King Charles USA visit schedule and Prince Harry relationship update: ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय आणि त्यांच्या पत्नी राणी कॅमिला चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेल्या आहेत. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व युनायटेड किंग्डममधील संबंध सुधारण्यासाठी किंग चार्ल्स तृतीय अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांची किंग चार्ल्स यांनी भेट घेतली. दरम्यान, किंग चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स हॅरी हे अमेरिकेत वास्तव्य करतात. प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटनच्या राजघराण्याबरोबर असलेले संबंध तोडले आहेत. ते त्यांच्या पत्नी मेगन यांच्यासह वेगळे राहतात. किंग चार्ल्स हे अमेरिका दौऱ्यात प्रिन्स हॅरी यांची भेट घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटन तसेच अमेरिकेत हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील हा वाद नेमकं काय आहे? ते जाणून घेऊयात.

किंग चार्ल्स तृतीय यांचा अमेरिका दौरा

किंग चार्ल्स व राणी कॅमिला यांचा अमेरिका दौरा सोमवारपासून सुरू झाला. किंग चार्ल्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ब्रिटिश राजदूतांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिथे त्यांनी अमेरिकन अधिकारी व माध्यमांशी संवाद साधला. मंगळवारी किंग चार्ल्स यांनी यूएस काँग्रेसला संबोधित केले. २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी अमेरिका व युकेमधील संबंध आणखी वाढवण्यावर भर दिला. ब्रिटनच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने यूएस काँग्रेसला संबोधित केल्याची ही दुसरी वेळ आहे. किंग चार्ल्स यांच्या आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी यूएस कॅपिटलमध्ये १९९१ मध्ये भाषण दिले होते. मंगळवारी रात्री किंग चार्ल्स यांच्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते की, या दौऱ्यात अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून २५० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्याचा उत्सव साजरा केला जाईल. तसेच अमेरिका व युनायटेड किंग्डममधील ऐतिहासिक संबंध दृढ करण्यावर जोर दिला जाईल. बुधवारी किंग चार्ल्स व राणी कॅमिला न्यूयॉर्क शहराला भेट देणार आहे. ११ सप्टेंबर २००१ (९/११) रोजी झालेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना ते श्रद्धांजली अर्पण करणार आहे. गुरूवारी व्हर्जिनिया येथे अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाने त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. दरम्यान, चार्ल्स हे त्यांच्या दौऱ्यात नॅशनल पार्कला भेट देणार आहेत, तर कॅमिला या अमेरिकेच्या ‘हॉर्स रेसिंग’ क्षेत्राबद्दल माहिती घेणार आहेत. चार दिवसांचा दौरा आटपल्यानंतर दोघे पती-पत्नी बेरमुडाला रवाना होणार आहेत. ब्रिटनचे राजे झाल्यानंतर चार्ल्स यांचा पहिलाच विदेश दौरा आहे, असे पीपल मॅग्झिनने म्हटले आहे.

प्रिन्स हॅरी व ब्रिटिश राजघराण्यात वाद काय?

प्रिन्स हॅरी हे त्यांच्या पत्नी मेगन यांच्याबरोबर ब्रिटिश राजघराण्यातून २०२० मध्ये बाहेर पडले. त्यावेळी ब्रिटिश राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर आले. जोडप्याने अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आश्रय घेतला. तिथे त्यांनी काही माध्यमांशी संबंधित प्रकल्प व सेवाकार्य सुरू केले. स्वेच्छेने राजघराणे सोडल्यानंतर प्रिन्स हॅरी यांच्या सुरक्षेचा दर्जा कमी करण्यात आला. त्यांची पूर्णवेळी सुरक्षा काढून घेण्यात आली. परिस्थितीनुसार त्यांना सुरक्षा पुरवली जात होती. या निर्णयाला हॅरी यांनी आव्हान देत याचिका दाखल केली, परंतु, न्यायालयाने ती फेटाळली. २०२१ मध्ये ओप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत, हॅरी आणि मेगन यांनी आरोप केला होता की, त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स आर्ची याच्या जन्मापूर्वी त्याच्या त्वचेच्या रंगाबाबत राजघराण्यातील एका सदस्याने चिंता व्यक्त केली होती.

