भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांनी आपला नवा चमू घोषित केला आहे. ‘जेन झी’च्या आंदोलनानंतर पक्षाला बसलेला फटका पाहता या बदलांत त्या दृष्टीने अधिक विचार करण्यात आला आहे.

समाजमाध्यम संपर्कावर विशेष लक्ष का?

समाजमाध्यमाचा प्रभावी वापर करत भाजप २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आला.  दिल्लीत झालेल्या तरुणांच्या आंदोलनाबाबत भाजपला समाजमाध्यमावर योग्य प्रतिवाद करता आला नसल्याचा सूर आहे. परिणामी पक्षाचे आयटी सेलप्रमुख म्हणून गेली ११ वर्षे जबाबदारी सांभाळणार्‍या अमित मालवीय यांच्या जागी आता छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांना संधी मिळाली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक काळात काँग्रेसच्या भूपेश बघेल सरकारविरोधात समाजमाध्यमात प्रभावी वातावरण निर्मिती करण्यात म्हस्के यांचा मोठा वाटा होता. हे तिथे निवडणूक प्रभारी म्हणून काम करणार्‍या नवीन यांच्या नजरेत भरल्यानेच ही निवड झाली आहे. युवकांना रुचेल अशा भाषेत संदेश निर्माण करणे, त्यासाठी नवनव्या कल्पनांचा आधार घेणे यासाठी या विभागात चार सहसंयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून बडोद्याचे खासदार हेमांग जोशी यांची निवड झाली आहे.  जोशी हे वरिष्ठ नेतृत्वाच्या विश्वासातील मानले जातात.

उत्तर प्रदेशला झुकते माप का मिळाले?

पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या चमूत ६५ पदाधिकार्‍यांपैकी  ५० जण नवे आहेत. २३ राज्यांना प्रतिनिधित्व देताना १० महिलांना स्थान देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता सर्वाधिक आठ नेत्यांना संधी मिळाली आहे. त्यातही जातीय संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसतो. स्मृती इराणी, हरीश द्विवेदी यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक रचनेत सरचिटणीस हे पद महत्त्वाचे मानले जाते. द्विवेदी हे ब्राह्मण समुदायातून येतात. याखेरीज रेखा वर्मा व अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांना उपाध्यक्ष करण्यात आले. इतर मागासवर्गीय विभाग तसेच अल्पसंख्याक विभागाचे प्रमुखही उत्तर प्रदेशातील आहेत.

इराणी, राम माधव यांचे पुनरागमन महत्त्वाचे का?

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघात पराभव झाला होता. मात्र त्यानंतरही विविध माध्यमांमधून पक्षाची बाजू जोरकसपणे मांडल्याचे बक्षीस त्यांना सरचिटणीसपदातून देण्यात आले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांपासून ते देशपातळीवरील विविध माध्यमांत संघ नेते राम माधव पक्षाची वैचारिक भूमिका मांडत असतात. उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने राष्ट्रीय राजकारणात ते पुन्हा सक्रिय होतील.

तावडे-बन्सल यांच्या जबाबदार्‍या कायम ?

अभाविपच्या मुशीतून तयार झालेल्या विनोद तावडे यांनी दिल्लीतील राजकारणात जम बसविला आहे. निवडणुकीत पक्षाने सोपवली ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याने पक्षाध्यक्षांच्या नव्या चमूत तावडेंचे सरचिटणीसपद कायम राहिले आहे. आता तर देशातील सर्वात मोठ्या अशा उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. तीच बाब संघटनकुशल अशा सुनील बन्सल यांच्याबाबत आहे. अभाविपची पार्श्वभूमी असलेल्या बन्सल यांनी पश्चिम बंगाल तसेच ओडिशात प्रभारी म्हणून काम पाहत सत्तेत येण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली. हे दोघे वगळता जुन्यातील अन्य सरचिटणीसांना पुन्हा संधी मिळालेली नाही.’

दलबदलूंनाही संधी?

पक्ष संघटनेत राष्ट्रीय स्तरावर पदाधिकारी म्हणून दुसर्‍या पक्षातून आलेल्या नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. राघव चढ्ढा यांच्यासमवेत एप्रिल महिन्यात आम आदमी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राज्यसभा सदस्य संदीप पाठक यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये २०२२ मध्ये सत्तेत आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. केरळमधील काँग्रेसमधून आलेले अनिल अँटोनी यांचाही नव्या पदाधिकार्‍यांमध्ये समावेश आहे.