Blood Sugar Affects Fatty Liver : नियमित मधुमेह तपासणीसाठी गेलेल्या अनेक रुग्णांना वाटतं, डॉक्टर नेहमीप्रमाणे त्यांच्याशी साखरेची पातळी, औषधे आणि HbA1c म्हणजेच तीन महिन्यांतील सरासरी साखरेच्या प्रमाणावर चर्चा करतील. पण अचानक लिव्हर फंक्शन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळी तुम्हालाही पहिला प्रश्न हाच प्रश्न पडेल ना की, मधुमेहाचा आणि लिव्हरचा काय संबंध? पण ‘हा संबंध अनेकांच्या कल्पनेपेक्षा अधिक गंभीर आहे,’ असे चेन्नई येथील डॉ. मोहन्स डायबिटीज स्पेशालिटीज सेंटरचे अध्यक्ष डॉ. वी. मोहन यांनी नमूद केले आहे.

वी. मोहन यांनी ५८ वर्षीय रमेश (नाव बदललेले) यांना यकृताच्या कार्याची चाचणी (लिव्हर फंक्शन टेस्ट) सुचवली आणि विचारले की, त्यांनी हिपॅटायटीस बी विरुद्धची लस घेतली आहे का? तेव्हा रमेश यांनी डॉक्टरांना विचारले, मला मधुमेह आहे. पण आपण यकृताबद्दल का बोलत आहोत?” मधुमेहाचा परिणाम हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मज्जातंतूंवर होतो, हे बहुतांश लोकांना माहिती असते; पण यकृतावरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव फारच कमी जणांना असते. तपासणीत रमेश यांना नकळत फॅटी लिव्हरचा त्रास असल्याचे समोर आले.

डॉ. वी. मोहन यांनी मधुमेह, फॅटी लिव्हरचा संबंध आणि संभाव्य धोक्यावर काय उपाय सांगितले जाणून घेऊयात,

मधुमेह असेल, तर यकृताच्या आजारांचाही धोका असतो का?

होय. टाइप-२ मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये यकृताशी संबंधित आजार होण्याचा धोका इतरांपेक्षा अधिक असतो. विशेषतः फॅटी लिव्हर ही समस्या अशा रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याचबरोबर, अशा व्यक्तींना हेपेटायटिससारखा विषाणूजन्य संसर्ग झाल्यास गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. तरीही मधुमेहाच्या उपचारादरम्यान यकृताच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.

मधुमेह आणि यकृताचा संबंध नेमका काय?

आपल्या शरीरात यकृत (लिव्हर) ऊर्जा साठवण्याचे महत्त्वाचे काम करते. शरीराला गरज भासल्यावर ते साठवलेले ग्लुकोज (साखर) रक्तात सोडते. मात्र, टाइप-२ मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिनचा परिणाम कमी होत असतो (इन्सुलिन रेझिस्टन्स). त्यामुळे कालांतराने यकृतात चरबी साचू लागते. या अवस्थेला आता वैद्यकीय भाषेत मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिअॅटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) असे म्हटले जाते. हा आजार मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो.

फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकतं?

फॅटी लिव्हरची सर्वात मोठी अडचण म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना हा आजार झाल्याची कल्पनाही नसते. मात्र, वेळेवर उपचार न झाल्यास यकृताला सूज येणे, त्यावर व्रण (स्कारिंग) तयार होणे, पुढे लिव्हर सिरोसिस होणे आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये यकृताच्या कर्करोगाचाही धोका वाढू शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखरेच्या प्रमाणाइतकीच यकृताच्या आरोग्याचीही नियमित काळजी घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

मधुमेहामुळे हेपेटायटिसचा धोका वाढतो का?

तज्ज्ञांच्या मते, होय. विशेषतः हेपेटायटिस-बी आणि हेपेटायटिस-सी या विषाणूजन्य संसर्गांबाबत मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हेपेटायटिस-बी चा धोका तुलनेने अधिक असू शकतो. विशेषतः उपचारादरम्यान किंवा रक्तातील साखर तपासताना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे योग्य पालन झाले नाही, तर संसर्गाचा धोका वाढू शकतो.

