाणार होतं त्या ठिकाणी या जमावाने सुपाऱ्या फेकल्या आणि ‘सुपारीबाज, सुपारीबाज’ अशा घोषणा देखील दिल्या. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि विरोधी कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, राज ठाकरे यांनी लोकसभेला सुपारी घेऊन (भाजपाला) बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभेला ते कोणाची सुपारी घेऊन मराठवाड्यात आले आहेत? हे विचारण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. एकूणच गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेकडून मनसेसाठी सुपारीबाज, सुपारी घेणारा पक्ष असे उपहासाने म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: महात्मा गांधी यांनी पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट आणि राम यांचा नेमका काय संबंध आहे?

हे एकच उदाहरण नाही. तर २०२२ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला पेगाससवरील रिपोर्टसाठी ‘सुपारी मीडिया’ असे संबोधले होते. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या रिपोर्टमध्ये इस्रायली सायबर सुरक्षा कंपनी एनएसओ ग्रुपचे हेरगिरी सॉफ्टवेअर विकत घेतलेल्या देशांपैकी भारत एक असल्याचे म्हटले होते. सिंग यांनी ट्विटरवर केलेल्या त्यांच्या पोस्ट मध्ये म्हटले होते, ‘तुम्ही NYT वर विश्वास ठेवू शकता का? ते ‘सुपारी मीडिया’ म्हणून ओळखले जातात.’ या दोन्ही उदाहरणांमध्ये सुपारी देणं किंवा घेणं याचा संदर्भ नकारात्मक भूमिकेतून देण्यात आला आहे. परंतु एखाद काम पूर्ण करण्यासाठी पान-सुपारी उचलण्याच्या परंपेरला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये एखादं काम करण्याचा निर्णय घेण्यासाठी ‘सुपारी उचलणं’ हा शब्द वापरला जातो. भारतीय राजकारणात तर सुपारी हा आवडता शब्द आहे.

सुपारी आणि मुंबईचा संबंध:

सुपारी हा शब्द गँगलँड कॉन्ट्रॅक्ट किलिंगसाठी देखील पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो. याशिवाय या शब्दाचा अर्थ काहीवेळा ‘हिट जॉब’असा देखील घेतला जातो. दरवेळी यात खूनाचा समावेश नसतो, परंतु राजकीय किंवा वैचारिक प्रतिस्पर्ध्याची निंदा करणे, बदनामी करणे, अपमान करणे किंवा छळ करणे हा हेतू आहे. सुपारी या शब्दाचा मूळ अर्थ वेगळाच आहे. संस्कृतिकोशात (खंड १०) या शब्दाच्या व्युत्पत्ती विषयी माहिती देण्यात आली आहे. सु आणि पारी या दोन शब्दांच्या संयोगाने हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ चांगला गर असलेले फळ असा होतो. संस्कृत शूर्पारक शब्दाच्या अपभ्रंशाने सुपारी शब्द तयार झाल्याचे मानले जाते. सुपारीची लागवड भारतात सर्वप्रथम मुंबई जवळच्या समुद्रकिनारी झाली. नालासोपारा हे त्या गावाचे नाव होय. त्यातल्या सोपारा या शब्दावरून सुपारी शब्द रूढ झालेला असावा. सुपारीला पूगीफल असे दुसरे नाव आहे. पुगफल असेही म्हणतात. पूग म्हणजे समूह. ही फळे समूहाने म्हणजे घडाने लागतात, म्हणून त्यांना हे नाव मिळाले असावे.

अधिक वाचा: शत्रूच्या कवट्या गोळा करणाऱ्या राजाचे मतपरिवर्तन कसे झाले? काय होते मध्ययुगीन जैन धर्माचे स्वरूप?

सुपारीला भारतीय संस्कृतीत महत्त्व:

