Bharat Taxi Fares and Benefits प्रवासासाठी आज अनेक जण ओला-उबरचा पर्याय निवडतात; मात्र अनेकांना हा पर्याय महाग वाटतो. आता टॅक्सीच्या पर्यायावर अवलंबून असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज (५ फेब्रुवारी) केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भारत टॅक्सीची सेवा अधिकृत लाँच करण्यात आली आहे. भारत टॅक्सीच्या सेवेमुळे प्रवासी आणि चालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. उबर आणि ओलासारख्या दिग्गज कंपन्या खासगी आणि व्हेंचर-बॅक्ड ‘गिग इकॉनॉमी’ मॉडेलवर चालतात. त्या तुलनेत भारत टॅक्सीची रचना पूर्णपणे वेगळी आहे. भारत टॅक्सी म्हणजे काय? याचा चालकांना आणि प्रवाशांना कसा फायदा मिळणार? भाड्याची रचना कशी असेल? जाणून घेऊयात…
भारत टॅक्सी म्हणजे काय?
भारत टॅक्सी ही ‘सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’द्वारे संचालित असून, ‘मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, २००२’अंतर्गत एक नोंदणीकृत सेवा आहे. ओला आणि उबरमध्ये चालक हे स्वतंत्र कंत्राटदार असतात; परंतु भारत टॅक्सीमध्ये चालकांना ‘सारथी’ म्हटले जाते. ते या सहकारी संस्थेचे सभासद, तसेच सह-मालक आहेत. प्रत्येक ‘सारथी‘कडे संस्थेचे शेअर्स आहेत.
सारथी आणि बाईक दीदी
सुरक्षा आणि सर्वसमावेशकता हा भारत टॅक्सीचा मुख्य आधार आहे. त्यांच्या ‘बाईकदीदी’ या उपक्रमाद्वारे १५० हून अधिक महिला चालक आधीच या प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेल्या आहेत. प्रवाशांना, विशेषतः महिलांना, प्रवासासाठी सुरक्षिततेचा विश्वास देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. तसेच या अंतर्गत चालकांना (सारथींना) आरोग्य विमा, अपघात विमा, सेवानिवृत्ती बचत आणि एक संघटित आधार प्रणाली उपलब्ध करून दिली जात आहे. मंत्रालयाच्या मते, या कल्याणकारी उपायांमुळे चालकांच्या आयुष्यात स्थैर्य येईल. परिणामी प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल.
व्यवसाय आणि मालकी मॉडेल
- भारत टॅक्सी : हे चालकांच्या मालकीचे सहकारी मॉडेल आहे. प्रत्येक चालक हा मालक/भागधारक असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार आणि नफ्यात वाटा मिळतो. तसेच यात प्रति-राईड कमिशन घेतले जात नाही. त्याऐवजी चालक रोजचे एक ठरावीक शुल्क (उदा. ३० रुपये प्रति दिवस) भरतात आणि उरलेली सर्व कमाई स्वतःकडे ठेवतात.
- ओला आणि उबर : या खासगी कंपन्या असून गुंतवणूकदारांच्या भांडवलावर चालतात. चालक स्वतंत्र कंत्राटदार असतात आणि त्यांना प्रत्येक राईडमागे कमिशन द्यावे लागते.
कशी असेल भाड्याची रचना?
भारत टॅक्सीचे दर अतिशय पारदर्शक असून, ते प्रति किलोमीटर आणि किमान भाड्यावर आधारित आहेत. विशेष म्हणजे यात ‘सर्ज प्राइसिंग’ नाही. सूत्रांनुसार, गर्दीच्या वेळी भारत टॅक्सीचे भाडे ओला आणि उबरपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत स्वस्त असू शकते. पाऊस किंवा जास्त मागणी असतानाही दर बदलले जात नाही. ओला आणि उबर ‘डायनॅमिक प्राइसिंग’ पद्धतीचा वापर करतात.
त्यात मागणीनुसार भाडे वाढते. तसेच प्रवाशांनी दिलेल्या एकूण भाड्यातून या कंपन्या १५ ते ३० टक्के कमिशन (काही ठिकाणी त्यांनी सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केले असले तरी) कापून घेतात. भारत टॅक्सीमध्ये कमिशन नसल्यामुळे चालकांना त्यांच्या कष्टाचा पूर्ण मोबदला मिळतो. ओलानेही आता ‘झिरो कमिशन’ मॉडेल सुरू केले आहे. मात्र, भारत टॅक्सीमध्ये चालक हा थेट प्लॅटफॉर्मचा भागधारक असतो आणि हाच मुख्य फरक आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये काय?
१. सर्ज ट्रॅकिंग : भारत टॅक्सीमध्ये ‘सर्ज’ नाही; मात्र ओला-उबरमध्ये मागणीनुसार दर वाढतात.
२. रिअल-टाइम ट्रॅकिंग : तिन्ही प्लॅटफॉर्मवर राईड ट्रॅक करण्याची सोय आहे.
३. सुरक्षा उपाय : भारत टॅक्सीने पोलिसांशी समन्वय साधला असून, त्यात वन-टॅप SOS बटण, आपत्कालीन संपर्क अलर्ट आणि ॲपमधील ‘सायरन’ बटण यांसारख्या सुविधा आहेत.
४. वाहनांचे प्रकार : तिन्ही प्लॅटफॉर्मवर कार, रिक्षा व बाईक उपलब्ध आहेत. भारत टॅक्सीमध्ये भारत ऑटो, भारत बाईक, कॅब इकॉनॉमी, प्रायोरिटी, सेदान व XL असे पर्याय आहेत.
भारत टॅक्सीचे दर
- किमान भाडे: पहिल्या ४ किलोमीटर पर्यंत ३० रुपये.
- ४ ते १२ किलोमीटर: २३ रुपये प्रति किमी.
- १२ किलोमीटर नंतर: १८ रुपये प्रति किमी.
- इतर शुल्क: २० रुपये पिकअप चार्ज आणि पाच मिनिटांनंतर एक रुपया प्रति मिनिट वेटिंग चार्ज. ट्रॅफिकच्या वेळी १५ टक्के ‘कन्सेशन सरचार्ज’ लागू होऊ शकतो.
भारत टॅक्सी कशी बुक करावी?
१.ॲप डाऊनलोड करा: गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ‘Bharat Taxi’ ॲप इन्स्टॉल करा.
२. नोंदणी: मोबाईल नंबर आणि ओटीपी वापरून आपले प्रोफाईल तयार करा.
३. प्रवासाची माहिती भरा: तुमचे पिकअप आणि ड्रॉप लोकेशन टाका.
४. वाहन निवडा : रिक्षा, बाईक किंवा कार यांपैकी योग्य पर्याय निवडा. बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला अंदाजित भाडे दिसेल.
५. बुकिंग करा : ‘Book’ बटणावर क्लिक करा. चालक विनंती स्वीकारताच तुम्हाला त्याची माहिती दिसेल.
६. प्रवास सुरू करा: पिकअप पॉईंटवर चालकाला भेटा. सुरक्षिततेसाठी ओटीपी दिल्यानंतरच प्रवास सुरू होईल. प्रवासाच्या शेवटी तुम्ही रोख रक्कम, यूपीआय किंवा कार्डद्वारे पैसे देऊ शकता.

