देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प यंदा प्रथमच २० दिवस उशिराने म्हणजेच २५ फेब्रुवारीला सादर होत आहे. प्रशासकीय राजवट संपल्यानंतरचा आणि भाजपच्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता यावी म्हणून राजकीय पक्षामध्ये किती टोकाची स्पर्धा असू शकते त्याचा अनुभव नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आला. 

अर्थसंकल्प उशिराने का?

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५ फेब्रुवारीच्या आत सादर करावा असा नियम असला तरी यंदा महापालिका निवडणूक तोपर्यंत पार पडलेली होती व सत्तास्थापनेच्या प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प वीस दिवस उशीराने सादर होणार आहे. महापौर पदाचे आरक्षण, निवडणूक, पहिली सभा, मग स्थायी समितीची स्थापना या प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे मुंबई महापालिकेचा बहुचर्चित अर्थसंकल्प यंदा प्रथमच उशीराने सादर होणार आहे.

शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प..

पालिकेचा अर्थसंकल्प हा दोन भागात मांडला जातो. प्राथमिक शिक्षण हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य असल्यामुळे शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जातो. शिक्षणासंबंधी निर्णय घेण्यासाठी पालिकेची स्वतंत्र अशी शिक्षण समिती ही वैधानिक समिती असून शिक्षण समितीचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. या शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वात आधी शिक्षणचा अर्थसंकल्प मांडला जातो. शिक्षण अर्थसंकल्पाचेच आकारमान हे सुमारे तीन हजार कोटींच्या आसपास असते. 

अवाढव्य आकारमान 

एका छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाइतके आकारमान मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे असते. चालू आर्थिक वर्षात पालिकेच्या अर्थसंकल्पाचे आकारमान ७४ हजार कोटींच्या पुढे होते. दरवर्षी या आकारमानात सात ते आठ टक्क्यांनी वाढ होत असते. त्यामुळे दरवर्षी पालिकेचा अर्थसंकल्प वाढत जातो. मात्र पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पाच्या या फुगवट्याला लगाम घातला होता. जेवढी गरज असेल तेवढयाच तरतुदी करण्याची शिस्त लावल्यामुळे २०१७ मध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पाचे आकारमान १२ हजार कोटींनी कमी करण्यात आले होते. २०१६ मध्ये अर्थसंकल्पाचे आकारमान ३७ हजार कोटींवर गेल्यानंतर अर्थसंकल्प पुन्हा २५ हजार कोटींवर आला होता. मात्र त्यानंतर अर्थसंकल्पाचे आकरमान वाढत जात ७४ हजार कोटींवर पोहोचले आहे. 

उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत काय?

पालिकेच्या एवढ्या मोठ्या आकारमानाच्या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे प्रमुख पाच स्रोत आहेत. जकात हा पालिकेचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत होता मात्र जकात बंद झाल्यापासून पालिकेला दरमहा राज्य सरकारकडून जीएसटी नुकसान भरपाई मिळते. त्यात दरवर्षी आठ टक्के दराने वाढ होत असते. चालू आर्थिक वर्षात १४ हजार कोटींचे उत्पन्न या नुकसान भरपाईतून अपेक्षित आहे. त्याखालोखाल दुसरा स्रोत म्हणजे मालमत्ता कर. मालमत्ता करातून साधारणतः पाच ते सहा हजार कोटींचे उत्पन्न मिळते. विकास नियोजन खात्याकडून म्हणजे बांधकामाच्या अधिमूल्यातून मिळणारे उत्पन्न चालू अर्थसंकल्पात ९७०० कोटी ग्राह्य धरण्यात आले आहे. पालिकेच्या ८० हजार कोटींच्या ठेवी असून त्यावरून व्याजातूनही पालिकेला उत्पन्न मिळत असते. तर राज्य सरकारकडे थकीत असलेली येणी देखील उत्पन्न म्हणून ग्राह्य धरली जातात. त्याव्यतिरिक्त पालिकेच्या मालमत्तांमधूनही भाडे, अधिमूल्य, मक्ता भूभाडे, पालिकेच्या मालकीच्या जमिनीवरील पुनर्विकासापोटीचे अधिमूल्य यातूनही महसूल मिळत असतो. मात्र येत्या काळात पालिकेने उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधणे आवश्यक असल्यामुळे या अर्थसंकल्पात त्याबाबत काही घोषणा होते का याबाबतही उत्सुकता आहे. 

भांडवली कामांसाठी तरतुदी 

अर्थसंकल्पात विकासकामांसाठी केली जाणारी तरतूद आणि नवीन विकास कामांच्या घोषणा हा मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असतो. सध्या पालिकेचा पश्चिम उपनगरातील सागरी किनारा मार्ग हा प्रकल्प सुरू असून त्याबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प असे काही मोठ्या कालावधीचे प्रकल्प असून त्याकरीता या अर्थसंकल्पात तरतूदी केल्या जातात. त्याचबरोबर रस्ते, पूल, पर्जन्यजलवाहिन्या, पालिकेची उद्याने, मंडया, अग्निशमन दल यांच्या दर्जोन्नतीसाठीही तरतूदी केल्या जातात. 

आर्थिक स्थितीचा अंदाज..

मुंबई महापालिकेने हजारो कोटींचे प्रकल्प हाती घेतले असून या विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधी मुळे पालिकेचा खर्च गेल्या काही वर्षात वाढला आहे. तर दुसरीकडे उत्पन्नाचे नवीन स्रोत नसल्यामुळे पालिकेचे जमाखर्चाचे गणितही बिघडू लागले आहे. त्यामुळे पालिकेला गेल्या काही वर्षांपासून शिल्लक निधीतूनच अंतर्गत कर्जाद्वारे निधी उभारावा लागतो आहे. त्यामुळे पालिकेची नक्की आर्थिक स्थिती कशी आहे याचाही अंदाज या अर्थसंकल्पातून येत असतो. 

indrayani.narvekar@expressindia.com