Virginity Testing of Immigrant Women at Heathrow: कुठल्याही नवीन लग्न झालेल्या किंवा लग्न होवू घातलेल्या मुलीच्या अपेक्षा सुखी संसार, प्रेमळ जोडीदार असावा अशाच असतात. ४७ वर्षांपूर्वी भारतातून ब्रिटनसारख्या देशात संसार थाटायला जाणार्‍या वधूंची हीच स्वप्नं होती. हे खरं असलं तरी ४७ वर्षांपूर्वी भारतातून तसेच आशिया खंडातून ब्रिटनसारख्या देशात आपल्या जोडीदाराला साथ द्यायला गेलेल्या अनेक नवविवाहित वधूंच्या प्रवासाची सुरुवात मनाला चटका लावणारी किंवा ..स्त्रीत्त्वाचे वाभाडे काढणारी होती. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांच्या सीमा भिन्न असल्या तरी सामाजिक स्तरावर कुटुंबव्यवस्था, संस्कार यात मात्र समानता आढळते. त्यामुळे विवाह व्यवस्थेला आणि त्या अनुषंगाने आलेल्या संस्कार, प्रथा- परंपरांना या देशांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे पतीशिवाय एखाद्या परपुरुषाने संमतीशिवाय गुप्तांगाला केलेला स्पर्श. हाच स्पर्श ५० वर्षांपूर्वी ब्रिटनच्या विमानतळावर कौमार्य सिद्ध करण्यासाठी केला गेला होता. प्रसंग विदारक असला तरी ते कटू सत्य आहे. यामुळे अनेक महिलांच्या मनावर कायमचा ओरखडा उमटला.

…अखेर अन्यायाला वाचा फुटली!

कौमार्य चाचणी म्हणजेच एखादी स्त्री कुमारिका आहे की, नाही याची केलेली पडताळणी. दक्षिण आशियाई महिलांची हीच पडताळणी १९७० च्या दशकातील ब्रिटनमध्ये करण्यात आली होती. आजही हे सत्य मानवी हक्क, वंशवाद आणि लैंगिक भेदभाव यांसारख्या प्रश्नांच्या दाहकतेकडे लक्ष वेधून घेते. ‘द गार्डियन’च्या पत्रकार मेलानी फिलिप्स यांनी आपल्या लेखातून पहिल्यांदा या अन्यायाला वाचा फोडली. १ फेब्रुवारी १९७९ रोजी ‘द गार्डियन’मध्ये त्यांचा ब्रिटिश इमिग्रेशन व्यवस्थेत खोलवर रुजलेल्या वसाहतवादी आणि वंशवादी मानसिकतेचे भयाण सत्य उघड करणारा लेख प्रकाशित झाला, त्यांना साथ लाभली ती एका भारतीय महिलेची. तिच्याच व्यथेने ब्रिटनच्या विमानतळावर आशियाई स्त्रियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली.

तीचं वय ३५ …कौमार्यावरचं प्रश्नचिन्ह

मेलानी यांच्या लेखातील भारतीय महिला २४ जानेवारी १९७९ रोजी ब्रिटनच्या विमानतळावर पहिल्यांदाच उतरली. ज्या भारतीय वंशाच्या पुरुषाशी तिचा साखरपुडा झाला होता, त्याच्याबरोबच्या सुखी संसाराची स्वप्न ती उराशी बाळगून आली होती. तीच वय ३५ होतं, हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. तिच्या अधिक वयामुळे तिच्या कौमार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

ब्रिटन इमिग्रेशन अ‍ॅक्ट, १९७१

ब्रिटनच्या १९७१ च्या इमिग्रेशन अ‍ॅक्टनुसार पत्नी, मुले आणि लग्न ठरलेल्या महिला जोडीदाराला ब्रिटनमध्ये येण्याची मुभा होती. या कायद्याअंतर्गत साखरपुडा झालेल्या महिलांना व्हिसाशिवाय ब्रिटनमध्ये प्रवेश मिळत असे. मात्र आगमनानंतर तीन महिन्यांच्या आत विवाह करणं बंधनकारक होतं.

