B’nei Menashe Israel Migration from Manipur and Mizoram: ज्यू आणि भारतीय संस्कृतीचा ऋणानुबंध हजारो वर्षांचा आहे. अलीकडेच मणिपूर आणि मिझोराममधील ब’नेई मेनाशे ज्यू समुदायातील सुमारे २४० ते २५० सदस्यांनी इस्राइलमधील तेल अवीव येथे स्थलांतर केले. ब’नेई मेनाशे ज्यू स्वतःला इस्रायलच्या दहा हरवलेल्या जमातींपैकी एका जमातीचे वंशज मानतात. मणिपूर आणि मिझोराम या दोन राज्यात ब’नेई मेनाशे यांची लोकसंख्या सुमारे ७००० आहे. हा समाज या दोन राज्यांतील मिजो आणि कुकी आदिवासी समुदायांशी संबंधित आहे. ९० च्या दशकापासून या समुदायातील हजारो सदस्य इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. परंतु, गुरुवारी इस्रायलमध्ये पोहोचलेला गट हा इस्रायली सरकारच्या स्थलांतर कार्यक्रमांतर्गत पुनर्वसित होणारा पहिला गट आहे.

त्याच पार्श्वभूमीवर ब’नेई मेनाशे कोण आहेत? त्यांचा खरोखरचं इस्रायलच्या हरवलेल्या जमातीशी संबंध आहे का? याचा घेतलेला हा आढावा.

निर्वासित जमातींचा शोध

इसवी सनपूर्व सातव्या शतकात (७२२) असिरियन साम्राज्याने उत्तर इस्रायल जिंकले. त्यावेळी निर्वासित झालेल्या लोकांमध्ये रूबेन, सिमिऑन, डॅन, नफ्ताली, गॅड, आशेर, इस्साकार, झेबुलून, एफ्राइम आणि मनाशे या दहा जमातींचा समावेश होता. गेली अनेक शतके पाश्चात्य ज्यू समाजाने हरवलेल्या जमातींच्या वंशजांचा जगभर शोध घेतला आहे. त्यात भारतीय उपखंडाचाही समावेश आहे.

धर्मांतराच्या इतिहासाशी संबंध

मिझोराम आणि मणिपूरमधील ज्यू समुदाय आपण मनाशे जमातीचे वंशज असल्याचे मानतात. ब’नेई मेनाशेचा शब्दशः अर्थ ‘मेनाशेची मुले’ किंवा ‘मनाशेची मुले’ असा होतो. या समुदायाचा असा विश्वास आहे की, निर्वासित झाल्यावर त्यांचे स्थलांतर पूर्वेकडे झाले आणि ईशान्य भारतात स्थायिक होण्यापूर्वी पर्शिया (आधुनिक इराण) आणि अफगाणिस्तानात शतकानुशतके भटकत राहिला. आपण मूळचे ज्यू असल्याचा समज या समुदायाचा असला तरी काही अभ्यासक मात्र तसं मानत नाहीत. तिबेटो-बर्मन भाषा-परिवारातील भाषा बोलणाऱ्या कुकी आणि मिजो जमातींचा आपण ज्यू असल्याला समज हा धर्मांतराच्या इतिहासाशी संबंधित असल्याचे ते मानतात.

ख्रिस्ती धर्मामुळे ज्यू धर्माचा प्रसार होण्यास कशी मदत झाली?

आग्नेय आशियातील डोंगराळ प्रदेशात वास्तव्यास असणार्‍या विविध लोकसमूहांची ओळख इस्रायलच्या हरवलेल्या जमातींचे वंशज म्हणून होण्याची सुरुवात १९ व्या शतकाच्या मध्यात प्रोटेस्टंट मिशनऱ्यांच्या अत्यंत यशस्वी प्रयत्नांतून झाल्याचे मत अभ्यासक व्यक्त करतात. बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी दीर्घकाळापासून ‘मसिहा’वर (तारणहार) विश्वास ठेवणार्‍या लोकांपर्यंत बायबल पोहोचवले. हाच विश्वास ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी एक महत्त्वाचा घटक ठरला. या प्रक्रियेत मिशनऱ्यांची ओळख अनेकदा ‘संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे’ म्हणून झाली.

Around 250 members of the B’nei Menashe community landed in Israel on Thursday night. (Source: Facebook/Degel Menashe)
(Source: Facebook/Degel Menashe)

भारतीय सत्तेविरुद्ध बंड

एलाझर म्हणतात की, १९६० च्या दशकात ईशान्य भारतात (मणिपूर आणि मिझोराममध्ये) भारतीय सत्तेविरुद्ध मोठे उठाव किंवा बंड झाले होते. अशा संघर्षाच्या काळात, जेव्हा एखादा समुदाय आपली वेगळी राजकीय किंवा सामाजिक ओळख शोधत असतो, तेव्हा त्यांना ‘आम्ही भारताचे नसून इस्रायलच्या प्राचीन जमातीचे वंशज आहोत’ ही भावना अधिक जवळची वाटली असावी. एकूणच, १९६० च्या दशकातील ईशान्य भारतातील राजकीय अस्थिरता आणि भारतीय सत्तेविरुद्धच्या प्रतिकाराच्या पार्श्वभूमीवर काही समूहांमध्ये वेगळी धार्मिक-सांस्कृतिक ओळख शोधण्याची प्रक्रिया अधिक तीव्र झाली असावी, असे एलाझर सुचवतात. गिदोन एलाझर (Gideon Elazar) हे इस्रायलमधील बार-इलान विद्यापीठात (Bar-Ilan University) प्राध्यापक आणि संशोधक आहेत.

