Bihar Crime: बिहारमधील पाटणा येथे ४ जुलैच्या रात्री एक प्रसिद्ध व्यावसायिक व भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाटणामधील पोलीस प्रशासनाबद्दल पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दोन बाइकस्वारांनी गोपाळ खेमका यांना समोरून डोक्यात गोळ्या घातल्या आहेत. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जिथे ही घटना घडली, तिथून गांधी मैदान पोलीस ठाणे अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. असं असताना तब्बल दीड तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे राज्यातील उद्योजकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
कोण होते गोपाळ खेमका?
गोपाळ खेमका बिहारमधील आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक होते. पाटणामधील मगध रुग्णालयाचे ते मालक होते. सोबतच पाटणामध्ये त्यांची अनेक औषधांची दुकाने आहेत. त्याव्यतिरिक्त हाजूपीर येथे त्यांच्या दोन कार्डबोर्ड तयार करण्याच्या फॅक्टरी आहेत. पाटणाच्या एक्झिबिशन रोडवर त्यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे, तसेच हाजीपूर इंडस्ट्रियल परिसरातही त्यांच्या फॅक्टरी आहेत. तसेच त्यांचे इतरही अनेक उद्योग आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा गोपाळ खेमका बांकीपूर क्लबमधून परतत असताना गांधी मैदान इथल्या ट्विन टॉवर अपार्टमेंटमध्ये जात होते. त्याआधी ते कारमधून बाहेर पडले असता, आधीच त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या दोन बाइकस्वारांनी थेट त्यांच्या डोक्यात गोळी घातली. गोळी लागताच गोपाळ खेमका जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले; मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
६ वर्षांपूर्वी खेमका यांच्या मुलाचीही हत्या
डिसेंबर २०१८ मध्ये गोपाळ खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका याचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. गुंजन खेमका त्याच्या गाडीतून फॅक्टरीत आला. फॅक्टरीमध्ये पोहोचताच सुरक्षा रक्षकाने फॅक्टरीचे गेट उघडले आणि हल्लेखोरांनी गाडीच्या खिडकीतून गुंजन याच्यावर बेछूट गोळीबार केला. गोपाळ खेमका यांचा आणखी एक मुलगा आहे, तो आयजीआयएमएस येथे डॉक्टर आहे.
पोलिसांचा नाकर्तेपणा
गोपाळ खेमका यांची जशी हत्या झाली, त्याच पद्धतीने त्यांच्या मुलाचीही हत्या झाली होती अणि एवढ्या वर्षांनंतरही या घटनेचा अद्याप छडा लागलेला नसताना पुन्हा गोपाळ खेमका यांच्या हत्येमुळे खळबळ निर्माण झाली आहे. त्यामुळे गोपाळ खेमका यांचा लहान भाऊ संतोष खेमका यांनीही पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या उद्योजकाची हत्या होते आणि पोलीस इतक्या जवळ असतानाही दीड तास घटनास्थळी जात नाहीत, असे ते म्हणाले. खेमका यांच्या हत्येची माहिती मिळताच काही उद्योजकांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.

दरम्यान. खेमका यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे, “पाटणा पोलीस सामान्य माणसांचे आणि व्यावसायिकांचे रक्षण करण्यात सक्षम नाहीत. ते फक्त दारू तस्करी करणाऱ्यांना पकडतात आणि तपासाच्या नावाखाली त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात गुंतले आहेत.” गोपाळ खेमका यांच्या हत्येनंतर पाटण्यातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयाबाहेर अनेक मोठे व्यावसायिक पोहोचले. व्यावसायिक आणि खेमका यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडून सुरक्षा मिळण्यासह मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी लावून धरली आहे.
खेमका यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर गुन्हेगार निर्भयपणे शस्त्रे हलवीत घटनास्थळावरून पळून गेले. जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम पोलीस करीत आहेत. तसेच या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, खेमका यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बिहारमध्ये याआधीही गोळीबाराच्या घटनांची नोंद
२०२३ मध्ये बिहारमध्ये जनता दल (युनायटेड) पक्षाचे नेते कैलाश महतो यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कटिहार परिसरात त्यांच्यावर गोळीबार झाला होता. एका फार्मजवळ जदयूचे माजी जिल्हा सरचिटणीस कैलास महतो यांच्यावर मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. मारेकरी दुचाकीवरून कृषी फार्म चौक परिसरात पोहोचले. महतो यांच्याजवळ बाइक उभी केली आणि महतो यांच्यावर गोळ्यांच्या वर्षाव केला. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना अशा ठिकाणी लागल्या की, काही क्षणांत घटनास्थळीच महतो यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
२०१८ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या अरवल शाखेच्या व्यवस्थापकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. व्यवस्थापक आलोक चंद्रा यांनी इंदिरा आवास योजनेतील सुमारे आठ लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहारासंदर्भात काही ठोस पुरावे पोलिसांना दिले होते.