Laila Khan Murder Case Explainer : अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत एका चित्रपटात काम करणारी अभिनेत्री लैला खान ऊर्फ रेशमा पटेल हिची २०११ मध्ये अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तिच्यासह कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह इगतपुरी येथील एका फार्म हाऊसवर सापडले होते. सगळ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेला जवळपास १५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील हे प्रकरण आजही भारतातील सर्वाधिक थरकाप उडवणाऱ्या कौटुंबिक हत्याकांडांपैकी एक मानले जाते. या प्रकरणात लैला खानच्या सावत्र वडिलांना २०२४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर या गुन्ह्यातील एक कथित साथीदार अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर हे हत्याकांड नेमके कसे घडले होते? त्यामागे आरोपीचा हेतू काय होता? पोलिसांनी गुन्ह्याचा छडा कसा लावला? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
अभिनेत्री लैला खान हिने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Wafa: A Deadly Love Story’ या चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. २०११ मध्ये लैला खान, तिची आई सेलिना आणि कुटुंबातील अन्य चार सदस्य अचानक बेपत्ता झाले होते. सुरुवातीला हे प्रकरण अत्यंत साधे वाटत होते. मात्र, तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या सामूहिक हत्याकांडाचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी अंबादास पोटे यांनी अलीकडेच गुन्हेगारी विषयावरील लेखक आणि पत्रकार हुसेन झैदी यांच्याशी संवाद साधला. एका बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारीपासून सुरू झालेला तपास देशातील सर्वाधिक भीषण हत्याकांडापर्यंत कसा पोहोचला, याचा संपूर्ण थरार त्यांनी यावेळी मांडला.
लैला खानच्या आईचा तीनदा विवाह
अंबादास पोटे यांच्या माहितीनुसार, लैला खानची आई सेलिना हिचा पहिला विवाह नादिर पटेल यांच्याशी झाला होता. मात्र, काही दिवसांच्या सुखी संसारानंतर १९९२ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. पहिल्या पतीपासून सेलिनाला लैलासह चार अपत्ये होती. नंतर तिने आसिफ शेख याच्याशी विवाह केला; पण त्यांच्यातही घटस्फोट झाला. त्यानंतर तिने परवेझ टाक याच्याशी तिसरा विवाह केला. लैला खान आणि तिची आई शेलिना तसेच भावंडे अजमिना, इम्रान आणि झारा तसेच भाची रेशमा असे सहा जणांचे कुटुंब ओशिवरा येथील फ्लॅटमध्ये परवेझ टाक याच्यासह राहत होते. पोटे यांनी सांगितले की, परवेझ हा लैला खानच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीवर नाराज होता. तिने चित्रपटांमध्ये काम करू नये, अशी त्याची इच्छा होती. तसेच, लैला त्याच्याशी ज्या पद्धतीने वागत होती, त्याबाबतही तो नाराज होता. या तक्रारी त्याने सेलिनाकडे अनेकदा मांडल्या, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
परवेझ खानला काय खटकत होते?
कालांतराने कौटुंबिक मालमत्तेवरील मतभेद आणि लैलाने कामासाठी दुबईला जावे, असा परवेझ टाकचा प्रस्ताव यामुळेही त्याच्या घरातील तणाव वाढला. मात्र, लैलाने हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर टाकने संपूर्ण कुटुंबाविरोधात कट रचण्यास सुरुवात केली. पोटे यांच्या म्हणण्यानुसार, परवेझ टाकने आधी आपल्या एका साथीदाराची इगतपुरी येथील कुटुंबाच्या फार्महाऊसवर रखवालदार म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर काही दिवस विश्रांतीसाठी फार्महाऊसवर जाण्याचा सल्ला त्याने कुटुंबाला दिला. ८ फेब्रुवारी २०११ मध्ये त्याने या सर्वांना दोन गाड्यांतून इगतपुरीतील फार्म हाऊसवर नेले. तेथील पहारेकरी शकीर वाणी याच्या मदतीने या सहाही जणांची टाकने हत्या केली. त्यांचे मृतदेह फार्म हाऊसच्या मागील भागात पुरले. त्यानंतर तो जम्मू-काश्मीरमध्ये निघून गेला. लैला खान व कुटुंबीय जम्मू-काश्मीरला गेल्याचे त्याने सांगितले. परंतु प्रत्यक्षात दोन-तीन आठवड्यानंतरही हे कुटुंबीय न परतल्याने सेलिनाचा पहिला पती नादिर पटेल यास संशय आला. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे अंधेरी युनिटचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी या घटनेचा तपास सुरू केला.
