Pandit Jawaharlal Nehru and COCO island श्रीलंकेला दिलेल्या कच्चथीवू बेटावरून अलीकडेच सुरु झालेला वाद कोको बेटांपर्यंत येऊन पोहोचला आहे. भाजपाचे बिष्णू पद रे यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोको बेटे म्यानमारला दिल्याचा आरोप केला आहे. बिष्णू पद रे हे अंदमान आणि निकोबार बेट मतदारसंघातून भाजपचे लोकसभा उमेदवार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिष्णू पदा रे नेमकं काय म्हणाले?

“काँग्रेसने नेहमीच देशविरोधी भावनांना आश्रय दिला आहे. नेहरूंनी उत्तर अंदमान बेटांचा भाग असलेली कोको बेटे म्यानमारला भेट दिली, जी सध्या चीनच्या थेट नियंत्रणाखाली आहे,” रे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा आरोप केला. काँग्रेसने सत्तेत असताना ७० वर्षांत या बेटांसंदर्भात कोणत्याही प्रकारची चिंता वा काळजी व्यक्त केली नाही, असेही ते म्हणाले. “आज केंद्र सरकार इंदिरा पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅम्पबेल खाडीमध्ये चीनचा सामना करण्यासाठी एक गोदी आणि दोन संरक्षण विमानतळ यांची निर्मिती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने संरक्षण यंत्रणेसाठी जो निधी पुरवला आहे, त्याप्रकारच्या निधीची कल्पना काँग्रेस पक्ष करूही शकत नाही”, असे भाजप नेते म्हणाले. कोणत्याही काँग्रेसच्या नेत्याने या बेट समूहांना भेट देण्याची तसदीही यापूर्वी कधी घेतलेली नाही. असेही ते म्हणाले. परंतु पंतप्रधान मोदींनी नियमित भेटी दिल्या. लवकरच अंदमान तुम्हाला काँग्रेसमुक्त दिसेल. विद्यमान कुलदीप राय शर्मा यांनी बेटांच्या विकासासाठी एक पैसाही खर्च केला नाही, असाही आरोप रे यांनी केला.

अधिक वाचा: विश्लेषण: म्यानमारच्या कोको बेटांवरून चीनची भारतावर नजर! नेमके काय घडते आहे?

गेल्या महिन्यात माहितीच्या अधिकारात (आरटीआय) तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने १९७४ साली श्रीलंकेला कच्चथीवू बेट कसे सुपूर्द केले हे उघड झाले होते, असा आरोप यापूर्वी भाजपाने काँग्रेसवर केला आहे. १९७४ पर्यंत कच्चथीवू भारताचे होते आणि ते तामिळनाडूमधील भारतीय किनाऱ्यापासून अवघ्या २५ किमी अंतरावर आहे. ‘इंडिया टुडे’ या साप्ताहिकाने प्रकाशित केलेल्या एका लेखामध्ये अलीकडे आणखी एक संदर्भ आला. पाकिस्तानी बंदर शहर ग्वादार हे खरेतर भारताला देऊ केले होते, परंतु तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी ती ऑफर नाकारली. ग्वादार हे १९५० पर्यंत म्हणजेच जवळपास २०० वर्षे ओमानी राजवटीत होते. ग्वादार १९५८ मध्ये पाकिस्तानच्या ताब्यात येण्यापूर्वी, ते प्रत्यक्षात भारताला देऊ केले होते, पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने ते नाकारले, असे या संशोधन लेखामध्ये म्हटले होते. आता पुन्हा एकदा कोको बेटांच्या निमित्ताने नवा वाद सुरू झाला आहे, या पार्श्वभूमीवर सध्या चर्चेत असलेल्या कोको बेटांविषयी ऐतिहासिक पुरावे नेमके काय सांगतात, या विषयी जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

कोको बेटांचे नेमके स्थान कुठे आहे?

कोको बेटांचे स्थान भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांपासून जवळपास ५५ किमी अंतरावर आहे. कोको बेटे म्यानमारच्या यंगून प्रदेशाचा एक भाग आहेत. ही बेटे यंगूनच्या दक्षिणेस ४१४ किमी अंतरावर आहेत. हा पाच बेटांचा समूह असून पोर्तुगीज खलाशांनी या बेटांना नावे दिली. या बेटांवर भरपूर नारळाची झाडे असल्याने त्यांना ‘कोको बेट समूह’ असे म्हटले जाते. ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात अंदमान आणि निकोबार बेटांवर ताबा मिळवला होता.

