लंडन येथून शिकागोकडे जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात सोमवारी थरकाप उडवणारी घटना घडली. शेकडो प्रवाशांना घेऊन निघालेले हे विमान अवघ्या १० मिनिटांतच ३७ हजार फूट उंचीवरून थेट २८ हजार फुटांपर्यंत खाली आले. त्याचवेळी विमानात आपत्कालीन परिस्थिती दर्शवणारा कोड जारी केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. सुदैवाने दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सरते शेवटी हे विमान निम्म्या रस्त्यातून पुन्हा इंग्लंडला परतल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. या पार्श्वभूमीवर विमान हजारो फूट उंचीवर असताना अचानक खाली का आले?या घटनेला कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली? तसेच, विमानाच्या अशा अचानक घसरगुंडीचा प्रवाशांच्या शरीरावर काय परिणाम होतो? त्याविषयीचा हा आढावा…

ब्रिटिश एअरवेजच्या विमानात नेमके काय घडले?

जागतिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:५० वाजता या विमानाने लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून शिकागोच्या दिशेने उड्डाण भरले होते. पुढच्या काही मिनिटांतच विमानाने आकाशात ३७,००० फुटांची सुरक्षित उंची गाठली होती. मात्र, प्रवासाला एक तास उलटल्यानंतर हे विमान अचानक खाली येण्यास सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांत विमान ३७,००० फुटांवरून थेट ९,००० फुटांपर्यंत खाली आले. अचानक झालेल्या या घसरणीनंतर वैमानिकाने तातडीने सामान्य आणीबाणीचा संकेत देणारा ‘Squawk 7700’ हा आंतरराष्ट्रीय कोड जारी केला. त्यानंतर विमानाने सुमारे चार तास ब्रिस्टल चॅनेलच्या परिसरात फेऱ्या मारल्या आणि त्यानंतर स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५ वाजल्यानंतर ते हिथ्रो विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या घटनेबाबत ब्रिटिश एअरवेजने तातडीने निवेदन जारी केले. हजारो फूट उंचीवर असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र, दोन्ही प्रशिक्षित वैमानिकांनी तत्परता दाखवत विमानावर नियंत्रण मिळवून सुरक्षितपणे लँडिग केले. प्रवाशांना नेहमीच्या पद्धतीने विमानातून उतरवण्यात आले असून, त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

प्रवाशांनी सांगितला हवेतील थरार

या विमानातून प्रवास करणारे प्रवासी टॉम निकोल्स यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, विमानाची उंची कमी होत होती, पण ते इतक्या प्रचंड वेगाने खाली येत असल्याचे आम्हाला जाणवले नाही. वैमानिकांनी परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. काही क्षणातच ऑक्सिजन मास्क खाली आल्यामुळे विमानात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. माझ्या पुढच्या सीटवरील एका जोडप्याला ऑक्सिजन मास्क मिळत नव्हता. त्यांनी दुसरी जागा शोधून तेथील मास्क घेईपर्यंत कॅप्टनने विमान १० हजार फुटांपेक्षा कमी उंचीवर असल्याची घोषणा केली. त्यामुळे ऑक्सिजन मास्कची आवश्यकता राहिली नाही. दुसरीकडे- याच विमानात प्रवास करणाऱ्या गौरी जयराम या भारतीय महिलेने ‘WGN-TV’ शी बोलताना आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की, आम्ही वेगाने खाली जात होतो आणि ते स्पष्ट जाणवतही होते. विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी जसे खाली येते, अगदी तसेच ते खाली जात होते. काही क्षणात विमानात अलार्म वाजायला लागले आणि समोर ऑक्सिजन मास्क लटकू लागले. मी खूप प्रवास करते; पण अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. विमानातील ऑक्सिजन मास्क प्रत्यक्ष लटकताना मी पहिल्यांदाच पाहिले. एरवी ते फक्त सुरक्षेच्या प्रात्यक्षिकांमध्येच पाहायला मिळतात.

विमान अचानक खाली येण्यामागचे कारण काय?

