BJP Slams Eknath Shinde Shivsena : महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील मतभेद पुन्हा उघड होत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा नेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

गेल्याच आठवड्यात शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. ठाकरेसेनेप्रमाणेच शिंदेसेनेचे नेतेही दिपकेंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसून येते. पण, भाजपाला हे रुचलेलं दिसत नाही.

भाजपाने शिंदेंना सुनावले

चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हणाले, हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असला तरी पक्षातील नेत्यांनी कसे वागावे याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घ्यायला हवा. ‘महायुती सरकारमध्ये राहून अशा प्रकारचे वर्तन योग्य नाही,’ असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले

दरम्यान, भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या भेटीमुळे चुकीचा संदेश गेला असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘विरोधी पक्षातील नेते अभिजीत दिपके यांची भेट घेत असतील तर ते समजू शकतो. मात्र, सत्ताधारी महायुतीतील नेत्यांनी सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनाच्या नेतृत्वाच्या घरी जाणे योग्य नाही,” अशी टीका दरेकर यांनी केली आहे. तसेच बच्चू कडू यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अभिजीत दिपके यांची भेट घेतली, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या कृतीमुळे महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद अधिक वाढू शकतात. या दोन्ही नेत्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने समज द्यावी, अशी मागणीही दरेकरांनी केली.

‘पक्षाच्या नेतृत्वाने संजय शिरसाट आणि बच्चू कडू या दोघांनाही जाब विचारला पाहिजे,’ असेही दरेकरांनी स्पष्ट केले.

सीजेपीने ‘चलो संसद’ आंदोलन पुकारले होते. देशभरातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी सरकारला घेरले. तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विद्यार्थ्यांचा वाढता रोष पाहता विद्यार्थ्यांसमोर सरकारला नमते घ्यावे लागले. २४ जुलैला अखेर प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. या सर्व वादात भाजपाचे महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत भाजपापासून अंतर राखले.

संजय शिरसाट यांची वैयक्तिक ओळख

मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर २६ जुलैला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके दिल्लीहून परतण्यापूर्वीच त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. यावेळी शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांना सरकारी सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले होते.

‘अभिजीत दिपके यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना सरकारी सुरक्षा देण्यात यावी, अशी विशेष विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे,’ असे संजय शिरसाट यांनी नमूद केले होते.

महायुतीतून आधी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधणारे संजय शिरसाट एकमेव नेते होते. पण, त्यानंतर ३० जुलैला अभिजीत दिल्लीहून स्वगृही परतल्यानंतर बच्चू कडू यांनीही त्यांची भेट घेतल्याने महायुतीत धुसफूस सुरू झाली.

दिपके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले की, ‘दिपके कुटुंबाशी आमचे जुने कौटुंबिक संबंध आहेत. त्याला आंदोलनाच्या आधीच भेटण्याची इच्छा होती, पण आंदोलन सुरू असताना भेटलो असतो तर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले असते. आता आंदोलन संपल्यानंतर अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असून सरकार त्यांची योग्य ती काळजी घेईल.’ॉ

सरकारला आरसा दाखवण्यात काहीच गैर नाही – कडू

बच्चू कडू यांनी मात्र या भेटीचं उघडपणे समर्थन केलं. ‘मी पाकिस्तानमधून आलो आहे का? सत्ताधारी पक्षातील नेता कुणाची भेट घेऊ शकत नाही का? अभिजीत दिपके हे आंदोलक आहेत आणि मीही आंदोलकच आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी पुढे आंदोलन केलं तर सरकारला आरसा दाखवण्यात काहीच गैर नाही. माध्यमांनी आंदोलकांना गुन्हेगार ठरवण्याचं काम केलं आहे,’ असे ठाम मत कडूंनी मांडले आहे.

बच्चू कडू पुढे म्हणाले, ‘लढणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं. मी अभिजीत दिपके यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो होतो आणि ते त्यासाठी पात्र आहेत. सरकार, पक्ष आणि राजकीय भूमिका हा वेगळा विषय आहे. मी इथे नेता म्हणून नाही, तर एक आंदोलक म्हणून त्यांची भेट घेतली आहे,’ असे कडू यांनी स्पष्ट केले.