करोनातून बरे होणाऱ्या अनेक रुग्णांमध्ये सध्या काळी बुरशी या आजाराचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. भारतात सध्या या आजाराने ग्रस्त असे १२ हजार रुग्ण आहेत. या बुरशीचा संसर्ग दुर्मिळ असून यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण ५० टक्के आहे. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, भारतीय लोकांमध्ये डायबेटिसचं प्रमाण जास्त असल्याने हा आजार देशात बळावत चालला आहे.

या संदर्भात बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, करोना प्रादुर्भावाच्या पूर्वी जगभरातल्या किमान ३८ देशांमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले होते, ज्याला काळी बुरशी असंही म्हटलं जातं. दरवर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण म्हणजे प्रति दशलक्ष १४० रुग्ण आढळून येत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

मँचेस्टर विद्यापीठातले संसर्गजन्य आजारांच्या बाबतीतले तज्ज्ञ डॉ. डेव्हिड डेनिंग सांगतात, म्युकरमायकोसिस हा डायबेटिसची संलग्न आजार आहे. अनियंत्रित डायबेटिस हे हा आजार होण्यामागचं कारण आहे. भारतामध्ये अनियंत्रित डायबेटिसचे अनेक रुग्ण आहेत. काळ्या बुरशीचा संसर्ग झालेले करोनातून बरे होणारे ९४ टक्के रुग्ण असे आहेत की ज्यांना डायबेटिस आहे आणि काळ्या बुरशीचे सर्वाधिक म्हणजे ७१ टक्के रुग्ण भारतातच आढळून येतात.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

बीबीसीच्या अहवालानुसार, भारताचे शेजारी देश म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेशातही डायबेटिस असणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांच्याकडेही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. पण त्यांची संख्या भारताइतकी जास्त नाही. बांगलादेशात म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण उपचार घेत आहे, तर एक संशयित आहे. या दोघांनाही डायबेटिस आहे. पाकिस्तानातही गेल्या काही आठवड्यात म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण आढळून आले आणि चार जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, भारत, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या चार देशांमध्ये ५७ टक्के लोकांच्या डायबेटिसचं निदानच झालेलं नाही. भारतात लोक नियमित आरोग्य तपासणी करत नाहीत त्यामुळे त्यांचा डायबेटिस नियंत्रणात राहत नाही आणि  नियंत्रणात नसलेला डायबेटिस हे अशा बुरशीजन्य आजारामागचं महत्त्वाचं कारण असतं.

यामुळेच म्युकरमायकोसिसचं निदान करणं अवघड असतं. म्हणून काही असेही रुग्ण असतील ज्यांना म्युकरमायकोसिसचं निदान झालेलं नाही. अर्थात, म्युकरमायकोसिस होण्यामागील कारण हे स्टेरॉइड्सचा अतिवापर हेही आहे. मात्र डायबेटिस असणाऱ्या रुग्णांना त्याचा धोका अधिक आहे.