हृषिकेश देशपांडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आगामी निवडणुकीत भाजप ३७०, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०० जागा जिंकेल असा दावा केला. भाजपने त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती असा खुलासा मनसे नेत्यांनी केला. तर गेल्याच आठवड्यात पंतप्रधान ओडिशाच्या दौऱ्यावर होते. संभळपूर येथील सभेत त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा उल्लेख मित्र असा केला. भाषणात काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. खरे तर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बिजु जनता दल तेथे सत्तेत आहे. पंतप्रधानांनी बिजु जनता दलावर मात्र टीका केली नाही. भाजप २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून सातत्याने संसदेत महत्त्वाच्या विधेयकांवर बिजू जनता दलाने भाजपला साथ दिली. नवीन पटनाईक यांनीही भाजपला प्रचार सभांचा अपवाद सोडला तर फारसे लक्ष्य केले नाही. थोडक्यात, एकमेकांना पूरक अशीच भूमिका भाजप तसेच बिजू जनता दलाची राहिली आहे. यामुळे पूर्व किंवा दक्षिण तसेच उत्तरेत भाजप नव्या मित्रपक्षांच्या शोधात आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिणेत बांधणी

एकीकडे पूर्वेकडे ओडिशात बिजू जनता दलाला साद घालताना दक्षिणेत आंध्र प्रदेशात तेलुगू देसमशी जुळवून घेण्याचा प्रयत्न दिसतो. त्या दृष्टीने त्या पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीवारी केली. नायडू राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करणार काय, हा मुद्दा आहे. आंध्रमध्ये भाजपचे फारसे अस्तित्व नाही. मात्र तेथील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत भाजपला साथ दिली. भाजपच्या आघाडीत ते नाहीत इतकाच काय तो फरक. आंध्रचे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना भाजपशी अधिकृत आघाडी केल्यास अल्पसंख्याक मते दूर जाण्याची धास्ती वाटते. त्यातून ते थेट आघाडी करत नसले, तरी नवीन पटनाईक यांच्याप्रमाणेच भाजपच्या धोरणांवर टीकाही करत नाहीत. 

हेही वाचा >>>विश्लेषणः स्थिर विक्री अन् वाढता नफा; कंपन्यांच्या तिमाही कामगिरीतील फायदा का वाढतोय?

उत्तरेतही चाचपणी

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागांचे महत्त्व सर्वच पक्षांना आहे. गेल्या वेळी भाजप आघाडीला ५१ मतांसह ६४ जागांवर विजय मिळाला. मात्र यंदा लोकसभेसाठी भाजपचे किमान ७० ते ७२ जागांचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. त्यासाठी लोकदलाच्या जयंत चौधरी यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. चौधरी यांची समाजवादी पक्षाबरोबर आघाडी असून, त्यांना लोकसभेच्या सात जागाही समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जाहीर केल्या आहेत. समाजवादी पक्ष-लोकदल तसेच काँग्रेस ही आघाडी भाजपला आव्हानात्मक ठरेल. पश्चिम उत्तर प्रदेशात जयंत चौधरी यांच्या लोकदलाला मानणारा वर्ग आहे. हा जाट पट्टा म्हणून ओळखला जातो. जाट व मुस्लीम हे समीकरण २०२२ च्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला त्रासदायक ठरेल असे भाकीत होते. मात्र जाट समुदायाने मोठ्या प्रमाणात भाजपला साथ दिली. त्यामुळे तितकासा फटका भाजपला बसला नाही. अर्थात विधानसभेला समाजवादी पक्ष तसेच लोकदलने चांगल्या जागा या भागात मिळवल्या. यामुळेच लोकसभेला धोका पत्करायला नको म्हणून भाजप जयंत चौधरी यांना बरोबर घेण्याच्या प्रयत्नात दिसतो.

हेही वाचा >>>विश्लेषण : पेटीएम पेमेंट बँकेचे काय चुकले? नव्या जमान्याच्या ‘पेमेंट बँकां’चे मरण अटळ आहे?

विरोधी आघाडीला चिंता

बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार हे भाजपबरोबर आल्यानंतर विरोधी इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या ३०० जागांपैकी ४० जागा तरी काँग्रेस जिंकेल काय, अशा शब्दात टीकेचे आसूड ओढले. त्यावर काँग्रेसने फारशी आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही. अजूनही ममतादीदी आघाडी करतील अशी काँग्रेसला आशा आहे. राज्यातील ४२ पैकी सध्याच्या दोनपेक्षा जास्त जागा काँग्रेसला देण्यास त्या राजी नाहीत. त्यातही काँग्रेस पक्ष हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिक जवळ असल्याने ममतांना संताप आहे. कदाचित काँग्रेसने माकपशी संबंध तोडले तर ममता एक-दोन जागा वाढवून देण्याबाबत विचार करू शकतील. तूर्तास तरी काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये माकपला दूर सारणे कठीण वाटते. यामुळे पश्चिम बंगालमध्ये विरोधकांच्या आघाडीत घटक पक्ष एकत्र येणार नाहीत. केरळमध्येही काँग्रेसची आघाडी विरोधात माकप आघाडी असाच सामना आहे. येथे भाजपला फारशी आशा नाही. मात्र गेल्या आठवड्यात सात वेळा आमदार म्हणून विजयी झालेले पी. सी. जॉर्ज यांनी केरळ जनपक्षम (धर्मनिरपेक्ष) भाजपमध्ये विलीन केला. मध्य केरळमध्ये कोट्टायम परिसरात त्यांची ताकद आहे. यामुळे काही प्रमाणात ख्रिश्चन मतेही मिळतील असे भाजपचे गणित आहे. त्या दृष्टीने केरळमधील लोकसभेच्या २० पैकी ५ जागांवर भाजपने लक्ष्य केंद्रित केल आहे. जिथे ताकद आहे तेथे अधिकाधिक जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर कमकुवत असलेल्या ठिकाणी नवे मित्रपक्ष शोधून आघाडी करण्याची भाजपची रणनीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तसेच केंद्रातील सत्ता यामुळे नव्या आघाड्या करणे भाजपला सुलभ वाटते. मित्रपक्षांनाही त्याचा लाभ होण्याची आशा आहे. यामुळेच भाजप चारशेपारच्या आपल्या घोषणेवर अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभेच्या दृष्टीने नवे मित्र जोडण्यासाठी चाचपणी करत आहे. येत्या महिनाभरात लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय राजकारणात अनेक उलथापालथी अपेक्षित आहेत.

hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp in search of new allies due to upcoming lok sabha elections print exp amy
First published on: 08-02-2024 at 07:55 IST