राज्यात विशेषत: पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा मोठा फटका बसला. सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यभरातून साडेसतरा हजार तक्रारी झाल्या आहेत. त्यामध्ये खासगी कंपन्यांसह सरकारी महाबीज बियाण्यांच्या बाबतही प्रचंड ओरड आहे. त्यावर कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होण्यामागे नैसर्गिक कारण व अयोग्य पेरणी पद्धत कारणीभूत असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात सोयाबीनची स्थिती काय?
राज्यात पाच दशकांपूर्वी आगमन झालेल्या सोयाबीन पिकांची झपाट्याने व्याप्ती वाढत गेली. यंदाच्या खरीप हंगामामध्ये साधारणत: ४५ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. त्यानंतर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात कृषी विभागाने या तक्रारींकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. विविध ठिकाणी झालेली आंदोलने व तक्रारींचा आकडा फुगल्यावर कृषी विभागाला जाग आली. सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या राज्यभरातून १७ हजार ४७३ तक्रारी झाल्या आहेत. तक्रार निवारण समितीकडून तपासणी झाली. समितीच्या अहवालानंतर राज्यात ८५ गुन्हे दाखल आहेत. अमरावती विभागात सर्वाधिक तक्रारी असून ७५ गुन्हे दाखल झाले. महाबीज कंपनीच्या विरोधात हजारावर तक्रारी आहेत. खासगी कंपन्यांसह महाबीजचे देखील अप्रमाणित बियाणे आढळून आले. त्यानंतरही अद्याप महाबीजवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हंगामात प्रमाणित बियाण्यांची मागणी किती?
राज्यात आता सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत आहे. दरवर्षी साधारणत: ४५ ते ५० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होते. त्यासाठी ३० लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी अपेक्षित असते. बहुतांश शेतकरी घरचे बियाणे वापरतात. १२ लाख क्विंटलपर्यंत प्रमाणित सोयाबीन बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांकडून दरवर्षी केली जाते. यंदा महाबीजने शेतकऱ्यांना २२ वेगवेगळ्या प्रकारचे दोन लाख ३० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले. उर्वरित अंदाजे नऊ लाख ७० हजाार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांचे खरेदी केले. नऊ ते १० लाख क्विंटल सोयाबीन बियाणे पुरवण्याची क्षमता महाबीजची असली तरी शेतकरी खासगी कंपन्यांच्या बियाण्यांकडे आकर्षित होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
पावसाचा किती परिणाम झाला?
‘एल निनो’चे मोठे संकट ओढवले आहे. त्याचा परिणाम खरीप हंगामामध्ये दिसून आला. सोयाबीनची यशस्वी पेरणी करण्यासाठी चतु:सूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये बियाणे घरचे किंवा विकतचे असले तरी त्याची उगवण क्षमता तपासावी, बुरशीनाशक, जैविक खतांशी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया, ७५ मि.मी. ते १०० मि.मी. पाऊस अथवा सहा इंच जमीन ओली झाल्यानंतरच पेरणी व ३ ते ५ से.मी. खोली दरम्यान पेरणीचा सल्ला दिला होता. अनेक भागात कमी पावसात पेरणी झाल्याचे समोर आले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम आहे. शिवाय ट्रॅक्टरने अधिक खोलवर किंवा वेगाने पेरणी केल्याने सुद्धा सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
‘एल निनो’मुळे शेतकऱ्यांचा बदलता कल?
‘एल निनो’चा मोठा परिणाम होत असल्याची जनजागृती शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात झाली. खरीप हंगामामध्ये ‘एल निनो’चा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांचा बदलता कल दिसून आला. हंगामाच्या सुरुवातीला यंदा सोयाबीन पिकाच्या पांढऱ्या फुलांच्या जातींना प्रचंड मागणी राहिली. यामध्ये लवकरच पिकण्याचा गुणधर्म, उच्च उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती असल्याने त्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी लवकर उत्पादन येण्यासाठी पांढऱ्या फुलांच्या जातींचे वाण पेरण्यावर भर दिला. अचानक मागणी वाढून देखील अनेक खासगी कंपन्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला. त्यामध्ये गुणवत्तेत तडजोड होऊन शेतकऱ्यांना उगवण क्षमतेत फटका बसल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याच्या दरवर्षीच तक्रारी असतात. सोयाबीन बियाणे मूळात अत्यंत नाजूक असते. बियाण्यांची हाताळणी काळजीपूर्वक न केल्यास ते क्षतिग्रस्त होऊन त्याचा परिणाम उगवण क्षमतेवर देखील होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
बोगस बियाण्यांवर महाबीजची भूमिका काय?
महाबीजशी ३० ते ४० हजार बीजोत्पादक शेतकरी जुळले आहेत. संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणी करून ७० टक्के उगवण क्षमता असलेले बियाणे पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते. बीज प्रमाणीकरण यंत्रणा आणि महाबीजकडून चार वेळा तपासणी होते. क्षेत्रिय उगवण क्षमता चाचणी देखील केली जाते. महाबीजने पुरवठा केलेल्या एकूण बियाण्यांपैकी १४५ क्विंटल बियाण्यांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचे प्रमाण ०.०६ टक्के आहे, असे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी सांगितले.
prabodh.deshpande@expressindia.com