सुपारीचा संबंध हा कराराशी जोडला जातो. दरवेळी यात खून करणे समाविष्ट नसले तरी नेमून दिलेले काम करण्याचा करार असतो. सुपारी देणं किंवा घेणं या शब्दांना आज नकारात्मक वलय जरी प्राप्त झालं असलं तरी, सुपारीच्या माध्यमातून करारबद्ध होणं याची पाळ-मूळ ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीत सापडतात. पान आणि सुपारी घेऊन पाहुण्यांना लग्नाला आमंत्रित करण्याचा प्रघात ग्रामीण महाराष्ट्रात आहे. एकूणच पान-सुपारी करारासाठी-वचनबद्धता दर्शवण्यासाठी दिली गेली, हीच परंपरा एखाद्या कामाच्या पूर्ततेसाठी देखील वापरली गेली. सुपारीला भारतीय संस्कृतीत बरेच महत्त्व आहे. कोणत्याही मंगल कार्याच्या प्रारंभी गणपती म्हणून सुपारीवरच प्रतिकात्मक पूजा करतात. वाङ्निश्चयाच्या वेळी मंगलकारक म्हणून सुपारीच फोडतात. त्यावेळी जमलेल्या लोकांना सुपारी देण्याची परंपरा आहे. मंगल कार्यात जमलेल्या लोकांना पान सुपारी वाटण्याचा प्रघात आहे.

शान्तिक, पौष्टिक, इत्यादी कृत्ये पुरोहिताच्या हस्ते करावयाची असतात. तेंव्हा यजमान आचार्यांच्या हातावर सुपारी देऊन तो अधिकार आचार्यांना देतो. त्या गोष्टीला आचार्यवरण म्हणतात. कृत्य समाप्त झाल्यावर आचार्य तीच सुपारी यजमानाच्या ओंजळीत टाकतो. याला श्रेयोदान म्हणतात. पाहुणे घरी आल्यावर त्यांचे स्वागत म्हणून पानसुपारी देतात. म्हणजेच कार्य सुरु करण्यापूर्वी सुपारी देण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे. षोडशोपचार पूजेत देवालाही पानसुपारीचा विडा देतात. उत्तर भारतात मृताशौच असलेल्या माणसाला सुपारीच्या बागेत जाऊ देत नाहीत. सुपारीत काही जादू टोण्याचे गुण आहेत असी बंगाली लोकांची समजूत आहे.

पैजेचा विडा

निवृत्त मुंबई पोलीस एसीपी वसंत ढोबळे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत म्हटले होते की, ७० च्या दशकात पोलिसांत भरती झालेल्यांपैकी बहुसंख्य लोक हे ग्रामीण महाराष्ट्रातून आलेले होते आणि त्यांनी आपली भाषा आणि अभिव्यक्तीबरोबर आणली. त्याचाच परिणाम म्हणून ज्या काळात मुंबई अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारी कारवाया शहरात वाढल्या आणि टोळीयुद्ध नेहमीचंच झालं, ‘त्यावेळी उसका सुपारी इसने दिया’ ही अभिव्यक्ती या संदर्भात जोडली गेली. ‘डोंगरी टू दुबई: सिक्स डिकेड्स ऑफ द मुंबई माफिया’ या पुस्तकात पत्रकार- लेखक एस हुसैन झैदी यांनी सुपारीच्या उत्पत्तीची एक रंजक परंपरा दिली आहे.

ही परंपरा माहीम येथील माहेमी जमातीच्या मुख्याकडून पाळली जात होती. त्याचे नाव भीम होते. झैदी यांनी दिलेल्या संदर्भानुसार भीमाला जेव्हा एखादे कठीण काम सोपवायचे असते तेव्हा तो माहीमच्या किल्ल्यावर आपल्या योद्ध्यांची बैठक बोलवायचा. जिथे भव्य मेजवानीनंतर सुपारी असलेले एक तबक आणले जायचे आणि मेळाव्याच्या मध्यभागी ठेवले जात होते. जो ते जोखीम असलेले काम स्वीकारे तो त्या तबकातील विडा उचलत असे. झैदी यांनी जरी माहीम मधल्या या जमातीचा संदर्भ दिला तरी भारतात एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी विडा उचलण्याची परंपरा फार पूर्वीपासून अस्तित्त्वात होती, त्याचे वाङ्मयीन पुरावेही उपलब्ध आहेत. विजापूरच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी ‘विडा’ ठेवण्यात आला होता आणि बड्या बेगम साहिबाने सवाल केला, शिवाजीला कोण पकडून आणणार?, त्यावर दरबारात भयाण शांतता पसरली. सर्व जण माना खाली घालून बसले होते. कोणीच पुढे आलं नाही. शेवटी तिच्या परत विचारण्यावर अफझलखान पुढे आला. त्याने बादशहाला कुर्निसात करून मोठ्या त्वेषाने, ‘मै लाउंगा सिवाको.’ असे म्हणून ‘विडा’ उचलला. म्हणूनच आपल्याला पैजेचा विडा उचलण्यासारखे वाक्प्रचार वाङ्मयात सापडतात.