हत्याकांडाचा असा झाला उलगडा
तपासादरम्यान पोलिसांना मुंबईतील कुटुंबाच्या घरातून परवेझ टाकचे आधार कार्ड मिळाले. या धाग्याच्या आधारे संशयाची सुई त्याच्याकडे वळली. त्यानंतर मुंबई पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काश्मीरमधून परवेझला अटक केली. मुंबई गुन्हे शाखेचे माजी अधिकारी अंबादास पोटे यांच्या माहितीनुसार, अटकेनंतर परवेज टाकने चौकशीदरम्यान हत्याकांडाची कबुली दिली. त्याने सांगितले की, लैला खान आणि तिचे कुटुंबीय मित्सुबिशी कारने इगतपुरीतील फार्महाऊसवर गेले होते. संध्याकाळी सर्वांनी बार्बेक्यूचा आनंद घेतला, नृत्य केले आणि त्यानंतर झोपण्यासाठी आपआपल्या खोल्यांमध्ये गेले. रात्री उशिरा परवेज टाक आणि त्याच्या एका साथीदाराने लोखंडी रॉड आणि चाकूच्या साहाय्याने कुटुंबीयांवर हल्ला केला. या हल्ल्यात लैलाचा भाऊ इम्रान जखमी असूनही कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, कोणताही जिवंत राहू नये यासाठी प्रत्येक जण कोसळल्यानंतरही परवेज टाक त्यांच्यावर वार करत राहिला. पोलीस तपासाची दिशाभूल करण्यासाठी कुटुंबाची एक कार जम्मूपर्यंत नेऊन तेथे टाकून दिल्याचाही परवेझवर आरोप आहे.
फार्म हाऊसमध्येच पुरले सहा मृतदेह
अंबादास पोटे यांच्या माहितीनुसार, परवेझ याने कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या केल्यानंतर इगतपुरीच्या फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूलसाठी खोदलेल्या खड्ड्यात सहा मृतदेह पुरले होते. सुरुवातीला तीन मृतदेह खड्ड्यात ठेवून त्यावर गाद्या आणि उशा टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित तीन मृतदेह त्यावर ठेवून संपूर्ण खड्डा मातीने भरून टाकण्यात आला. तपासासाठी पोलीस फार्महाऊसवर पोहोचले तेव्हा पावसामुळे खड्ड्यावरील माती किंचित खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा तासांच्या खोदकामानंतर पोलिसांनी मृतदेह मिळत नव्हते. पोटे यांच्या मते, उत्खनन सुरू असताना पोलिसांना सुरुवातीला परवेझ च्या कबुलीजबाबावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे त्याची वारंवार चौकशी केली जात होती. अखेर खड्ड्यातून मानवी अवशेष बाहेर काढण्यात आले. वैद्यकीय तज्ज्ञांनी ते सांगाड्याचे अवशेष असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली.
परवेज टाकला फाशीची शिक्षा
२०१२ मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी एनडीटीव्हीशी बोलताना परवेझ टाकबाबत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. परवेज हा अत्यंत चलाख, धूर्त आणि धोकादायक गुन्हेगार आहे. कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरीही त्याची कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार नाही, असे ते म्हणाले होते. अखेर पोलिसांनी परवेझला अटक करून सर्व पुराव्यासह न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणावर दीर्घ न्यायालयीन सुनावणी झाली आणि २०२४ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने अखेर परवेझला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. हा गुन्हा अत्यंत अमानुष आणि समाजाच्या विवेकबुद्धीला पूर्णपणे हादरवून टाकणारा आहे. आरोपीने अतिशय थंड डोक्याने सहा जणांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले. त्यामुळे हा गुन्हा तब्बल १७ महिने उघडकीस आला नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते. या प्रकरणाबाबत माजी पोलीस अधिकारी अंबादास पोटे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. या संपूर्ण हत्याकांडाच्या कटात परवेझ टाकला मदत करणारा त्याचा कथित साथीदार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तो फरार असून तो अद्यापही पोलिसांना सापडला नाही, असे पोटे यांनी सांगितले.
कोण होती अभिनेत्री लैला खान?
राजेश खन्ना यांच्यासोबत ‘वफा’ या चित्रपटात काम केल्यामुळे अभिनेत्री म्हणून लैला खानला अल्पावधीतच थोडी-फार प्रसिद्धी मिळाली होती. मात्र या प्रसिद्धीच्या जोरावर तिला काही बी ग्रेड चित्रपट मिळाले. त्यावेळी ‘आयटम साँग’ ही कल्पना भारतीय चित्रपटात फारशी रुजली नव्हती त्याकाळात तिला तशा काही भूमिका मिळाल्या. २००२ मध्ये कन्नड चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या लैला खान हिने सहकलाकार म्हणून काही भूमिका केल्या. मात्र त्यानंतर तिला फारसे चित्रपट मिळाले नाही. त्यामुळे मॉडेलिंग वा अन्य मार्गाने पैसा कमावत होती. परवेझ हा तिच्या आईसोबत राहत असला तरी त्याच्याकडून लैला तसेच इतर भावंडे कामे करून घेत होती. मात्र शेलिनाने परवेझशी निकाह केल्यानंतरही त्यांच्या वागण्यात बदल झालेला नव्हता.
