scorecardresearch

Premium

विश्लेषण: खुद्द अमिताभ बच्चन यांचीही चिंता वाढवणारा ‘पर्सनॅलिटी राईट’ नेमका आहे तरी काय? बिग बींना का मागावी लागली कोर्टाकडे दाद?

Amitabh Bachchan Personality Rights: अमिताभ बच्चन यांना त्यांच्या हक्कासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. नेमकं असं घडलं काय की बिग बींना दिल्लीपर्यंत जावं लागलं? हा पर्सनॅलिटी राईट असतो तरी काय?

विश्लेषण: खुद्द अमिताभ बच्चन यांचीही चिंता वाढवणारा ‘पर्सनॅलिटी राईट’ नेमका आहे तरी काय? बिग बींना का मागावी लागली कोर्टाकडे दाद?
अमिताभ बच्चन यांना का घ्यावी लागली दिल्ली उच्च न्यायालयात धाव? (फोटो – पीटीआय)

Amitabh Bachchan Personality Rights: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या सिनेसृष्टीपासून ते थेट दिल्लीपर्यंत एका विषयाची चर्चा होती तो म्हणजे अमिताभ बच्चन यांचे पर्सनॅलिटी राईट्स अर्थात व्यक्तिमत्वविषयक अधिकार! अमिताभ बच्चन यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्या व्यक्तिमत्वविषयक अधिकारांसाठी धाव घेतली होती. अर्थात, बिग बींना कोणतेही न्याय्य अधिकार चित्रपटसृष्टीत कुणी नाकारू शकणार नाही, अशीच काहीशी त्यांची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा सगळ्यांसमोर आहे. मात्र, असं असलं, तरी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या हक्कासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. नेमकं असं घडलं काय की बिग बींना दिल्लीपर्यंत जावं लागलं? हा पर्सनॅलिटी राईट असतो तरी काय?

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in

भारतात सेलिब्रिटी मंडळींचं मोठं गारूड लोकांवर असल्याचं नेहमीच दिसून येतं. मग हे सेलिब्रिटी चित्रपटसृष्टीतले असोत, क्रकेटपटू असोत किंवा मग अजून कुठल्या क्षेत्रातले असोत. त्यामुळे देशातल्या तमाम व्यावसायिकांकडून त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करण्यासाठी या सेलिब्रिटी मंडळींकडून लोकांना आवाहन केलं जातं. निरनिराळ्या जाहिरातींमधून ही सेलिब्रिटी मंडळी झळकत असतात आणि आपल्याला संबंधित कंपनीचं उत्पादन खरेदी करण्याचं आवाहन करत असतात. खरंतर या सगळ्या फक्त जाहिराती असतात. या आवाहनांशी आपला कोणताही वैयक्तिक संबंध नसून त्या फक्त जाहिराती आहेत, हे ही सेलिब्रिटी मंडळी आणि खुद्द उत्पादक कंपन्याही मान्य करतच असतात. पण तरीदेखील सामान्य प्रेक्षकांवर या मंडळींनी केलेल्या जाहिरातींचा मोठा प्रभाव पडत असल्याचं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे.

या सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा वापर करून उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण हे सर्व अधिकृतरीत्या या सेलिब्रिटींची रीतसर परवानगी घेऊन घडत असतं. पण या अधिकृत व्यवसाय विश्वाच्या परीघाबाहेर हजारो, लाखो छोटे-मोठे उत्पादक या सेलिब्रिटींचे फोटो, नाव त्यांच्या परवानगीशिवाय वापरून आपापल्या उत्पादनांची जाहिरात करत असतात. अशा ठिकाणीच पर्सनॅलिटी राईटचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

विश्लेषण : लष्करासंदर्भातील एका ट्वीटनं राजकीय वातावरण तापलं; रिचा चड्ढासंदर्भातील नेमका वाद काय? अनेकदा अडकली वादात

काय आहे व्यक्तिमत्वविषयक अधिकार?