कौमार्य चाचणी पुरुष डॉक्टरनेच केली

ब्रिटन इमिग्रेशन अ‍ॅक्ट, १९७१ असा कायदा असला तरी मेलानी यांच्या लेखातील भारतीय महिलेच्या वयामुळे विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तिच्या कौमार्याविषयी शंका आली. आता तिचं कौमार्य आणि इमिग्रेशन यांचा काय संबंध हा प्रश्न साहजिकच पडू शकतो. फिलिप्स यांच्या लेखातील ही महिला व्हिसाशिवाय ब्रिटनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी साखरपुडा झाल्याचे खोटं सांगत आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. तिचं वय जास्त आहे, त्यामुळे ती खरंच होऊ घातलेली वधू आहे का, हे तपासण्यासाठी विमानतळावरच इमिग्रेशन अधिकाऱ्याने तिची गायनॅकोलॉजिकल तपासणी करण्याचा आग्रह धरला.

The Guardian
द गार्डियन

सर्व कपडे काढण्यास सांगितले…

त्या महिलेने आपल्या अनुभवात म्हटले आहे की, देशाबाहेर हाकलले जाण्याची भीती आणि ब्रिटनच्या इमिग्रेशन नियमांविषयी असलेली अपुरी माहिती यामुळे ती या प्रकाराला बळी पडली. प्रत्यक्ष तपासणीदरम्यान तिला सर्व कपडे काढण्यास सांगण्यात आले. इतकंच नाही तर तिच्या ड्रेसिंग गाऊनच्या विनंतीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. तिची कौमार्य चाचणी ड्युटीवर असलेल्या एका पुरुष डॉक्टरनेच केली. डॉक्टरने तिला सांगितले की “ती याआधी गर्भवती होती का नाही, हे तो तपासात आहे.

टू फिंगर टेस्ट

त्या महिलेने पुढे सांगितलं की, तो हे काहीही न करता (टू फिंगर टेस्ट: या पद्धतीत तपासणी करणारा डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी स्त्रीच्या योनीमध्ये दोन बोटे घालून योनी सैल आहे का, हायमेन पडदा आहे का, बोटे सहज आत जातात का यावरून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत असतं) पाहू शकत होता. तरीही त्याने लाजण्याची काही गरज नाही, असं म्हणत तपासणी सुरूच ठेवली. चाचणीत ती कुमारिका असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच तिला ब्रिटनमध्ये प्रवेश देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीव्र जनआक्रोश

फिलिप्स यांच्या लेखानंतर देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीव्र जनआक्रोश उसळला. हीथ्रो विमानतळावर निदर्शने झाली, तर भारतीय संसदेत या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. सुरुवातीला ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने अशा कौमार्य चाचण्या इमिग्रेशन धोरणाचा भाग असल्याचं ठामपणे नाकारलं. मात्र द गार्डियनमध्ये फिलिप्स यांचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. ही अपमानास्पद प्रथा केवळ ब्रिटनपुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण दक्षिण आशियात ब्रिटिश उच्चायुक्तांमार्फत ती राबवली जात होती.

फक्त ३४ नाही, तर १४३ महिला होत्या

या अमानवी प्रथेची अधिकृत कबुली माजी राज्यमंत्री Alex Lyon यांनी दिली. ते म्हणाले, “१९७४ ते १९७६ या काळात ढाका येथे अशा स्त्रीरोग तपासण्या करण्यात आल्याची माहिती मला होती.” पत्नी किंवा साखरपुडा झाला आहे हे तपासण्यासाठी ही पद्धत नियमितपणे वापरली जात असल्याचंही त्यांनी स्वीकारलं. ही बाब पुढे ब्रिटनच्या संसदेत, म्हणजेच House of Commons मध्ये अधिक ठळकपणे समोर आली. नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तां कार्यालयामध्ये किमान ३४ प्रकरणांमध्ये कौमार्य चाचण्या करण्यात आल्या होत्या. ही संख्या सरकारी पातळीवर पहिल्यांदाच नोंदवली जात होती. मात्र हा आकडा अंतिम नव्हता. २०१० च्या दशकाच्या सुरुवातीला हे चित्र अधिक स्पष्ट झालं. संशोधक Evan Smith आणि Marinella Marmo यांनी The National Archives मधील Home Office च्या अधिकृत नोंदींचा अभ्यास केला. त्यांच्या Race, Gender and the Body in British Immigration Control (2014) या संशोधनग्रंथात त्यांनी स्पष्ट केलं की १९८० च्या दशकापर्यंत Foreign and Commonwealth Office कडेही कौमार्य चाचण्यांच्या अनेक अतिरिक्त घटनांची नोंद होती. या संशोधनानुसार, अशा चाचण्यांची एकूण संख्या १२३ ते १४३ दरम्यान होती.