स्वप्नातील कथेचा आधार

१९३० ते १९६० या कालखंडादरम्यान मिझोराममध्ये ख्रिश्चन धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या प्रमाणात चळवळी सुरू झाल्या होत्या. असे असतांनाही जनसमुदाय ज्यू धर्माकडे का वळला हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीचे पीएचडी संशोधक सायन लोध सांगतात की, १९५१ साली चलियानथांगा (किंवा मेला चाला) नावाच्या एका मिझो गूढवाद्याने असा दावा केला की, त्याने स्वप्नात पाहिले आहे की, मिझो, कुकी आणि चिनी लोक हे प्राचीन इस्रायली जमातींचे वंशज आहेत.

ख्रिश्चन धर्माविरुद्ध असंतोष

भारतातील ‘ज्युडायझिंग’ (Judaizing) चळवळींवर संशोधन करणारे लोध म्हणतात, “माझ्या मते, तिथल्या ख्रिश्चन धर्माच्या पद्धतींबद्दल असलेल्या असंतोषामुळे हे घडले असावे.” त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, मणिपूर आणि मिझोराममधील चिन-कुकी-मिझो जमातींमध्ये ज्युडायझिंग चळवळ १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धानंतर सक्रिय झाली. लोध सांगतात, या चळवळीला गती देण्यामागे ‘अमीशाव’ (Amishav) नावाच्या एका इस्रायली संस्थेचा मोठा वाटा होता. रबाई एलियाहू अविचैल यांच्या नेतृत्वाखालील या संस्थेचे उद्दिष्ट, मसिहाच्या आगमनासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्यासाठी जगभरात विखुरलेल्या सर्व जमातींना इस्रायलमध्ये एकत्र आणणे हे होते.

ज्यू धर्मावर संशोधन

या लोकसमूहाने १९५० च्या दशकापासूनच ज्यू बांधवांशी आणि इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. याच उद्देशाने १९७४ साली ‘मिझो इस्रायल झिओनिस्ट ऑर्गनायझेशन’ची स्थापना करण्यात आली. लोध सांगतात की, या लोकांनी हळूहळू इस्रायलवर संशोधन करण्यास सुरुवात केली. मुंबई आणि कोलकात्यातील ज्यू समुदायांशी संपर्क साधला आणि इस्रायलच्या संसदेला (क्नेसेट- Knesset) पत्र देखील पाठवले. “१९८० च्या दशकापर्यंत, अमीशाव संस्थेच्या मदतीने या समुदायाचे ज्यू धर्मात पूर्णपणे परिवर्तन झाले होते,” असे लोध नमूद करतात. असे असले तरी, मिझोराम आणि मणिपूरमधील बहुतांश लोकसंख्या आजही ख्रिश्चन धर्मीयच आहे.

पुन्हा प्रस्थापित झालेले संबंध

या लोकसमूहाचा रबाई अविचैल यांच्याशी १९७९ साली संपर्क आला. बायबलमधील ‘मेनाशे’ (Menashe) ही व्यक्ती आणि कुकी (Manmasi) व मिझो (Manasia) समुदायांमध्ये पुजले जाणारे त्यांचे पूर्वज यांच्यात काहीतरी संबंध असावा, हे सर्वात आधी त्यांच्याच लक्षात आले. अविचैल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, ‘बनेई मेनाशे’ समुदायाने अशा काही मौखिक परंपरा जपल्या आहेत ज्यांचा संबंध इस्रायलच्या भूमीशी आहे; तसेच त्यांच्या काही प्रथा ज्यू धर्माशी मिळत्याजुळत्या आहेत.

टूरिस्ट व्हिसावर इस्रायलवारी

लोध सांगतात की, १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून रबाई अविचैल आणि ‘अमीशाव’ संस्थेने बनेई मेनाशे समुदायाच्या लहान तुकड्यांना ‘टूरिस्ट व्हिसा’वर इस्रायलला नेण्यास सुरुवात केली. कारण तोपर्यंत इस्रायलने त्यांना ‘हरवलेले ज्यू’ म्हणून अधिकृत मान्यता दिली नव्हती आणि १९९२ पूर्वी भारत व इस्रायलमध्ये पूर्णतः राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते.

