सोशल मीडियाची ताकद गेल्या काही वर्षांत सगळ्यांनीच अनुभवली आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या स्तरातील प्रेक्षक बॉलिवूडला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. खासकरून कोविड काळानंतर प्रेक्षकांचा हा रोष आणखीन वाढला असून त्याचा थेट परिणाम चित्रपटांवर होताना आपल्याला दिसत आहे. आमिर खान, अक्षय कुमारसारख्या कलाकारांचे चित्रपट जोरदार आपटले. या पाठोपाठ नुकत्याच आलेल्या ‘ब्रह्मास्त्र’च्या बाबतीतही असाच प्रकार घडला. गेले काही महीने या चित्रपटाच्या विरोधात जोरदार प्रदर्शनं सुरू आहेत. चित्रपटातले मुख्य कलाकार उज्जैन येथे दर्शनाला गेले असताना त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता यावरून वाद चिघळला होता.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याने बऱ्यापैकी चांगली कमाई केल्याचं चित्रं सध्यातरी बघायला मिळत आहे. याविरोधात अजूनही जोरदार बॉयकॉट कॅम्पेन सुरू आहे. तर हा चित्रपट बॉयकॉट करण्यामागची नेमकी कारणं आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

मूळ कथा भलतीच :

२०१९ मध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची घोषणा केली होती. त्याच्या पोस्टच्यानुसार या चित्रपटाची मूळ कथा १३ व्या शतकातल्या पर्शियन कवि जलालुद्दीन मुहम्मद रूमि याच्यावर आधारित होती आणि त्यात रणबीरच्या पात्राचं नाव रूमि होतं. अयान मुखर्जीची ही पोस्ट ब्रह्मास्त्रच्या प्रदर्शनाआधीच प्रचंड व्हायरल झाली आणि ब्रह्मास्त्र बॉयकॉट करण्यामागचं हे प्रमुख कारण लोकांच्या समोर आलं.

रणबीरचं गोमांसविषयी वादग्रस्त वक्तव्य :

ज्याप्रमाणे आमिरच्या चित्रपटाआधी त्याची जुनी वादग्रस्त वक्तव्यं व्हायरल केली जात होती तीच गोष्ट रणबीरच्या बाबतीतसुद्धा घडली. एका बऱ्याच जुन्या मुलाखतीमध्ये रणबीरने त्याला बीफ म्हणजेच गोमांस खाणं प्रचंड आवडतं असं वक्तव्यं केलं होतं. तेच वक्तव्यं ब्रह्मास्त्रच्या प्रदर्शनाआधी सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि समाजातला एक मोठा वर्ग याविषयी त्वेषाने बोलू लागला. रणबीरच्या या वक्तव्याने काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने हा बॉयकॉट ट्रेंड जोर धरू लागला. याबरोबरच रणबीरच्या याआधी प्रदर्शित झालेल्या ‘शमशेरा’ या चित्रपटातूनसुद्धा असंच एका वर्गाचं वादग्रस्त चित्रण केल्याने नेटकरी आणखीन भडकल्याचं म्हंटलं जातं.

आलिया भट्ट आणि तिचं कुटुंब :

आलियाचे वडील म्हणजे सुप्रसिद्ध महेश भट्ट हे याआधी बऱ्याचदा अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे अडचणीत सापडले होते. सगळ्यांसमोर मुलीचं चुंबन घेण्यापासून उग्रवादी लोकांशी संबंध ठेवणाऱ्या महेश भट्ट यांच्याविरोधात गेले काही महीने चांगलाच रोष बघायला मिळत आहे. ‘२६/११ आरएसएस की साजिश’ या पुस्तकाच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली होती. यावरूनसुद्धा त्यावेळेस प्रचंड वादंग निर्माण झालं होतं. याच कुटुंबातली आलिया भट्ट ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने या चित्रपटाला बॉयकॉट सामना करावा लागला आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे.

ब्रह्मास्त्र टीमकडून वादग्रस्त ट्वीट :

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या एका सहकारी श्रीनि वर्मा हिने चित्रपटाच्या ट्रेलरनंतर हिंदू समाजाबद्दल, गोमूत्राबद्दल तसेच आरएसएस बद्दल एक वादग्रस्त ट्वीट केलं होतं. जे नंतर डिलिट केलं असलं तरी त्याचे स्क्रीनशॉट अजूनही सोशल मीडियावर बघायला मिळतात. चित्रपटातून प्राचीन भारतीय सनातन संस्कृतिचं दर्शन घडेल असं सगळ्या प्रमोशनमध्ये सांगितलं गेलं, पण याच चित्रपटाशी जोडलेल्या अशा विधानाने या बॉयकॉटच्या ठिणगीचं एका वणव्यात रूपांतर केलं.

आणखी वाचा : जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

बॉलिवूड कलाकारांचा उर्मटपणा :

बॉयकॉट ट्रेंड जरा व्हायरल झाला आणि आमिर, अक्षयसारख्या मोठ्या स्टारचे चित्रपट आपटले तेव्हा याच बॉलिवूडशी जोडलेल्या काही कलाकारांनी मीडियासमोर वादग्रस्त वक्तव्यं द्यायला सुरुवात केली. अर्जुन कपूर, आलिया भट्ट तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांनी अशी बरीच विधानं केली ज्यामुळे आधीच बॉलिवूडवर नाराज असणारा प्रेक्षक आणखीन खवळला.

यापेक्षाही आणखीन बरीच कारणं आणि बऱ्याच थिअरीज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित जरी झाला असला आणि पहिल्याच दिवसांत चांगली कमाई केली असली तरी हे चित्र बराच काळ बघायला मिळणार नाही असं काही तज्ञांचं मत आहे. एकीकडे ब्रह्मास्त्रचे चाहते या चित्रपटाची भरपूर प्रशंसा करत आहेत तर दुसरीकडे बॉलिवूड नाराज असलेला एक मोठा प्रेक्षकवर्ग या चित्रपटावर टीका करत आहे. हा चित्रपट भरपूर कमाई करून रेकॉर्ड ब्रेक करेल का? ते येणारी वेळच ठरवेल.