हॅरी यांनी त्यांच्या ‘स्पेयर’ या वादग्रस्त आत्मचरित्रात कुटुंबावर गंभीर आरोप केले. पत्नी मेगनवरून झालेल्या वादादरम्यान त्यांचे मोठे बंधू प्रिन्स विल्यम यांनी त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला होता, असा दावा हॅरी यांनी आत्मचरित्रात केला. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत हॅरी म्हणाले, यूकेच्या गृह मंत्रालयासोबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमुळे त्यांचे वडील किंग चार्ल्स हे त्यांच्याशी बोलत नाहीत. ‘पीपल’ मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, किंग चार्ल्स हॅरींचे फोन घेणे टाळत होते आणि त्यांच्या मेसेजला उत्तरही देत नव्हते. दरम्यान, हॅरी यांनी आता आपल्या कुटुंबासोबत पुन्हा एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “माझ्या कुटुंबातील काही सदस्य मला पुस्तक लिहिण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी कधीही माफ करणार नाहीत. मला माझ्या कुटुंबासोबत सलोखा साधायला आवडेल. आता आणखी भांडत राहण्यात काही अर्थ नाही. आयुष्य अनमोल आहे.”, असे हॅरी म्हणाले होते. हॅरी यांच्या या विधानामुळे त्यांच्या भूमिकेत मोठा बदल दिसून आला.

किंग चार्ल्स व प्रिन्स हॅरी यांची मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात लंडनच्या क्लॅरेन्स हाऊसमध्ये भेट झाली होती. तिथे त्यांनी सुमारे ५० मिनिटे खासगीत चर्चा केली. मात्र, या दौऱ्यात हॅरी यांची त्यांचे मोठे बंधु प्रिन्स विल्यम यांच्याशी भेट झाली नाही. हॅरी यांनी मेगनसोबतच्या त्यांच्या नात्यावर सहा भागांची नेटफ्लिक्स मालिका तयार केली आहे. त्यात त्यांनी मोठे बंधु विल्यमशी असलेल्या मतभेदांचे सविस्तर वर्णन केले आहे.

‘यूएसए टुडे’शी बोलताना ब्रिटनमधील पत्रकार मॅकडिमॉर्ट म्हणाले, “चार्ल्स यांना एक पिता म्हणून आपल्या मुलाशी सलोखा साधायला नक्कीच आवडेल आणि हॅरीलाही आपल्या वडिलांच्या जवळ जाण्याची इच्छा आहे. पण या दोघांच्यामध्ये प्रिन्स विल्यमचे मत अडथळा ठरू शकते.” मॅकडिमॉर्ट पुढे म्हणाले, जर हॅरी राजघराण्याच्या प्रोटोकॉलबाहेर जाऊन गोष्टी करत असतील, तर ते अडचणीचे ठरते. प्रिन्स विल्यमला एक सुव्यवस्थित राजेशाही हवी आहे, जिथे सर्व काही शिस्तीत असेल. तरीही, त्यांनी असा अंदाज वर्तवला की भविष्यात राजघराण्याला हॅरी आणि मेगनची गरज भासेल, त्यामुळे त्यांचे पुनर्मिलन नक्कीच होईल. ‘पीपल’ मासिकाच्या लेखानुसार, जुलै २०२६ मध्ये जेव्हा हॅरी ‘इन्व्हिक्टस गेम्स’शी (Invictus Games) संबंधित कार्यक्रमांसाठी यूकेला परततील, तेव्हा चार्ल्स आणि हॅरी यांची भेट होऊ शकते. मात्र, या ट्रिपमध्ये डचेस ऑफ ससेक्स मेगन आणि त्यांची मुले त्यांच्यासोबत असतील की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.