इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. सह्याद्री पर्वतरांगांतील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या मुसळधार पावसाच्या प्रदेशांत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातून हजारो पर्यटक दाखल होतात. या हंगामात स्थानिकांना उत्पन्नाची मोठी संधी उपलब्ध होते. छोटे-मोठे व्यवसाय तेजीत असतात. मात्र, भावली धरणावरील घटनेमुळे स्थानिकांच्या अर्थचक्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
पावसाळी पर्यटनस्थळे
नाशिक जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाला त्याच्या आवडीनुसार अनुभव घेता येतो. धार्मिक, कृषी, साहसी, निसर्ग तसेच दुर्गभ्रमंती असे सर्व प्रकारचे पर्यटन जिल्ह्यात उपलब्ध आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसर पावसाळी पर्यटनाच्या यादीत अग्रस्थानी आहे. इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण असून धरणांचा तालुका म्हणूनही त्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई (१,६४६ मीटर) इगतपुरीलगत आहे. तसेच आशियातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी घळ मानल्या जाणाऱ्या सांधण व्हॅलीत उतरण्याचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. पावसाळ्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटातून प्रवास करताना ढग जमिनीवर उतरल्याची विलक्षण अनुभूती पर्यटकांना मिळते. भावली धरण आणि धबधबा; वैतरणा, मुकणे आदी धरणे तसेच डोंगर-दऱ्यांतून खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. परिसरातील गड-किल्ल्यांवरही दुर्गप्रेमींची वर्दळ वाढते. इगतपुरीप्रमाणेच त्र्यंबकेश्वरमध्ये दुगारवाडी धबधबा, पहिने परिसरातील धबधबे, तुडुंब वाहणारे नदी-नाले आणि हरिहर किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. पावसाळ्यात या भागात निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात.
पाच हजार ते ४० हजारांपर्यंत दर
इगतपुरी तालुक्यात नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. रिसॉर्ट, हॉटेल्सची संख्या झपाट्याने वाढली असून ‘वीकेंड होम’ची संकल्पना येथे चांगलीच रुजली आहे. आलिशान व्हिला, वन पिलर हाऊस, ट्री हाऊस, ग्लास हाऊस असे विविध पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. चांगल्या रिसॉर्टमध्ये हंगामात एका खोलीसाठी प्रतिदिन चार ते पाच हजार रुपये, तर स्वतंत्र बंगल्यासाठी १० हजारापासून ४० हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. या बंगल्यांचे व्यवस्थापन, भोजन सेवा आणि इतर सुविधांसाठी स्वतंत्र साखळी निर्माण झाली आहे. शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक या भागात येतात. त्यामुळे आदिवासीबहुल भागातील छोटे-मोठे व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते, वाहनचालक, मार्गदर्शक आणि इतर स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो. भातशेतीवर अवलंबून असलेल्या या भागात पावसाळी पर्यटनाचा हंगाम आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा पावसामुळे उशिराने सुरू झालेल्या व्यवसायाला भावली धरण परिसरातील घटनेचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पर्यटकांशी वाद, हल्ल्याची घटना
पावसाळी पर्यटनस्थळांवर अनेकदा टवाळखोरांकडून मद्यपान, धुडगूस, महिलांची छेडछाड आणि सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचे प्रकार घडत असतात. काही हॉटेलांमध्ये अनधिकृत मद्यविक्री होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने होत असतात. उघड्यावर मद्यपान करून मोठ्या आवाजात गाणी लावणे, धांगडधिंगा घालणे अशा घटनांमध्ये बहुसंख्य वेळा बाहेरून मौजमजेसाठी आलेल्या व्यक्तींचा सहभाग असतो. स्थानिक आणि पर्यटक यांच्यात टोकाचे वाद होण्याच्या घटना तुलनेने अपवादात्मक आहेत. मात्र, भावली धरण परिसरातील हल्ला वेगळ्या स्वरूपाचा ठरला. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व संशयित इगतपुरी तालुक्यातील असल्याचे तपासात समोर आले आहे. संशयितांनी एका महिलेची छेड काढल्यानंतर पर्यटकांशी वाद घातला, धक्काबुक्की केली आणि त्यानंतर १० ते १२ किलोमीटर पाठलाग करून त्यांच्या वाहनावर हल्ला चढवला. या घटनेमुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरच्या सुरक्षित पर्यटन प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पर्यटक सुरक्षेबाबत प्रशासनाचा विश्वास
पर्यटनस्थळे सुरक्षित राहतील. आणि भावलीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असा विश्वास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी व्यक्त केला आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याचा त्यांनी निर्वाळा दिला. महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. भावली धरण परिसरात पोलीस चौकी असून स्वतंत्र पॉइंट बंदोबस्तही तैनात असतो. पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. पर्यटनस्थळांच्या परिसरात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर आणि मद्यपींवर सातत्याने कारवाई केली जात आहे. भावली धबधबा, धरण परिसर आणि पहिने भागातही विशेष मोहिमा राबविल्या जातात. भावली येथील घटनेनंतर बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात येणार असून पर्यटकांनी घाबरण्याचे कारण नाही. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जाईल, असे डॉ. स्वामी यांनी आश्वस्त केले.
पर्यटन व्यावसायिक चिंतेत
पावसाळी पर्यटनासाठी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या अतिशय मोठी असते. वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन उपलब्ध झाले आहे. वर्षातील हा एकमेव हंगाम अनेक कुटुंबांच्या अर्थकारणाला आधार देणारा ठरतो. भावली येथील हल्ल्याच्या घटनेमुळे स्थानिकांच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिककडून (तान) व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे पर्यटक आणि स्थानिक यांच्यात अनावश्यक दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्थानिक शेतकरी, भोजन आणि खाद्यपदार्थ विक्रेते तसेच लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर पर्यटकांवर अवलंबून असल्याने या घटनेचा त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