अंडरवर्ल्ड आणि सुपारी घेणं

८० आणि ९० च्या दशकात मुंबईच्या गल्लीबोळात हिट जॉब्स सर्रास सुरू होते आणि असा समज होता की ज्याला प्रतिस्पर्ध्याच्या काटा काढायचा आहे तो अंडरवर्ल्ड टोळीला सुपारी देतो. सुपारीचे मूल्य नेमके काय असेल हे ज्याची सुपारी घेतली आहे त्याच्यावर, आणि त्यानंतरच्या परिणामांवर ठरत असे. हे मूल्य हप्त्यांवर दिले जात असे, एकदा का काम पूर्ण झालं की शेवटचा हप्ता दिला जात असे. बहुतेक प्रकरणांमध्ये, सुपारी देणारी व्यक्ती त्या व्यक्तीचा ठावठिकाणा आणि हल्ल्यासाठी सर्वोत्तम संभाव्य वेळ आणि ठिकाण याची देखील माहिती देत असे. माफिया हिट्सच्या क्लासिक स्टाईलमध्ये ज्या व्यक्तीने सुपारी घेतली आहे, ती व्यक्ती आपले काम पूर्ण करण्याअगोदर काही दिवस आधी टार्गेटच्या हालचालींवर,सवयींवर लक्ष ठेवत होती. ठरलेलं काम पूर्ण केल्यावर या गुन्ह्याचा शोध पोलीस घ्यायला लागतात आणि समोरचा पक्ष प्रतिशोध घेण्यासाठी सज्ज होतो तेव्हा मारेकरी भूमिगत होतात. ९० च्या दशकात, मुंबईतील दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या नेतृत्वाखालील – दोन मोठ्या प्रतिस्पर्धी टोळ्यांपैकी एकाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणारे पोलीस कर्मचारी प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांना ‘चकमकीत’ ठार करत असा जाहीर आरोप करण्यात आला होता.

अधिक वाचा: Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?

प्रमुख हिट्स

झैदी यांनी दिलेल्या संदर्भानुसार, १९६९ साली गुंड हाजी मस्तान याने रिअल इस्टेट माफिया युसूफ पटेलच्या पहिल्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगची सुपारी दिली होती. मस्तानने दोन पाकिस्तानींना या कामासाठी त्यावेळेस १०,००० रुपये दिले, परंतु पटेलच्या अंगरक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. ‘खल्लास: एन ए-झेड गाइड टू द अंडरवर्ल्ड’ या पुस्तकात, पत्रकार जे.डे यांनी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहिमला रुजवण्यासाठी करण्यात आलेल्या खळबळजनक कॉन्ट्रॅक्ट हत्येबद्दल लिहिले. जे. डे यांची २०११ मध्ये पवई येथे हल्लेखोरांनी हत्या केली. फेब्रुवारी १९८३ मध्ये दाऊदचा भाऊ शब्बीर कासकरची हत्या करणाऱ्या प्रतिस्पर्धी आणि अधिक शक्तिशाली पठाण टोळीचा अमीरजादा पठाणला संपवण्यासाठी गँगस्टर बडा राजनला एक सुपारी देण्यात आली होती. हे काम डेव्हिड परदेशी नावाच्या तरुण हिटमॅनकडे गेले, ज्याने ५० ,००० रुपयांसाठी ६ सप्टेंबर १९८३ रोजी मुंबई सत्र न्यायालयात अमीरजादा याची गोळ्या झाडून हत्या केली. १२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरीतील एका मंदिराबाहेर गोळ्या झाडून चित्रपट आणि संगीत निर्माता गुलशन कुमार यांची सुपारी हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याने त्याला संपवण्याचा कट दुबईत रचला होता आणि मारेकऱ्यांना २५ लाख रुपये दिले होते. २००८ साली ‘मटका किंग’ सुरेश भगत यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याने पाच जणांसह त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी जया भगत यांना त्यांचे साम्राज्य ताब्यात घ्यायचे असल्याने त्यांनी २५ लाख रुपयांना हे सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. एकूणच सुपारी देणं किंवा घेणं याला आज जरी वाईट मानलं जात असलं तरी त्याचा मूळ अर्थ बराच निराळा आहे!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Betel nuts thrown at mns chiefs raj thackerays car in beed the evolution of supari from cultural tradition to underworld contract killing svs
Show comments