पर्सनॅलिटी राईट किंवा व्यक्तिमत्वविषयक अधिकार हे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतात. त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाशी संबंधित गोष्टींचं राईट टू प्रायव्हसी किंवा मालमत्ता अधिकाराच्या अंतर्गत संरक्षण करणं व्यक्तिमत्वविषयक अधिकारात अपेक्षित आहे. यामध्ये त्या व्यक्तीचे फोटो, व्हिडीओ, आवाज, नाव किंवा या प्रकारच्या इतर गोष्टींचा समावेश होतो. सेलिब्रिटी मंडळींसाठी हा अधिकार फार महत्त्वाचा ठरतो. कारण आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी आणि प्रतिमा संवर्धनासाठी या सेलिब्रिटींच्या नावाचा, फोटोचा वापर उत्पादक मंडळी करत असतात. या गोष्टी अगदी सहज होणं शक्य असल्यामुळे सिलिब्रिटी मंडळींनी त्यांच्या नावाची नोंदणी व्यक्तिमत्वविषयक अधिकारांचं जतन करण्यासाठी करणं आवश्यक ठरतं.

विश्लेषण : आफताब पुनावालाच्या क्रूरतेने इतर गुन्हेगारांना प्रोत्साहन? ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय? वाचा…

अमिताभ बच्चन यांचं काय आहे म्हणणं?

अमिताभ बच्चन यांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना सविस्तर मुद्दे स्पष्ट केले. “मी फक्त थोडी माहिती देतो की नक्की चाललंय काय? कुणीतरी टीशर्ट तयार करतं आणि अमिताभ बच्चन यांचे फोटो त्यावर लावतं. कुणीतरी अमिताभ बच्चन यांचे पोस्टर विकत असतं. कुणीतरी अमिताभ बच्चन डॉट कॉम या नावाने वेबसाईट रजिस्टर करतं. यामुळेच आम्ही त्यांच्या पर्सनॅलिटी राईट्ससंदर्भात याचिका दाखल केली आहे”, असं त्यांची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांनी न्यायालयाला सांगितलं.

भारतीय कायद्यामध्ये काय आहे तरतूद?

भारतीय राज्यघटनेच्या कलम २१मध्ये नमूद केलेल्या नागरिकांच्या अधिकारांमध्ये राईट टू प्रायव्हसीनुसार व्यक्तिमत्वविषयत अधिकारांची व्याख्या केली जाते. शिवाय, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ अंतर्गत अधिक व्यापक स्वरूपात व्यक्तिमत्वविषयक अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, कॉपीराईट अॅक्ट १९५७ मध्ये साहित्यिक आणि कलाकारांना असलेल्या अधिकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेते, गायक, संगीतकार, नृत्यकार यांचा समावेश आहे.

व्यक्तिमत्व हक्कांसाठी अमिताभ बच्चन यांची कोर्टात धाव, न्यायालयानं दिला मोठा दिलासा!

एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वविषयक अधिकारामध्ये सामान्यपणे त्यांचा आवाज, सही, प्रतिकृती, स्टाईल, सिलोवेट प्रतिमा, चेहरा, हावभाव, स्वभाववैशिष्ट्य, नाव या गोष्टींचा वापर कसा केला जावा, विशेषत: व्यावसायिक वापर कसा केला जावा, यासंदर्भातील तरतुदींचा समावेश होतो.

बिग बींच्या याचिकेवर न्यायालयानं काय सांगितलं?

दिल्ली न्यायालयानं अमिताभ बच्चन यांच्या बाजूने अंतरिम आदेश देत त्यांच्या आवाजाचा, छायाचित्राचा, नावाचा किंवा व्यक्तिमत्वाविषयी इतर बाबींचा उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी त्यांच्या परवानगीशिवाय वापर करता येणार नाही, असं नमूद केलं. “याचिकाकर्ते हे समाजातील सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत यात कोणतीही शंका नाही. ते अनेक जाहिरातींमध्येही झळकतात. मात्र, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या प्रसिद्धीचा वापर करून काही लोक त्यांची उत्पादने विकत असल्याचं पाहून ते व्यथित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय कुठलंही उत्पादन विकण्यासाठी त्यांच्या फोटोचा, आवाजाचा किंवा प्रसद्धीचा कुणी वापर करू शकणार नाही”, असं न्यायालयाने यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 09:00 IST

संबंधित बातम्या