ब्रिटिश एअरवेजने या घटनेमागे तांत्रिक समस्येचे कारण दिले असले तरी विमान इतक्या वेगाने खाली येण्याचे नेमके कारण काय असावे, याबाबत जगभरात तर्कवितर्क लावले जात आहेत. विमान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या मते, विमानाच्या हवेच्या दाबात झालेली अचानक घट हेच यामागील मुख्य कारण असण्याची दाट शक्यता आहे. नैरोबीस्थित विमान तंत्रज्ञ टर्बाइन ट्रॅव्हलर यांनी या घटनेनंतर आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या मते, विमानाने घेतलेली घसरण ही बोईंगच्या केबिन प्रेशर कमी झाल्यास अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रियेशी जुळणारी होती. ब्रिटिश एअरवेजचे माजी वैमानिक अलिस्टर रोझेनशाइन यांनीही स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विमानाच्या हालचालींवरून ही केबिन प्रेशरची समस्या असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांच्या मते, याच कारणामुळे विमान अचानक खाली आले असावे. केबिनमधील हवेचा दाब अचानक कमी होणे ही आपत्कालीन परिस्थिती असते. कारण वैमानिक, केबिन क्रू आणि प्रवाशांसाठी उपलब्ध ऑक्सिजनचे प्रमाण मर्यादित असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विमानाने हवेत चार तास आकाशात का घातल्या?

यादरम्यान काही जाणकारांनी विमानाने लँडिगपूर्वी जवळपास चार तास आकाशात घातलेल्या घिरट्यांकडे लक्ष वेधले. शिकागोसाठी निघालेल्या या विमानात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पूर्ण क्षमतेने इंधन भरलेले होते. त्यामुळे परत लंडन विमानतळावर लँडिग करण्यासाठी वैमानिकाला त्यातील वजन कमी करणे गरजेचे होते. याच कारणामुळे विमानाने कमाल लँडिंग वजन मर्यादेत आणण्यासाठी हवेतच घिरट्या घातल्या असाव्यात, असे एका माजी वैमानिकाने स्काय न्यूजला सांगितले. मात्र, ब्रिटिश एअरवेजने या तांत्रिक समस्येचे नेमके स्वरूप तसेच केबिन प्रेशरमधील बिघाडाबाबत अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे तज्ज्ञांकडून केले जाणारे हे दावे फक्त अंदाजावरच आधारित आहेत.

अशा घटनेचा प्रवाशांच्या शरीरावर काय परिणाम होतो?

तज्ज्ञांच्या मते, विमान अचानक हजारो फूट खाली आल्यास त्याचा प्रवाशांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा थरारक प्रसंगाचा सामना करणाऱ्या अनेक प्रवाशांनी अचानक आपले शरीर हवेत तरंगल्याचे सांगितले आहे. तसेच विमानातून प्रवास करताना सीट बेल्ट लावूनच ठेवायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. विमानाचे उड्डाण भरण्याआधी प्रवाशांना सीट बेल्ट लावणे अनिवार्य असते. काही वेळानंतर विमान आकाशात स्थिर झाल्यानंतर क्रूर मेबर्सकडून प्रवाशांना सीट बेल्ट काढण्याची सवलत दिली जाते; पण शक्यतो संपूर्ण प्रवासादरम्यान सीट बेल्ट लावूनच ठेवायला हवा. कारण कधीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे एका प्रवाशाने सांगितले. विमान अचानक खाली आल्यानंतर त्यातील मोकळ्या वस्तू तसेच प्रवाशांच्या बॅगा हवेत उसळतात. त्यामुळे अनेकांना गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो. त्याचवेळी सीटबेल्ट न बांधलेली व्यक्ती अशा तीव्र झटक्यामुळे थेट विमानाच्या छतावर, समोरच्या सीटवर किंवा शेजारच्या प्रवाशावर जाऊन आदळू शकते. सीटबेल्ट प्रवाशाला जागीच घट्ट धरून ठेवत असल्यामुळे विमानाची अचानक हालचाल झाल्यास संबंधित व्यक्ती आपल्या जागेवरून फेकली जात नाही.

प्रवाशांच्या कानावर पडू शकतो प्रचंड दाब

विमान वेगवेगळ्या हवेच्या थरांमधून जात असताना कानांवर हवेच्या दाबातील बदलाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कान ‘पॉप’ झाल्यासारखे वाटणे किंवा काही काळ अस्वस्थता वाटू शकते. मात्र, आधुनिक विमानांमध्ये केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा असतात. त्यामुळे अशा परिणामांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. विशेष म्हणजे अवघ्या आठवड्याभरापूर्वीच दुबई येथून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईचे विमानही अचानक १७,००० फुटापर्यंत खाली आले होते. दोन्ही वैमानिकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे ही घटना घडली होती. मात्र, भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी या विमानाचे सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग केले होते. या घटनेनंतर आता ब्रिटीश एअरवेजचे विमानही अचानक हजारो फूट उंचीवरून खाली आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.