ब्रिटनमधील साउथॅम्प्टन येथे झालेल्या एका १८ वर्षीय ब्रिटिश तरूणाच्या हत्येवर इलॉन मस्क व अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १८ वर्षीय नोवाक हेन्रीची २३ वर्षीय ब्रिटिश निहंग शीख विक्रम दिगवा याने रस्त्यावर धारदार शस्त्राने हत्या केली होती. या प्रकरणी विक्रम दिगवा याला किमान २१ वर्षांची कारावासाची शिक्षा १ जून रोजी ठोठावण्यात आली. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ही हत्या झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नोवाकला आरोपी समजले, तर दिगवाला पीडित समजले होते.
नोवाक हेन्री रक्ताच्या थारोळ्यात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अति रक्त गेल्याने नोवाक बेशुद्ध झाल्यानंतर पोलिसांनी रूग्णवाहिका बोलावली. दरम्यान, आपल्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे, असे नोवाकने पोलिसांना सांगितले. तेव्हा “नाही मित्रा, मला असं वाटत नाही”, असे उत्तर पोलिसांनी नोवाकला दिले. नुकत्याच समोर आलेल्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून हा खुलासा झाला आहे.
विक्रम दिगवाने हेन्री नोवाकची हत्या का केली?
घटना घडली त्या रात्री साडे अकरा वाजता हेन्री नोवाक घरी जात होता. ‘बीबीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, निहंग शिख विक्रम दिगवा हा रस्त्याने जात असताना हेन्रीला त्याच्याकडे असलेले धारदार शस्त्र दिसले. त्यामुळे हेन्रीने त्याचे व्हिडीओ शुटिंग सुरू केले. “तू वाईट व्यक्ती आहेस का?”, अशी विचारणा हेन्रीने दिगवाला केली. त्यानंतर दिगवाने हेन्रीचा फोन हिसकावून घेतला. तसेच त्याच्या छाती व पायावर पाच वेळा धारदार शस्त्राने वार केले. दिगवाने त्यानंतर आपात्कालीन सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणांना घटनेची माहिती दिली. हेन्रीने आपली पगडी ओढल्याचा तसेच वंशवादावरून टीका केल्याचा आरोप दिगवाने केला.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात नोवाक पोलिसांना म्हणतो, “मला भोसकण्यात आले आहे. मी श्वास घेऊ शकत नाही.” दिगवाने नोवाकवर खोटे आरोप केल्याने पोलिसांनी नोवाकलाच बेड्या ठोकल्या. नोवाकची खालावत जाणारी प्रकृती लक्षात घेण्यात पोलिसांनी तीन मिनिटे वाया घालवली. न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी दिगवाचे आरोप फेटाळून लावले. दिगवाने हत्येसाठी वापरलेले कृपाण हे सामान्य कृपाणपेक्षा लांब होते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले. तसेच नोवाकने वंशवाद आणि शारीरिक टिपण्णी केल्याचा दावाही फेटाळून लावला. दिगवाच्या आईलाही या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. तिच्यावर शस्त्र घरात लपवून ठेवल्याचा आरोप आहे.
डीईआय प्रोटोकॉल काय आहे?
या घटनेत पोलिसांनी डीईआय प्रोटोकॉलचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. या प्रोटोकॉलनुसार, समानतेला महत्त्व दिले जाते. परंतु, प्रत्येकाला एकसमान वागणूक देणे महत्त्वाचे आहे, असे नाही. एका कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या झाल्यानंतर १९९९ मध्ये आलेला ‘मॅकफेरसन अहवाल’ आणि २०२३ च्या ‘कॅसे रिव्हिव’ घटनेत ब्रिटिश पोलिसांवर वंशवाद केल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे वंशवाद टाळण्यासाठी ब्रिटिश पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अल्पसंख्याकांशी संबंधित प्रकरणे हाताळताना अमानुष छळ केला जातो, असा ब्रिटिश पोलिसांबाबत पूर्वाग्रह दूषित आहे. २०२२ मध्ये पोलिसांना अशी प्रकरणे हाताळण्यासाठी १ दशलक्ष युरो खर्च करून प्रशिक्षण देण्यात आले होते. याच प्रशिक्षणाचा वापर पोलिसांनी नोवाक हत्या प्रकरणात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डीईआय (डायव्हर्सिटी – विविधता, इक्विटी – एकजुटता, इमिग्रेशन – स्थलांतर) प्रोटोकॉलवर टीका होत आहे.
ब्रिटनमध्ये राजकीय पडसाद कसे उमटले?
९ जून रोजी ब्रिटनमध्ये साउथॅम्प्टन येथे या घटनेविरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच ब्रिटनमध्ये शीख समुदायावर हल्ला झाल्याच्या काही घटना समोर आल्या. या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश म्हणाले, याकडे गुन्हेगारी प्रकरण म्हणून बघितले पाहिजे. शीख धर्माशी याचा संबंध जोडू नये. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले, या घटनेमुळे जातीय तणाव निर्माण होता कामा नये. स्टार्मर यांनी धारदार शस्त्रांच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा चर्चेत असताना हे प्रकरण समोर आल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
इलॉन मस्क, जे.डी.व्हान्स यांची टीका
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी या प्रकरणी मत व्यक्त केले आहे. ब्रिटनच्या नागरिकांचे आंदोलन योग्य आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आक्रमणाला रोखण्यात युरोपियन इलाइट अपयशी ठरल्याचे व्हान्स म्हणाले. त्यांनी या हत्येचा निषेध केला आहे. एखादी सभ्यता जशी नष्ट होते, तशी नोवाकची हत्या आहे, असेही व्हान्स म्हणाले. ब्रिटनच्या उपपंतप्रधानांनी व्हान्स यांना फोनवरून माहिती दिली. ते म्हणाले, या घटनेचा आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराचा काहीही संबंध नाही. तर नोवाकच्या वडिलांनी म्हटले, त्याचा मृत्यू आणखी तणाव, विभाजन आणि द्वेष निर्माण होण्याचे कारण ठरू नये.
इलॉन मस्क यांनी ब्रिटनमधील विरोधी पक्षाच्या एका खासदाराच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. दिगवाला मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्या खासदाराने केली आहे. तसेच पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यासाठी लढाव्या लागणाऱ्या न्यायालयीन लढाईला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मस्क यांनी म्हटले आहे. नोवाकच्या हत्येनंतर अमेरिका व ब्रिटनमधील उजव्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आले आहेत.
