Bladder cancer symptoms in Marathi: लघवीत रक्त दिसणे हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. त्यामुळे लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा कोला ड्रिंकसारखा दिसू शकतो. बऱ्याच वेळा यामुळे वेदना होत नाहीत, म्हणूनच या लक्षणाकडे बर्याचदा दुर्लक्ष केले जाते. लघवीत रक्त दिसणे हे अनेकदा नेहमचीची बाब मानली जाते. परंतु, या सामान्य दिसणार्या लक्षणाला डॉक्टर गंभीर, जीवघेण्या इशाऱ्यासारखे मानतात. युरोपियन असोसिएशन ऑफ युरोलॉजी काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या एका नव्या आंतरराष्ट्रीय शोधनिबंधात म्हटले आहे की, जे रुग्ण आपत्कालीन विभागात लघवीत रक्त दिसण्याची तक्रार घेवून येतात, त्यात १० पैकी १ रुग्णाचा, जर मूळ कारणाची लवकर तपासणी केली नाही, तर ३ महिन्यांच्या आत मृत्यू होऊ शकतो.
मूत्राशयाच्या कर्करोगाची सुरुवात…
भारतात मूत्राशयाचा कर्करोग खूप मोठ्या संख्येने नसला तरी तो अजिबात दुर्लक्ष करण्यासारखा नाही. सर्व कर्करोगांमध्ये तो १७व्या क्रमांकावर आहे आणि पुरुषांमध्ये हा कॅन्सर ९व्या क्रमांकावर आहे. साधारणपणे पुरुषांमधील १०० कर्करोगांपैकी जवळपास ४ प्रकरणे ही या कर्करोगाची असतात. याचा अर्थ असा की, काही लोक जी लक्षणे साधी किंवा तात्पुरती समजून दुर्लक्ष करतात, ती कधी कधी गंभीर आजाराची विशेषतः मूत्राशयाच्या कर्करोगाची सुरुवात असू शकते.
अनेक लोक दुर्लक्ष करतात ‘ते’ लक्षण
बर्याच वेळा रुग्णांना वाटते की, हे लक्षण मूत्रमार्गातील संसर्ग (UTI), किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) किंवा शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यांसारख्या कमी गंभीर कारणांमुळे दिसते ते म्हणजे लघवीमध्ये रक्त आढळणे. काही वेळा डॉक्टरही सुरुवातीला याला संसर्ग समजून पुढील तपासणी न करता उपचार करतात. मात्र वर उल्लेख केलेल्या संशोधांनात सहभागी डॉक्टर स्पष्टपण सांगतात की, काही ठोस माहिती असेपर्यंत लघवीत दिसणारे रक्त हे नेहमीच गंभीर इशारा (रेड फ्लॅग) मानले पाहिजे.
“मूत्राशयाच्या कर्करोगाचे नेहमीचे आणि सुरुवातीस दिसणारे लक्षण म्हणजे लघवीत रक्त दिसणे. हे कधीही होऊ शकते. याशिवाय लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, लघवीत रक्ताच्या गुठळ्या (clots) दिसणे अशी लक्षणेही असू शकतात. आजार पुढे गेल्यावर कंबरदुखी, पेल्विस भागात वेदना किंवा कारण नसताना वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात ही लक्षणे सौम्य आणि वेदनारहित असल्यामुळे रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात, यामुळे निदान आणि योग्य उपचार उशिरा होतात,” असे डॉ. पर्ल आनंद, कन्सल्टंट (रेडिएशन ऑन्कोलॉजी), अँड्रोमेडा कॅन्सर हॉस्पिटल, सोनीपत यांनी सांगितले.
नवीन अभ्यासातून काय समोर आले?