दुसरीकडे, हेपेटायटिस-सी चा मधुमेहाशी वेगळाच संबंध आहे. हा विषाणू शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतो, त्यामुळे टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता अधिक वाढते. म्हणजेच, मधुमेह आणि हेपेटायटिस यांचा परस्परांशी जवळचा संबंध असून, एका आजाराचा परिणाम दुसऱ्या आजारावर होऊ शकतो.

यकृताचा आजार असल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणे कठीण होते का?

होय. यकृताला इजा झाल्यास किंवा यकृताचा आजार असल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवणे अधिक कठीण होऊ शकते. कारण यकृताचे एक महत्त्वाचे काम म्हणजे शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवणे. यकृत नीट काम करत नसल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते.
याशिवाय, यकृताच्या गंभीर आजारांमध्ये मधुमेहासाठी दिल्या जाणाऱ्या काही औषधांचा डोसही बदलावा लागू शकतो. कारण यकृत या औषधांचे शरीरात विघटन आणि प्रक्रिया करण्याचं महत्वाचं कामं करतं. त्यामुळे मधुमेह आणि यकृताचे आजार यांच्यावर स्वतंत्रपणे उपचार करण्याऐवजी दोन्हींचा एकत्रित विचार करून उपचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

कोणती लक्षणे दिसल्यास सावध व्हावे?

  • फॅटी लिव्हर आणि दीर्घकालीन हेपेटायटिसच्या सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक वेळा कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत
  • अनेक रुग्णांना बराच काळ कोणताही त्रास जाणवत नाही
  • लक्षणे दिसेपर्यंत अनेकदा यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असू शकते
  • म्हणूनच केवळ लक्षणांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते
  • नियमित आरोग्य तपासणी आणि लिव्हर फंक्शन टेस्ट करून घेणे महत्त्वाचे आहे
  • गरजेनुसार स्क्रीनिंग, चाचण्या वेळेवर केल्यास यकृताचे आजार सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतात
  • लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात

मधुमेह असेल, तर यकृताची तपासणी करून घ्यावी का?

होय. मधुमेहाच्या उपचारांचा भाग म्हणून डॉक्टर अनेकदा लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) करण्याचा सल्ला देत असतात. गरज भासल्यास यकृताची सोनोग्राफी (Ultrasound) किंवा इतर विशेष तपासण्याही सुचवल्या जाऊ शकतात. या तपासण्यांमुळे यकृताशी संबंधित समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे शक्य होते.

याशिवाय, यापूर्वी रक्त संक्रमण (Blood Transfusion) झाले असेल, असुरक्षित इंजेक्शनशी संपर्क आला असेल किंवा कुटुंबात आधीच कोणाला हेपेटायटिस असेल, तर हेपेटायटिस-बी आणि हेपेटायटिस-सी च्या तपासणीबद्दल तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेपेटायटिसची लस घेणे आवश्यक आहे का?

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही अद्याप हेपेटायटिस-बी ची लस घेतली नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घ्यावी. हेपेटायटिस-बी चा संसर्ग आणि त्यातून होणारे यकृताचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी ही लस एक प्रभावी उपाय मानली जाते.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणखी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्या सवयी आवश्यक असतात, त्याच सवयी यकृताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे आणि वजन संतुलित राखणे आवश्यक आहे.
तसेच, हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये आणि आरोग्यदायी कॅलरीजचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. साखरयुक्त पदार्थ, मैद्याचे पदार्थ आणि संतृप्त चरबीचे (Saturated Fat) प्रमाण कमी ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
याशिवाय, मद्यपान टाळणे आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे किंवा हर्बल सप्लिमेंट्स घेणे टाळावे. कारण काही औषधे आणि पूरक आहार यकृतासाठी हानिकारक ठरू शकतात.