शारीरिकच नव्हे… तर मानसिक आघात

ब्रिटनमध्ये प्रवेशाचा हक्क ठरवण्यासाठी अशा प्रकारे चाचणी घेऊन एखाद्या महिलेच्या लैंगिक इतिहासाचा वैध पुरावा म्हणून वापर केला जाणे हे मानवी हक्कांचं उघड उल्लंघन होतं. या प्रक्रियेमुळे महिलांना केवळ शारीरिकच नव्हे, तर खोल मानसिक आघात सहन करावे लागले. बहुतांश महिलांसाठी हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच परदेश प्रवास होता, तोही एकट्याने. मात्र हा प्रवास सुरक्षित आणि सुलभ करण्याऐवजी, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर आक्रमक, अपमानास्पद आणि अनावश्यक अंतर्गत वैद्यकीय तपासण्या लादल्या. “त्या घटनेनंतर माझी मानसिक अवस्था पूर्णपणे ढासळली. मला प्रचंड लाज वाटली, मी फार अस्वस्थ झाले. याआधी माझी कधीही स्त्रीरोग तपासणी झाली नव्हती,” असे त्या महिलेने सांगितले. तिच्या या शब्दांतून त्या अनुभवाने दिलेल्या मानसिक जखमेची तीव्रता स्पष्टपणे जाणवते.

वसाहतवादी, लैंगिक भेदभाव आणि वंशवादी दृष्टिकोन

कौमार्य चाचण्यांची ही प्रथा १९७० च्या दशकातील ब्रिटनमध्ये खोलवर रुजलेल्या वसाहतवादी, लैंगिक भेदभावपूर्ण आणि वंशवादी दृष्टिकोनाचे विदारक दर्शन घडवते. १९७९ साली मार्च महिन्यात प्रकाशित झालेल्या फॉरेन अँड कॉमनवेल्थ ऑफिसचे सल्लागार डेव्हिड स्टीफन यांच्या अहवालात असे नमूद करण्यात आले होते की, “भारतीय उपखंडातील अविवाहित महिला कुमारिका असते, हा वाजवी समज असल्यामुळे साखरपुडा झालेल्या महिलांवर अशा कौमार्य चाचण्या करण्यात येत होत्या.

Heathrow (wikimedia)

या भूमिकेमधून सरकारी धोरणांमध्ये दक्षिण आशियाई महिलांकडे पाहण्याचा जुना वसाहतवादी दृष्टिकोन स्पष्टपणे प्रतिबिंबित होतो. याच काळात ब्रिटनमध्ये लैंगिक क्रांती सुरू होती. परंतु, दक्षिण आशियाई महिलांबाबत मात्र “सर्वच महिला विवाहापूर्वी कुमारिका असतात” या ठोकताळ्यावर आधारित अमानवी चाचण्यांचे समर्थन सरकारकडून केले जात होते. या कौमार्य चाचण्यांच्या प्रथेबाबत सरकारने दिलेला नकार, आणि आजवर माफी न मागण्याची भूमिका यामुळे ब्रिटनच्या राजकीय उच्चभ्रू वर्गाने स्वीकारलेल्या वंशवादी मानसिकतेचे तसेच ब्रिटिश साम्राज्यवादी पायावर उभ्या असलेल्या एकतेच्या पोकळ घोषणांचे ते ठळक पुरावे ठरतात, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे.

Reference

  • Melanie Phillips, ‘Virginity Tests on Immigrant Women’, The Guardian, 1 February 1979.
  • The Guardian Archive, reports and follow-up coverage on immigration virginity tests, February-March 1979.
  • Smith, Evan and Marinella Marmo, Race, Gender and the Body in British Immigration Control (Basingstoke: Palgrave Macmillan, 2014).