बिहार विधानसभेची २०२५ ची निवडणूक अध्यक्षीय पद्धतीसारखी सुरू आहे. संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा व दोन दशके मुख्यमंत्रीपद सांभाळणारे ७४ वर्षीय नितीशकुमार. त्यांचा सामना युवा चेहरा असलेल्या तेजस्वी यादव यांच्याशी आहे. तेजस्वी हे पस्तीशीत असून, गेल्या म्हणजेच २०२० मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. यंदा सात विरोधी पक्षांच्या महाआघाडीने राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा तेजस्वी यांना निसंशयपणे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले. तेजस्वीदेखील प्रचारात रोजगार तसेच विकासाचा मुद्दा प्रामुख्याने मांडत आहेत. कुटुंबात घरटी एकाला सरकारी नोकरी हे त्यांचे आश्वासन महत्त्वाचे आहे. राज्यात अडीच कोटी कुटुंबे आहेत. विरोधकांच्या दृष्टीने ही निवडणूक तेजस्वी यांच्या भोवती फिरत आहे.

भाजपविरोधी आघाडीचा चेहरा

राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालूप्रसाद यादव प्रकृती ठीक नसल्याने प्रचारापासून दूर आहेत. त्यांचे धाकटे पुत्र तेजस्वी हेच आता देशात भाजपविरोधी आघाडीचे एक प्रमुख चेहरा मानला जातो. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा मताधार हा प्रामुख्याने यादव (१४ टक्के) तसेच मुस्लीम (१८ टक्के) हा मानला जातो. मात्र यातून विरोधकांसाठी अन्य जातींचे ध्रुवीकरण घडते. राजदचे जवळपास निम्मे उमेदवार (लढत असलेल्या १४३ जागांपैकी) हे याच दोन समुदायातून येतात. भाजप आघाडी सातत्याने प्रचारात लालूप्रसाद कुटुंबीयांच्या काळाचा (१९९० ते २००५ ) ‘जंगलराज’ असा उल्लेख करत आहे. याच मुळे तेजस्वी जंगलराजचा शिक्का बसणार नाही याची खबरदारी घेत,  भ्रष्टाचार व गुन्हेगारांना थारा देणार नाही हे प्रचारात सातत्याने बजावत आहेत. तेजस्वी यांना पाटण्यात २३ ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून औपचारिकपणे घोषित करण्यात आले. मात्र पत्रकार परिषद स्थळी फलकांवर केवळ तेजस्वी यांचीच छायाचित्रे होती. अन्य सहा मित्रपक्षातील कोणालाही येथे स्थान नव्हते. पुढे २८ ऑक्टोबरला आघाडीच्या जाहीरनाम्याचे नावही ‘बिहार का तेजस्वी प्रण’ असे आहे. या ३२ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधी, इतकेच काय लालूप्रसाद यादव यांच्यापेक्षा तेजस्वी यांचीच छबी अधिक ठळक आहे. यातून तेजस्वी यांचे महत्त्व लक्षात येते.

अनुभवातून सर्वसमावेशकता

गेल्याच निवडणुकीत तेजस्वी यांच्याकडे पक्षाची सुत्रे आली. त्यांचे वडील लालूप्रसाद हे चाराघोटाळा प्रकरणात रांची कारागृहात होते. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी रोजगाराचा मुद्दा केंद्रस्थानी आणला होता. पुढे देशभरातील अन्य निवडणुकांत हा मुद्दा केंद्रस्थानी आला. एक प्रकारे या मुद्द्याचे श्रेय त्यांचे आहे. गेल्या वेळीच तेजस्वी यांनी संयुक्त जनता दल-भाजप यांच्या आघाडीला आव्हान दिले होते. काँग्रेसला लढवत असलेल्या ७० पैकी केवळ १९ जागाच जिंकता आल्याने मुख्यमंत्रीपद हुकल्याची हुरहूर समर्थकांना आहे. यावेळी ती कसर भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच तेजस्वी यांनी राज्यात छोट्या-मोठ्या अडीचशे सभा घेतल्या. रोज सरासरी सात ते आठ सभांचा सपाटाच त्यांनी लावला. प्रचारातही व्यासपीठावर केवळ यादव-मुस्लीम समाजातील नेते राहणार नाहीत याची दक्षता ते घेतात. यातून राष्ट्रीय जनता दल हा सर्वसमावेश असल्याचा संदेश जावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्याच बरोबर जुन २०२५ मध्ये मंगरनी लाल मंडल या अतिमागास समाजील व्यक्तीला राजदचे प्रदेशाध्यक्षपद देऊन त्यांनी धक्का दिला. मंडल जनता दलातून आले आहेत. 

उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेते

२०१५ मध्ये जनता दल-राजद यांचे सरकार आल्यावर तेजस्वी यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. त्यापूर्वी २०१० मध्ये राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. त्यापूर्वी क्रिकेटच्या मैदानावरही काही काळ ते रमले. २००९ मध्ये झारखंड संघाकडून प्रतिनिधित्व केले. विजय हजारे चषक स्पर्धेत ओडिशाविरुद्ध दोन एक दिवसीय सामने त्यांनी खेळले. दोनदा उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद. यातून त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. नितीशकुमार पुन्हा भाजपबरोबर गेल्यावर विधानसभेत सातत्याने ‘चाचा’ नितीशकुमार यांच्याशी त्यांचा सामना झाला. नितीश यांचा प्रचारसभांमध्ये ते उल्लेख चाचा असा करतात. नितीशकुमार यांना पुढे करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी निवडणूक लढवत आहे. मात्र सातत्याने तेजस्वी त्यांच्या प्रकृतीबाबत सवाल करतात. तसेच रालोआचा मुख्यमंत्री कोण असेल, यावरून फिरकी घेतात. विरोधकांवर फारशी वैयक्तिक टीका न करता राज्यासाठी सत्तेत आल्यावर काय करणार याची जंत्रीच ते प्रचारातून देतात. ‘तेजस्वी प्रण’ यंदा यशस्वी होईल अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.