Ian Israel War Black Rain in Tehran: इराणची राजधानी तेहरानमध्ये रविवारी (८ मार्च) सकाळी लोकांनी आकाशात पाहिले तेव्हा त्यांना काळे ढग आढळून आले. त्या काळ्या ढगांमधून पाऊस पडत असल्याचे त्यांनी पाहीले. तेलकट, जाड थर असलेले थेंब आकाशातून पडत होते. त्याला “काळा पाऊस” (ब्लॅक रेन) असे म्हटले जात आहे. युद्धात या काळ्या पावसाने आरोग्य व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. काळा पाऊस पडल्याने कार, कपडे व त्वचेवर काळा जाड थर जमा झाल्याचे नागरिकांनी अनुभवले. या काळ्या पावसाने इराणसह जगाची चिंता का वाढवली आहे? इराणमध्ये पडलेल्या काळ्या पावसाचा परिणाम पुढील काही दशकांपर्यंत पाहायला मिळेल का? त्यामुळे इराणमध्ये कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत? याबाबत जाणून घेऊ.
काळा पाऊस (ब्लॅक रेन) म्हणजे काय? तो का पडला?
७ व ८ मार्चच्या रात्री इस्रायलने इराणमधील चार तेलाच्या साठ्यांवर हल्ले चढवले. तेलाच्या साठ्यांवर हल्ले झाल्याने मोठा स्फोट होऊन काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. त्या काळ्या धूरातून विषारी रासायनिक द्रव्य हवेत पसरले. त्यात हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साइ़डचा समावेश होता. हे घटक मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जातात. हे घटक तेहरान व अल्बोर्ज प्रांताच्या हवेत पसरल्यानंतर त्याच वेळी आकाशात पावसाचे ढग आले. ढगांमध्ये हे विषारी द्रव्य मिसळले, तसेच काळ्या धूराचे लोट आणि ढग यांचे मिश्रण झाल्याने काळा पाऊस पडला. हा पाऊस अत्यंत घातक होता. तेलकट, जाड थर असलेले काळे थेंब आकाशातून तेहरानवर बरसले.
काळ्या पावसाने (ब्लॅक रेन) आरोग्याला कोणता धोका?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धोक्याचा इशारा दिला आहे. काळा पाऊस व विषारी रासायनिक द्रव्य तेहरानवर पडल्याने गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा इशारा WHO ने दिला आहे. या पावसाने श्वसनाचे विकार होऊ शकतात, असे म्हणत WHO ने इराणने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांना पाठिंबा दर्शवला आहे. इराणने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
WHO चे प्रवक्ते ख्रिस्टियन लिंडमेर यांनी इराणी नागरिकांना धोका असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, हवेत हायड्रोकार्बन, सल्फर ऑक्साइड्स आणि नायट्रोजन कम्पाऊंड्स मिसळले आहे. लोकांना श्वास घेताना त्रास होऊ शकतो. धूराच्या संपर्कात आल्याने डोकेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ होणे, त्वचेचे विकार होऊ शकतात. ही परिस्थिती जास्त काळ राहिली तर कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो.
इराणमधील रेड क्रेसेंट या मदतकार्य करणाऱ्या संस्थेने नागरिकांच्या फुफ्फुसावर परिणाम तसेच त्वचा जळू शकते, असे एनबीसी न्यूजला म्हटले आहे. कॅनडामधील वरिष्ठ शास्त्रज्ञ पीटर रॉस म्हणाले, हवेत पेट्रोलियम मिसळल्याने हायड्रोकार्बन तसेच बेन्झेन हे विषारी घटक वातावरणात मिसळले आहेत. याचे दूरगामी परिणाम पुढील काळात दिसू शकतात. हा खरोखर एक धोका आहे. यूकेमधील पर्यावरणाचे निरीक्षण करणाऱ्या संस्थेतील अभ्यासक डग वेअर म्हणाले, तेहरान शहराला डोंगरांचा वेढा आहे. त्यामुळे प्रदूषणकारी घटक बाहेर पडण्यास अडथळा आहे. हवेने जसे पुढे सरकायला हवे, तसे तिथे होत नाही.
काळ्या पावसामुळे (ब्लॅक रेन) वातावरणात पसरले ‘फॉरएव्हर केमिकल्स’
इराणमध्ये पडलेल्या काळ्या पावसाचा विपरीत परिणाम जास्त काळ असेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. वातावरणात कायम राहणारे काही रसायने ‘फॉरएव्हर केमिकल्स’ हवेत मिसळले आहेत. या ‘फॉरएव्हर केमिकल्स’मुळे वारंवार ‘ब्लॅक रेन’ पडू शकतो. त्यामुळे भूजलावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच वनस्पती, शेती यांच्यावर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच इराणमधील ज्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत, त्यांना धोका अधिक वाढल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘अॅसिड रेन’मुळे त्या इमारतींची झीज लवकर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘द कन्फ्लिक्ट अँड एनव्हायरन्मेंट ऑब्सरव्हेटरी’ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात इराणमध्ये पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या २३२ घटना युद्ध सुरू झाल्यापासून घडल्या आहेत. मानवांसह प्राण्यांना देखील या विषारी द्रव्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. तेहरानमधील अन्नसाखळीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
This is Ghaem Maqam Farahani Street in Tehran, Iran today.
— Weather Monitor (@WeatherMonitors) March 8, 2026
Oil fell with the rain, not normal rain that helps people, crops, trees, animals, and nature. This is an ecological disaster. pic.twitter.com/nmKETu59as
तेहरानमधील नागरिक काय म्हणाले ?
तेहरानमधील एका महिलेने NBC न्यूजला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, बाहेर धूर असल्याने घरात बसूनही डोकेदुखीचा त्रास होत आहे. अन्नाची कडू चव लागत आहे. ७० वर्षीय मिना यांनी सांगितले, “काळा पाऊस पडल्यानंतर धुराचा वास सगळीकडे येत होता. तो वास अजूनही येत आहे.”
“आम्ही काय पाहत होतो, त्यावर आमचाच विश्वास बसत नव्हता”, असे तेहरानमधील ४४ वर्षीय अभियंता कियानुश यांनी टाइम मॅग्झिनला म्हटले आहे. ज्या तेलाच्या साठ्यांना आग लागली त्यापासून ताजरीश शहर खूप दूर असूनही इथे परिणाम जाणवला. सकाळी काळा थर जमा झाल्याने कार पूर्ण काळी झाली होती, असे कियानुश म्हणाले. तेहरानमध्ये काळ्या धूराचे लोट आकाशात पसरल्याने सूर्य दिसत नव्हता. सगळीकडे जळाल्याचा वास येत होता, असे तेहरानमधील रहिवाशांनी बीबीसीला सांगितले. या भागात प्रदूषणाची पातळी यापूर्वी कधीही नव्हती तितकी वाढल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