जगभरातील ३८० रुग्णालयांमधील ८५०० हून अधिक रुग्णांवर आधारित या नव्या संशोधनाने उशिरा निदान होण्याच्या धोक्याबाबत एक ठोस इशारा दिला आहे. या निष्कर्षांनुसार, लघवीत स्पष्टपणे रक्त दिसल्यामुळे डॉक्टरांकडे जाणाऱ्या सुमारे ४ पैकी १ रुग्णामध्ये कोणता ना कोणता कर्करोग आढळू शकतो, ज्यात मूत्राशयाचा कर्करोग नेहमीचा आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीत या लक्षणांसह आलेल्या रुग्णांपैकी सुमारे १०% रुग्णांचा ३ महिन्यांच्या आत मृत्यू होतो, असे या अभ्यासात आढळले. तज्ज्ञांच्या मते, हा उच्च मृत्यूदर केवळ आजाराच्या गंभीरतेमुळे नसून, निदान आणि उपचारांमध्ये होणाऱ्या विलंबामुळेही आहे. वेळेवर तपासणी न झाल्यास, रुग्णांना सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करण्याची महत्त्वाची संधी गमवावी लागू शकते, ज्यामुळे परिणाम अधिक गंभीर होतात.
या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक निकिता भट्ट या जे डब्लिन येथील सेंट व्हिन्सेंट्स युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट युरोलॉजिस्ट आहेत. त्यांनी डेली मेलला सांगितले की, “हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन आहे, यात A&E (आपत्कालीन विभाग) मध्ये लघवीत रक्त दिसणाऱ्या रुग्णांवर कसे उपचार करावे याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याच अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे की, जर तुम्हाला लघवीत रक्त दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना आणि भेटा कारण सापडेपर्यंत तपासणीसाठी आग्रह धरा.”
लवकर निदान का महत्त्वाचे आहे?
मूत्राशयाचा कर्करोग इतर अनेक कर्करोगांप्रमाणेच योग्य वेळी निदान करण्यात आला तर उपचार अधिक प्रभावी ठरतात. सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास उपचारांचे प्रमाण तुलनेने कमी (less invasive) असते आणि रुग्ण वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
OncoDaily या अमेरिकास्थित ऑन्कोलॉजी प्लॅटफॉर्मनुसार, मूत्राशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास विशेषतः तो मूत्राशयाच्या आतील अस्तरापुरता मर्यादित असेल (ज्याला नॉन-मसल-इनवेसिव्ह ब्लॅडर कॅन्सर – NMIBC म्हणतात), तर तो उपचारक्षम असतो. यामध्ये मुख्य उपचार म्हणजे TURBT (Transurethral Resection of Bladder Tumour) ही प्रक्रिया, या प्रक्रियेत ट्यूमर काढला जातो. त्यानंतर BCG सारखी इंट्रावेसिकल थेरपी दिली जाते, जी शरीराच्या प्रतिकारशक्तीला सक्रिय करून कर्करोगाशी लढण्यास मदत करते. या टप्प्यावर उपचार परिणामकारक असतात. सुमारे ९६% रुग्ण निदानानंतर किमान पाच वर्षे जगतात.
या संशोधनात असेही स्पष्ट झाले आहे की, CT स्कॅन किंवा सिस्टोस्कोपी यांसारख्या जलद तपासण्या (विशेषतः ४८ तासांच्या आत) केल्यास रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढू शकते. या तपासण्यांमुळे मूत्राशयातील ट्यूमर किंवा इतर गोष्टी लवकर ओळखता येतात. मात्र, तपासणी उशिरा केल्यास आजार पुढे वाढत जातो. जेव्हा लक्षणे अधिक गंभीर होतात किंवा सतत दिसू लागतात, तेव्हा कर्करोग आधीच प्रगत अवस्थेत पोहोचलेला असू शकतो, ज्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे आणि कमी प्रभावी होतात.
मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान उशिरा का होते?
मूत्राशयाच्या कर्करोगातील एक मोठे आव्हान म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणे खूप सौम्य किंवा अधूनमधून दिसणारी असतात. काही रुग्णांना एकदाच लघवीत रक्त दिसते आणि नंतर अनेक आठवडे किंवा महिने ते पुन्हा दिसत नाही. या अनियमिततेमुळे अनेकांना खोटा दिलासा मिळतो आणि ते डॉक्टरांकडे जाणे पुढे ढकलतात. याशिवाय, वारंवार लघवी होणे, सौम्य अस्वस्थता किंवा जळजळ अशी लक्षणे सामान्यतः संसर्गाशी (UTI) संबंधित मानली जातात. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघेही सुरुवातीला अँटिबायोटिक्स देऊन उपचार करतात, पण पुढील तपासणी केली जात नाही.