डीएनए (DNA) पुराव्यांचा आधार

इस्रायलमध्ये गेलेल्या या लोकांनी तेथे ‘ऑर्थोडॉक्स ज्युडाइझम’चे (Orthodox Judaism) शिक्षण घेतले आणि तो धर्म स्वीकारला (इस्रायलमध्ये रिफॉर्म आणि कन्झर्व्हेटिव्ह ज्युडाइझमचा फारसा प्रभाव नाही). लोध पुढे सांगतात, “त्यापैकी काही लोक नंतर भारतात परतले आणि त्यांनी येथील समुदायाला ज्यू धर्म व त्यांच्या परंपरांबद्दल अधिक माहिती दिली.” लोध सांगतात की, २००५ साली इस्रायलच्या ‘चीफ रॅबिनेट’ने (इस्रायलमधील ज्यू धार्मिक बाबींवरील सर्वोच्च संस्था) कोलकाता येथील शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या डीएनए (DNA) पुराव्यांच्या आधारे, बनेई मेनाशे समुदायाला अधिकृतपणे इस्रायलचे हरवलेले वंशज (Lost Seed of Israel) म्हणून घोषित केले.

कोहेन मोडल हॅप्लोटाइप

परंतु, हायफा येथील ‘टेक्नियन-इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष नाकारले आणि स्वतः चाचण्या घेतल्या. परंतु त्यांचे निकाल अनिर्णित राहिले. दोन्ही प्रकरणांत, काही नमुन्यांमध्ये ‘कोहेन मोडल हॅप्लोटाइप’ (ज्यूंमधील कोहानिम लोकांमध्ये आढळणारे एक अनुवांशिक चिन्ह) आढळले होते. या संशोधनानंतर आणि रॅबिनेटच्या निर्णयामुळे, इस्रायलने बनेई मेनाशे समुदायाला छोट्या तुकड्यांमध्ये स्थलांतर करण्याची परवानगी दिली; तरीही अनेकदा ही प्रक्रिया मध्येच थांबवण्यात आली होती. एलाझर नमूद करतात की, “अलीकडच्या काही वर्षांत, रॅबिनेटच्या पाठिंब्यामुळे आणि सरकारी यंत्रणांच्या काहीशा साशंक संमतीनंतर, हजारो बनेई मेनाशे इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत.”

इस्रायलमध्ये वर्णभेद

मात्र, लोध यांना त्यांच्या संशोधनात असे आढळले की, त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे (facial features) या समुदायाला इस्रायलमध्ये वर्णभेदाचा (racism) सामना करावा लागतो. दरम्यान, २००० ते २०२० या काळात ‘शावेई इस्रायल’ (Shavei Israel) नावाच्या दुसऱ्या एका संस्थेने ‘अमीशाव’चे कार्य पुढे नेले आणि या समुदायाचे इस्रायलमधील स्थलांतर व पुनर्वसन यासाठी मदत केली. २०२० पासून ‘देगेल मेनाशे’ (Degel Menashe) नावाची नवीन संस्था उदयाला आली आहे. पूर्वीच्या संस्थांच्या तुलनेत या संस्थेचे वैशिष्ट्य असे की, तिचे संचलन खुद्द बनेई मेनाशे समुदायाचे सदस्यच करत आहेत. शेवटी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इस्रायल सरकारने बनेई मेनाशे समुदायाच्या सुमारे ५००० सदस्यांचे पुनर्वसन आणि स्थलांतरासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला.

इतर ‘हरवलेल्या जमाती’

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात, भारतातील आणखी एका समुदायाने ‘हरवलेल्या जमातीचे’ वंशज असल्याचा दावा केला. हा समुदाय आंध्र प्रदेशातील तेलगू भाषिक ‘बनेई एफ्राइम’ (B’nei Ephraim) समुदाय होय. हा समुदाय स्वतःला ‘एफ्राइम’ जमातीचे वंशज मानतो. ते सुमारे १००० वर्षांपूर्वी मध्य आशियामार्गे भारतात आले होते असे मानतात. या गटाची ज्यू धर्माशी ओळख होण्यासाठी १९८० च्या दशकात त्यांचे नेते श्मुएल याकोबी यांनी जेरुसलेममध्ये प्रवास केला. एलाझर लिहितात, “हा गट दलित वर्गातील आहे. ज्यू वंशाचा दावा करणे हे अनेकदा उच्च जातींकडून आणि अमेरिका व इस्रायलमधील ज्यूंकडून लक्ष वेधून घेऊन, कठोर जातिभेदावर मात करण्याचे एक साधन म्हणून पाहिले जाते.”

पश्तून

हरवलेल्या जमातींशी जोडला जाणारा आणखी एक मोठा गट म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील पठाण (पश्तून). त्यांच्यापैकी अनेकजण आपल्या हिब्रू वारशाच्या परंपरा शोधण्यात रस दाखवतात. मात्र, ‘बनेई मेनाशे’ समुदायापेक्षा वेगळेपण असे की, पश्तून लोक कट्टर मुस्लिम आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत धर्मांतराचा मुद्दा अत्यंत संवेदनशील मानला जातो.