उत्तरेकडे होळीला रंगाची मोठ्या प्रमाणात उधळण केली जाते. एकमेकांना रंग लावत जल्लोषाचे वातावरण असते. आता त्याच होळीदरम्यान बिहारच्या राजकारणाचे रंगही बदलले आहेत. विक्रमी नऊ वेळा तसेच सर्वाधिक काळ २२ वर्षे बिहारचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेले नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याने, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे पक्षाचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होईल अशी चिन्हे आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर मंथन सुरू आहे.

जनता दल कार्यकर्त्यांचा संताप

बिहारच्या राजकारणावर गेली चार दशके नितीश कुमार व लालू प्रसाद यादव या दोन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राममनोहर लोहिया यांच्या अनुयायांचे प्रभुत्व राहिले. आता त्यांचे मार्ग भिन्न असले तरी, आजही राज्यव्यापी जनाधार असलेले हे दोनच नेते आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभवांनंतर राष्ट्रीय जनता दलाची ताकद कमी झाली आणि प्रकृतीच्या कारणास्तव लालूंनी पक्षाची धुरा तेजस्वी यांच्याकडे सोपवली. अर्थात पक्षाध्यक्षपद लालूप्रसाद यादव यांच्याकडेच आहे. तर दुसरीकडे संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी नुकताच अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा केला. आता नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात या निर्णयानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. जनता दलाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांवर जाहीरपणे ते आरोप करत आहेत. मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर तसेच पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. नितीशकुमार यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देत, संसदेच्या वरिष्ठ सदनाचे सदस्य व्हायचे असल्याची इच्छा प्रकट केली. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर, दिल्लीत जाण्याचा स्वतःचा निर्णय आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न यातून केला. विरोधकांनी मात्र यावर टीका केली. भाजप मित्र पक्षांना संपवते हे वारंवार दिसते अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जनता नेते तेजस्वी यादव यांनी दिली. अर्थात या साऱ्यात आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असे चित्र आहे. त्यामुळे विविध नावांची चर्चा सुरू झाली.

संभावित दावेदार

मुख्यमंत्रीपदासाठी भाजप ज्याचे नाव सर्वाधिक चर्चेत असते त्याला संधी देत नाही असा प्रघातच अलीकडच्या काळात पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे सांगणे कठीण आहे. पक्षनिष्ठा तसेच राज्यातील जातीय समीकरणे ही या निवडीत महत्त्वाची ठरतील. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे स्पर्धेत आघाडीवर आहेत. इतर मागासवर्गीय असलेल्या कुशवाह समुदायातून येणारे चौधरी यांची ओळख आक्रमक नेते अशी आहे. राष्ट्रीय जनता दल तसेच जनता दलातून ते भाजपमध्ये आले आहेत. मात्र भाजपमध्ये प्र‌वेश केल्यावर त्यांनी राष्ट्रीय जनता दलाविरोधात आक्रमक भूमिका घेत पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. प्रदेशाध्यक्ष तसेच विविध खात्याचे मंत्री म्हणून प्रभाव पाडला. विधानसभेला भाजपच्या यशात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

चौधरी यांच्यानंतर विजयकुमार सिन्हा यांचे नाव चर्चेत आहे. भाजपमध्ये प्रदेशस्तरावरील विविध पदे तसेच विरोधी पक्ष, विधानसभा अध्यक्ष आणि आता उपमुख्यमंत्री असा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. भूमिहार समाजातून येत असलेले सिन्हा पक्षनिष्ठा व अनुभव यात वरचढ आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून कारकीर्द सुरू केलेले राय हे मितभाषी नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पक्षाशी आघाडी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. राज्याचे उद्योगमंत्री दिलीप जैस्वाल यांच्याही नावाची चर्चा आहे. जैस्वाल हे दोन दशके प्रदेश भाजपचे खजिनदार होते. संघटना तसेच सरकारमधील विविध पदांचा त्यांना अनुभव आहे. याखेरीज संघ परिवारातून आलेले ५४ वर्षीय मंगल पांडे हेही एक दावेदार आहेत. राज्य मंत्रिमंडळात आरोग्य खाते सांभाळत आहेत. राज्यातील जातीय समीकरणे पाहता मुख्यमंत्रीपदासाठी इतर मागासवर्गीय समुदायातील व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल अशी शक्यता आहे.

पुढे काय?

नितीशकुमार दिल्लीत गेल्यावर केंद्रात मंत्री होणार का, हा प्रश्न विचारला जात आहे. येत्या मे महिन्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होतील. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार काय, हे मुद्दे चर्चेत आहेत. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे दोन उपमुख्यमंत्री असतील असेही मानले जात. त्यात नितीश कुमार यांचे पुत्र निशांत हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. गेली चार ते पाच दशके नितीश कुमार यांनी कुर्मी, कोयरी व कुशवाह या समुदायांची मतपेढी भक्कम ठेवत बिहारमध्ये विजयी पताका फडकावली. यातूनच ज्या आघाडीत नितीश कुमार तिकडे विजयाचा गुलाल हे समीकरण ठरलेले. आता नितीश यांच्या दिल्लीकडे कूच करण्याच्या निर्णयाने त्यांचे ५० वर्षीय पुत्र निशांत कुमार यांच्याकडे लक्ष आहे. निशांत राजकारणापासून दूर होते. मात्र आता त्यांना सक्रिय करून पक्षातील संभाव्य फूट टाळता येईल असा एक हिशेब आहे. कारण नितीश यांच्या राज्यसभेच्या निर्णयावर कार्यकर्ते नाराज आहेत. याखेरीज जनता दलातून आणखी एक उपमुख्यमंत्री होण्याचीही चर्चा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच म्हणजे केवळ चारच महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील २४३ पैकी २०२ जागा जिंकत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीला धक्का दिला होता. त्यात भाजपला ८९ तर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला ८५ जागा मिळाल्या होत्या. खरे तर २०२० मध्येच नितीश कुमार यांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती. मात्र भाजपला आग्रह होता. तर २०२५ मध्येही नितीश यांच्याच नेतृत्वात प्रचंड जनादेश मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांनाच द्यावे लागले. चार महिन्यांनंतर आता राज्याची सूत्रे भाजपकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील एका मोठ्या राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री असेल असे चित्र आहे. अर्थात हे पद भाजपला मिळेल याचे कयास लावले जात आहेत. पुढील समीकरणांबाबत अधिकृत कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.