सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वी भारतीय मानक ब्युरोने सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात मोठी वाढ केली आहे. नव्या नियमांनुसार सोन्याच्या प्रत्येक वस्तूवरील हॉलमार्किंग शुल्क ४५ रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच प्रति दागिना ३० रुपयांची वाढ झाली असून जुन्या शुल्काच्या तुलनेत ही वाढ सुमारे ६६.७ टक्के आहे. सुधारित दर अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून लागूही झाले आहेत.

हॉलमार्किंग म्हणजे नेमके काय?

सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ग्राहकाला समजावी आणि विक्रीतील पारदर्शकता वाढावी, हा हॉलमार्किंग व्यवस्थेचा प्रमुख उद्देश आहे. हॉलमार्कमध्ये दागिन्यावरील बीआयसचे चिन्ह, सोन्याची शुद्धता दर्शविणारा फाइननेस/कॅरेट तपशील आणि सहा अंकी HUID क्रमांक हे प्रमुख घटक असतात. पैकी HUID हा भारतीय मानक ब्युरोद्वारे दागिन्यांवर लेझरने कोरलेला एक अद्वितीय सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक’ (अक्षरे आणि अंक यांचा समावेश असलेला) कोड आहे. ग्राहक सदरचा क्रमांक ‘बीआयएस’ केअर ॲपच्या माध्यमातून तपासू शकतात. त्यामुळे दागिना खरेदी करताना केवळ दुकानातील माहितीवर अवलंबून न राहता दागिन्यावर असलेले हॉलमार्क तपशील स्वतः पडताळण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होत असते.

हॉलमार्किंगचा खर्च कसा वाढणार?

नव्या शुल्क रचनेनुसार मान्यताप्राप्त तपासणी आणि हॉलमार्किंग केंद्रांकडे सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंगसाठी पाठवणी करणाऱ्या सराफांना प्रत्येक सोन्याच्या वस्तूसाठी ७५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र एका खेपेसाठी किमान शुल्क २०० रुपये राहणार आहे. या शुल्कावर लागू असलेले कर स्वतंत्रपणे आकारले जातील. याचा अर्थ कमी संख्येने दागिने हॉलमार्किंगसाठी पाठविणाऱ्या सराफांसाठी किमान शुल्काची तरतूद महत्त्वाची ठरणार आहे. उदाहरणार्थ, तीन दागिन्यांसाठी प्रति वस्तूच्या दरानुसार २२५ रुपये शुल्क लागू होईल; मात्र एक किंवा दोन वस्तूंच्या खेपेसाठी २०० रुपयांचे किमान शुल्क लागू राहील. त्यामुळे प्रत्यक्ष खर्च खेपेतील वस्तूंच्या संख्येनुसार बदलतो. एखाद्या सराफाने ५० सोन्याचे दागिने हॉलमार्किंगसाठी पाठविले तर जुन्या ४५ रुपये प्रति वस्तू दरानुसार २,२५० रुपये शुल्क लागत होते. नव्या ७५ रुपये दराने हाच खर्च ३,७५० रुपये होईल. म्हणजे ५० दागिन्यांच्या खेपेसाठी १,५०० रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल. मात्र हा अतिरिक्त खर्च म्हणजे ग्राहकाच्या प्रत्येक बिलात सरसकट ३० रुपये वाढतील, असा अर्थ होत नाही. हॉलमार्किंग शुल्क प्रथम सराफ आणि मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्र यांच्यातील व्यवहारात लागू होते. सराफ हा अतिरिक्त खर्च ग्राहकाकडून कसा वसूल करतो, हे त्याच्या किंमत आणि बिलिंग पद्धतीवर अवलंबून असेल.

हलक्या दागिन्यांवर अधिक परिणाम?

हॉलमार्किंग शुल्क हे प्रति वस्तू आकारले जाते; दागिन्यांच्या वजनाच्या प्रमाणात नाही. त्यामुळे अतिशय हलक्या आणि कमी वजनाच्या दागिन्यांच्या बाबतीत हॉलमार्किंगचा खर्च तुलनेने अधिक जाणवू शकतो. काही ग्रॅम वजनाच्या अंगठीवर आणि तुलनेने जड दागिन्यांवर हॉलमार्किंगची मूलभूत प्रति-वस्तू फी समान असते. याच मुद्द्यावर ‘जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’ने नवीन शुल्क वाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. संस्थेने शुल्क वाढीचा फेरविचार करण्याची मागणीही भारतीय मानक ब्युरोकडे केली असून हलक्या व कमी वजनाच्या दागिन्यांच्या दरावर आणि छोट्या सराफांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

चांदीच्या दागिन्यांना मात्र दिलासा?

नव्या नियमांमध्ये चांदीच्या हॉलमार्किंग शुल्कात बदल करण्यात आलेला नाही. चांदीच्या प्रत्येक वस्तूसाठी ३५ रुपये आणि एका खेपेसाठी किमान १५० रुपये शुल्क कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या बदलाचा थेट परिणाम सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगवरच होईल. नव्या शुल्क रचनेत भारतीय मानक ब्युरोकडून मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्रांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काची स्वतंत्र तरतूदही आहे. सोन्यासाठी हे शुल्क ७.५० रुपये प्रति वस्तू, किमान २० रुपये प्रति खेप, तर चांदीसाठी ३.५० रुपये प्रति वस्तू, किमान १५ रुपये प्रति खेप असे नमूद करण्यात आले आहे.

ग्राहकांनी काय तपासावे?

सोन्याचे दागिना खरेदी करताना ग्राहकांनी सर्वप्रथम दागिन्यावर अधिकृत ‘बीआयएस’ चिन्ह आहे का, हे पाहावे. त्यानंतर शुद्धतेचा तपशील आणि सहा अंकी HUID क्रमांक तपासणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर बिलामध्ये दागिन्याचे वजन, सोन्याचा दर, शुद्धता, घडणावळ किंवा मजुरी, हॉलमार्किंगसंबंधी आकारणी आणि लागू कर यांचा तपशील स्पष्टपणे नमूद आहे का, हे पाहणे ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. विशेषतः हॉलमार्किंग शुल्कवाढीच्या पार्श्वभूमीवर एखाद्या ग्राहकाकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्यास ती नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, हे बिलातून समजणे आवश्यक आहे. दसरा, दिवाळी आणि त्यानंतरच्या लग्नसराईच्या काळात दागिन्यांची मागणी वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी मोठ्या प्रमाणात दागिने हॉलमार्किंगसाठी पाठविणाऱ्या सराफांच्या एकूण अनुपालन खर्चात वाढ होणार आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते हॉलमार्किंग शुल्कात वाढ झाली म्हणून प्रत्येक दागिन्याच्या अंतिम किमतीत आपोआप ३० रुपयांची वाढ होईल, असेही होणार नाही.

patil.jitendra@expressindia.com