डॉ. आनंद यांनी स्पष्ट केले की, “मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान अनेकदा उशिरा होते, कारण सुरुवातीची लक्षणे जसे की, अधूनमधून लघवीत रक्त येणे इत्यादी दुर्लक्षित केली जातात किंवा इतर डॉक्टरांकडून त्याला मूत्रमार्गाच्या संसर्गासारखे समजले जाते. त्यामुळे अनेक रुग्णांना वारंवार UTI साठी उपचार दिले जातात, पण योग्य तपासणी होत नाही. याशिवाय जागरूकतेचा अभाव आणि नियमित स्क्रिनिंग नसणे हेही उशिरा निदान होण्यामागील कारणे आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ट्यूमर वरवरचे आणि शांत (लक्षणविरहित) असू शकतात, त्यामुळे ते सहज लक्षात येत नाहीत. पण काळानुसार हे ट्यूमर मूत्राशयाच्या भिंतीमध्ये खोलवर शिरू शकतात, ज्यामुळे उपचार अधिक कठीण होतात आणि कर्करोगाची तीव्रता वाढल्याने मृत्यूचा धोका वाढतो.”
जीवनशैलीमुळे मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कसा वाढतो?
मूत्राशयाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर मूत्रसंस्थेतील नेहमीच्या कर्करोगांपैकी एक आहे. त्याचा धोका काही महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असतो, जसे की धूम्रपान, औद्योगिक रसायनांचा संपर्क आणि वाढते वय. धूम्रपान (Smoking) हा सर्वात मोठा धोका मानला जातो. सिगारेटमधील घातक रसायने रक्तात मिसळतात आणि नंतर मूत्राद्वारे बाहेर टाकली जातात. या प्रक्रियेत ही रसायने मूत्राशयात साचतात आणि त्याच्या आतील अस्तराला नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, औद्योगिक रसायनांचा संपर्क हा देखील एक महत्त्वाचा धोका आहे. रंग (dye), रबर, लेदर आणि पेंट उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लोकांना विशेषतः जास्त धोका असतो. भारतात औद्योगिकीकरण वाढत असल्याने हा धोका अजूनही चिंतेचा विषय आहे.
डॉ. आनंद यांनी संगितले की, “मूत्राशयाच्या कर्करोगाच्या सुमारे ५०-६०% प्रकरणांचा संबंध सिगारेट ओढण्याशी आहे. धूम्रपानामुळे शरीरात घातक पदार्थ प्रवेश करतात, जे रक्तातून फिल्टर होऊन मूत्राद्वारे बाहेर पडतात. या प्रक्रियेत मूत्राशयाच्या अस्तराचे नुकसान होते. तसेच, रंग, रबर, लेदर आणि पेंट उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना अधिक धोका असतो. Benzidine आणि beta-naphthylamine सारखी रसायने मूत्राशयातील पेशींना दीर्घकालीन हानी पोहोचवतात आणि जनुकीय बदल (mutations) घडवून आणतात, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.”
धोका कमी करण्यासाठी घ्यायची काळजी
डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला आहे की, वय किंवा लिंग कोणतेही असो लघवीत दिसणारे रक्त हे नेहमीच गंभीरपणे घ्यावे. हे लक्षण कधीही दुर्लक्षित करू नये. तसेच, पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे मूत्राशयातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. याशिवाय, जर तुम्हाला वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) होत असेल किंवा अनेक वेळा त्यासाठी उपचार घेतले असतील, तर मूत्राशयाच्या कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी तपासणी करणे आवश्यक आहे. यातून स्पष्ट होते की, लक्षणे लहान वाटली तरी त्याकडे गांभीर्याने पाहणे आणि वेळेवर तपासणी करणे हेच सुरक्षिततेचे सर्वोत्तम उपाय आहेत.