कोको बेटांचे भारतासाठीचे महत्त्व

कोको बेटांचा समूह बंगालचा उपसागर आणि मलाक्काची सामुद्रधुनी दरम्यान मुख्य सागरी व्यापारी मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी स्थित आहेत. ही बेटे दक्षिणेकडील अंदमान आणि निकोबार बेटांमधील भारतीय नौदल आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण सुविधा आणि पूर्व हिंदी महासागरात भारतीय नौदल आणि इतर नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक आदर्श स्थान आहेत. कोको बेटांवरून भारताच्या तीन मुख्य स्थानांवर लक्ष ठेवता येते, १. ओडिशा; व्हीलर बेट म्हणजेच डॉ. अब्दुल कलाम बेट आहे; जे क्षेपणास्त्रांच्या चाचणी केंद्रासाठी प्रसिद्ध आहे. २. विशाखापट्टणम, आणि ३. अंदमान येथील भारतीय लष्करी तळ

ब्रिटिशांचा गनिमी कावा

इंग्रजांना स्वतंत्र भारत आपल्या ताब्यात ठेवण्याची इच्छा होती. त्याच दृष्टिकोनातून भारताला महत्त्वाच्या बेटांपासून वंचित ठेवण्यासाठी ते डावपेच राबवत होते. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील अनेक मोक्याच्या बेटांवर या साम्राज्यवाद्यांचा डोळा होता. ही बेटे या प्रदेशात आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील असे त्यांना वाटत होते. स्वतंत्र भारतात या बेटांचा समावेश न केल्याने भारताचा सामरिक प्रभाव या प्रदेशावर कमी राहील अशी ब्रिटीशांची अपेक्षा होती. परिणामी ते भारतावर नियंत्रण ठेवू शकतील, अशी योजना होती. १८८२ मध्ये ब्रिटिश सरकारने या बेटांचा ताबा घेतला. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं तरी या बेटांचा ब्रिटिशांकडे होता. बेटांचा ताबा हा अंदमान-निकोबार प्रमाणे कोको बेटांचेही भवितव्य अंधारात होते. ब्रिटिशांनी लक्षद्वीप, अंदमान-निकोबार या बेटांवर आपला अधिकार राखून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थेट नियंत्रण नसले तरी त्यांचे वर्चस्व या भागावर कायम राहील, याची ते काळजी घेत होते.

अधिक वाचा: विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय चातुर्य

के.आर.एन स्वामी यांनी लिहिलेल्या ‘द ट्रिब्यून इंडिया’ मधील लेखात म्हटले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राजकीय चातुर्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांचे संरक्षण झाले. सरदार वल्लभाई पटेल यांच्याशी झालेल्या वाटाघाटीत ब्रिटीश साम्राज्याने लक्षद्वीप आणि अंदमान बेटांवर आपली पकड सोडल्यामुळे त्यांनी आपले लक्ष बंगालच्या उपसागरातील कोको बंदराकडे वळवले. सरदार पटेल यांच्यशी झालेल्या वाटाघाटीतील पराभवामुळे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सरदार पटेल यांच्याशी याबाबतीत चर्चा न करता, १९ जुलै, १९४७ हे प्रकरण नेहरूंकडे नेले आणि ही बेटे दळणवळणाच्या उद्देशाने ब्रिटनला भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

कोको बेटे म्यानमारला भेट

पुढे नेहरूंनी १९५० मध्ये म्यानमारला (बर्मा) कोको बेटे भेट दिली, असे ऐतिहासिक कागदपत्रातून दिसते. सध्या म्यानमारला आर्थिक मदत करत या बेटांचा ताबा चीनने स्वतःकडे घेतला असून भारत आणि भारतीय नौदलाच्या बंगालच्या उपसागरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीन या बेटांचा वापर करत आहे. चीनच्या या परिसरातील वाढलेल्या कारवायांमुळे भारताच्या सीमा सुरक्षेला धोका निर्माण झाला असून चीनचा वाढता वावर हा चिंतेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps bishnu pada ray allegation on pandit nehru from coco island did pandit nehru give coco islands to myanmar svs
First published on: 19-04-2024 at 12:11 IST