Bhiwandi Building Collapse Updates : मुंबईसह उपनगरात आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असतानाच भिवंडीत गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण दुर्घटना घडली. शहरातील बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरात असलेली कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारात अक्षरक्ष: पत्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांना आपले प्राण गमावावे लागल्याचे वृत्त आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्याप अनेकजण अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्याचवेळी मृतांचा आकडाही वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात भिवंडीत इमारती कोसळण्याच्या घटना घडत असल्याने ही चिंतेची बाब झाली आहे. मुंबईला लागून असलेल्या या शहरात वारंवार इमारती का कोसळतात? त्यामागील नेमकी कारणे काय? त्याविषयीचा हा आढावा…
भिवंडीत वारंवार इमारती का कोसळतात?
मुंबईपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवंडीत गेल्या काही वर्षांत इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. सप्टेंबर २०२० मध्ये शहरातील पटेल कंपाऊंड येथील ३५ वर्षे जुनी ४० फ्लॅट्सची ‘जिलानी अपार्टमेंट’ ही तीन मजली इमारत मध्यरात्री अचानक कोसळली होती. या दुर्घटनेत तब्बल ४१ नागरिकांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला होता. त्यात महिलांसह अनेक लहान मुलांनाही प्राण गमावावे लागले होते. त्याशिवाय अनेकांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील जुन्या जीर्ण इमारतींचा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. भिवंडीकरांसाठी ही जखम ताजी असतानाच तीन वर्षानंतर २०२३ मध्ये वाळपाडा – वर्धमान कंपाउंड येथील दोन मजली निवासी इमारत गोदामासह कोसळली. या भीषण दुर्घटनेतही जवळपास १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यादरम्यान गुरुवारी रात्री चार मजली इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शहरातील जीर्ण इमारती, बेकायदा बांधकामे आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे भिवंडीत दर पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या दुर्घटना ही चिंतेची बाब बनली आहे.
भिवंडीत किती धोकादायक इमारती?
भिवंडीतील परिस्थिती शेजारील मुंबईपेक्षाही अधिक गंभीर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने शहरातील एक हजार ७९० धोकादायक इमारतींची ओळख पटवली होती. त्यापैकी २२७ इमारती ‘सी-१’ श्रेणीत असून, त्या तातडीने रिकाम्या करून पाडण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने नमूद केले होते. त्याउलट मुंबई महानगरपालिकेने यंदा संपूर्ण शहरात केवळ १७४ सी-१ धोकादायक इमारती घोषित केल्या होत्या. मुंबईची लोकसंख्या सुमारे १ कोटी २५ लाख असून शहराचा विस्तार ६०३ चौरस किलोमीटर इतका आहे, तर भिवंडीची लोकसंख्या सुमारे ७.५ लाख आणि क्षेत्रफळ अवघे २७ चौरस किलोमीटर आहे. तरीही भिवंडीत मुंबईपेक्षा दहापट अधिक धोकादायक इमारती असल्याची बाब समोर आली आहे. यावरून शहरातील जुन्या, जीर्ण आणि योग्य देखभाल न झालेल्या इमारतींची समस्या किती गंभीर बनली आहे, हे अधोरेखित होते.
इमारती कोसळण्याचे कारण काय?
भिवंडीतील वाढत्या धोकादायक इमारतींच्या समस्येमागे अनेक दशकांपासून झालेला अनियोजित शहरी विस्तार हे प्रमुख कारण मानले जाते. एकेकाळी उद्योगाचे शहर अशी ओळख असलेल्या भिवंडीत पुढे देशातील अनेक मोठमोठी गोदामे बांधण्यात आली. मात्र, या विस्तारादरम्यान निवासी इमारती, कारखाने आणि गोदामे योग्य नियोजनाशिवाय एकमेकांच्या अगदी जवळ उभारण्यात आली. यापैकी अनेक इमारतींना अनेक दशके उलटली असून, त्यांच्या संरचनात्मक दुरुस्ती आणि देखभालीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय मालकी हक्काचे वाद, पगडी भाडेप्रथा, न्यायालयीन खटले तसेच घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील मतभेद यांमुळे पुनर्विकासाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावते. मात्र, पर्यायी निवासाची व्यवस्था परवडत नसल्यामुळे अनेक कुटुंबे त्या इमारती सोडण्यास तयार होत नाहीत. परिणामी, हजारो नागरिक धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींमध्येच जीव मुठीत धरून राहण्यास भाग पडतात.
मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे
दरम्यान, बेकायदा बांधकामांमुळे ही समस्या आणखी गंभीर बनली आहे. २००९ मध्ये राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील बेकायदा बांधकामांशी संबंधित सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका करताना शहरात कायद्याचे राज्य उरले नसल्याचे म्हटले होते. महानगरपालिका अजूनही गाढ झोपेत असल्यासारखी वागत असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आणि काही इमारतींना मिळालेले ‘स्थगितादेश’ उठवण्यासाठी दिवाणी न्यायालयात प्रभावी पावले का उचलली गेली नाहीत? असा सवालही उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान उपस्थित केला होता.
भिवंडीत आजवर किती इमारती कोसळल्या?
गेल्या काही वर्षांत घडलेल्या भीषण दुर्घटनांमुळे भिवंडीतील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये शहरातील पटेल कंपाऊंड परिसरातील जिलानी इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेत सुरुवातीला ३८ जणांचा मृत्यू झाला होता; पण बचावकार्यादरम्यान मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला. महाराष्ट्रातील सर्वात भीषण दुर्घटनांपैकी ही एक मानली जाते. या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा आणि जीर्ण इमारतींच्या प्रश्नावर स्वतःहून जनहित याचिका दाखल करून सुनावणी सुरू केली होती. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत, एप्रिल २०२३ मध्ये वलपाडा येथील वर्धमान कंपाऊंडमधील आठ मजली निवासी इमारत गोदामासह कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर बचावकार्य तब्बल ४५ तासांहून अधिक काळ सुरू होते. यादरम्यान भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने त्या रिकाम्या कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. भिवंडीत सध्या अनेक धोकादायक इमारती असून त्या रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरातील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील अडकलेल्या नागरिकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना प्रशासनाकडून शक्य तितकी मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
