Nishikant Dubey Biju Patnaik Controversy: ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक हे अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयए (CIA) व माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातील दुवा होते, असे वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केले. त्यानंतर ओडिशातील बिजू जनता दलासह भाजपा नेत्यांनी दुबे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी निशिकांत दुबे यांनी आता ‘एक्स’वर एक पोस्ट करत बिनशर्त माफी मागितली आहे. दरम्यान, निशिकांत दुबे यांनी मागील वर्षी मराठी माणसांबद्दल तसेच महाराष्ट्राच्या योगदानाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. “अशा प्रकारे बोलणं योग्य नाही”, असे फडणवीस म्हणाले होते. महाराष्ट्रातून दुबे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु, तरीही दुबे यांनी माफी मागितली नाही. आता ओडिशाच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर दुबे यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? महाराष्ट्रात आणि ओडिशात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

निशिकांत दुबेंनी कोणते वादग्रस्त विधान केले?

झारखंडमधील गोड्डा येथील खासदार निशिकांत दुबे यांनी २७ मार्च रोजी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६२ चे चीनबरोबर झालेले युद्ध अमेरिका व सीआयए एजंटच्या पाठिंब्याने लढले. ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनायक हे अमेरिकन सरकार, सीआयए आणि नेहरू यांच्यातील दुवा (लिंक) होते, असे वादग्रस्त विधान दुबे यांनी केले. तसेच बिजू पटनायक यांनी सीआयएला ओडिशातील चारबाटिया एअरबेस उपलब्ध करून देण्यात मदत केली. अमेरिकेच्या यू-२ टेहळणी करणाऱ्या विमानांनी हा एअरबेस १९६० च्या दशकात वापरला, असे दुबे म्हणाले.

चारबाटिया एअरबेस व पंडित जवाहरलाल नेहरू, वाद काय ?

अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएने काही फाइल्स उघड केल्या होत्या. त्यात ओडिशातील चारबाटिया एअरबेसचा वापर अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएने सिक्रेट मिशनसाठी केल्याचे नमूद होते. चारबाटिया एअरबेस वापरण्याची परवानगी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेच्या यू-टू या टेहळणी करणाऱ्या विमानांना दिली होती. ही टेहळणी करणारी विमाने भारत-चीन सीमेवर उडून चीनने सीमेवर उभारलेल्या पायाभूत सुविधांची माहिती गोळा करत. ही माहिती पंडित जवाहरलाल नेहरू संसदेत मांडत असत, असे सीआयएच्या अहवालात म्हटले आहे. १९६२ च्या युद्धानंतर चीनच्या अणुकार्यक्रमाबाबत भारत व अमेरिकेला चिंता होती. त्यामुळे अमेरिकेने सिक्रेट स्पाय मिशन हाती घेतले होते. दरम्यान, सुरूवातीला अमेरिकेची विमाने थायलंडमधून उड्डाण घ्यायची, परंतु, नंतर ओडिशातील चारबाटिया एअरबेसचा वापर करणे त्यांनी सुरू केले होते. १९६४ मध्ये नेहरूंचे निधन झाल्यानंतर सीआयएने काही ऑपरेशन्स केले, परंतु, त्यानंतर ही सीआयएकडून मोहिम गुंडाळण्यात आली होती.

बिजू पटनायक कोण होते?

बिजू पटनायक हे एक स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक व राजकारणी होते. ते एक उत्तम पायलट होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. त्यांना भारत-चीन दरम्यान असलेल्या सीमावर्ती भागाची सखोल माहिती होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बिजू पटनायक यांच्यातील क्षमता व गुणवत्ता पाहून त्यांना १९६३ साली अमेरिकेत पाठवले होते. त्यावेळी नेहरूंनी भारताचे अमेरिकेतील तत्कालीन राजदूत बीके नेहरू यांना एक पत्र लिहिले होते.

“मी पटनायक यांच्याबाबत तुम्हाला पत्र लिहित आहे. तुम्ही त्यांना चांगले ओळखता. त्यांच्यात उत्तम क्षमता आणि साहस आहे. त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरूवात एक डेअर डेव्हिल पायलट म्हणून केली. त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष व संरक्षण सचिवांची भेट घ्यायची आहे. इथल्या परिस्थितीची जाण पटनायक यांना आहे, हे तुम्ही राष्ट्राध्यक्ष व सचिवांना कळवा.”, असे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पत्रात लिहिले होते.

दरम्यान, दुबे यांच्या टीकेनंतर बिजू पटनायक यांचे पूत्र व माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ‘एक्स’ प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “बिजू बाबूंबाबत भाजपा खासदाराने जे विधान केले आहे, त्याचे आश्चर्य वाटते. चीन विरोधात रणनीती तयार करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बिजू पटनायक हे ओडिशाचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी एक कार्यालय दिल्लीत सुरू केले होते, याची माहिती दुबे यांना कदाचित नसेल.” दरम्यान, बिजू पटनायक यांचा अनुभव व अभ्यास पाहून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पटनायक यांना दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाजवळ एक कार्यालय दिले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री असताना पटनायक हे चीनविरोधात रणनीती आखण्यासाठी तीन ते चार दिवस दिल्लीत राहत. नेहरूंबरोबर चर्चा करत व पुन्हा ओडिशात परतत.

निशिकांत दुबे यांची बिनशर्त माफी

“मागील आठवड्यात मीडियाशी संवाद साधताना नेहरू गांधी परिवाराच्या कारनाम्यांचा क्रम सांगताना माजी मुख्यमंत्री भारताच्या अग्रगण्य नेत्यांमध्ये स्थान असणारे आदरणीय श्री बिजू पटनायक यांच्या संदर्भात माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. पहिले तर ते माझे वैयक्तिक वक्तव्य होते. नेहरूंवर मांडलेल्या विचारांना बिजू बाबूंवर विचार मांडल्याचे समजले गेले. बिजू बाबू हे नेहमी उच्च दर्जाचे स्टेट्समन राहिले आहेत आणि राहतील. माझ्या वक्तव्याने जर भावना दुखावल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो.”, असे दुबे यांनी ‘एक्स’वर म्हटले होते.

“पटक पटककर मारेंगे”

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधुंवर टीका करताना वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, “जर ठाकरे बंधु महाराष्ट्राच्या बाहेर निघून बिहार, उत्तर प्रदेश किंवा तमिळनाडूत गेले तर त्यांना तिथे पटकून पटकून मारतील. तुम्ही लोक (मराठी) आमच्या पैशांवर जगत आहात. तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? जर तुमच्यात हिंदी भाषिकांना मारण्याची हिंमत आहे, तर तुम्ही उर्दू, तमिळ आणि तेलुगु बोलणाऱ्यांनाही मारले पाहिजे. ” असे वादग्रस्त विधान दुबे यांनी केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. “अशा प्रकारे बोलणं योग्य नाही, त्याचे अनेक अर्थ निघतात व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो”, असे फडणवीस म्हणाले होते. मनसेकडून दुबेंच्या वक्तव्याचा जोरदार विरोध करण्यात आला होता. परंतु, दुबे हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले.