रशिया-युक्रेन युद्ध अजूनही थांबलेले नाही. मोठ्या प्रमाणात सैन्य आणि शस्त्रसाठा असूनही रशियाला युक्रेनवर अद्याप पूर्णपणे ताबा मिळवता आलेला नाही. या संघर्षात युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, मात्र तरीदेखील आत्मरक्षेत या देशाने मोठे यश मिळवले आहे. देशातील सामान्य नागरिकही मागे नाहीत, युक्रेनमधील महिलांनीदेखील शस्त्र हातात घेतले असून या महिला रक्षणकर्त्या ठरत आहेत. युक्रेनमधील बुचामध्ये राजधानी कीवपेक्षाही जास्त हल्ले करण्यात आले आहेत.

मार्च २०२२ मध्ये बुचावर मॉस्कोने ताबा मिळवल्यानंतर रशियन युद्ध गुन्ह्यांचे प्रतीक ठरलेल्या या शहरात आता ‘बुचा विचेस’ म्हणून ओळखला जाणारा महिलांचा एक गट तयार करण्यात आला आहे. या गटातील महिलांपैकी अनेकांचे युद्धात वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांनी एकत्र येऊन युक्रेनच्या पहिल्या महिला हवाई संरक्षण युनिटची स्थापना केली आहे. त्यांच्याकडे रशियन ड्रोन पाडण्याची आणि त्यांच्या मातृभूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. कोण आहेत ‘बुचा विचेस’? हा गट कसा तयार झाला आणि या महिलांना कोणते प्रशिक्षण दिले जाते? त्याविषयी जाणून घेऊ.

युक्रेनच्या पहिल्या महिला हवाई संरक्षण युनिटची स्थापना करण्यात आली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?

‘बुचा विचेस’ कोण आहेत?

रशियाचे युक्रेनवरील आक्रमण दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात मोठा संघर्ष म्हणून पाहिला जातोय. बुचा हे रशियन क्रूरतेसाठीचे सर्वात जुने ठिकाण आहे. रशियन सैन्यानी ३३ दिवसांच्या संघर्षादरम्यान बुचा येथील पुरुष, स्त्रिया आणि मुलांसह ४५० हून अधिक नागरिकांना ठार मारले. तेथील हजारो लोकांवर अत्याचार, बलात्कार आणि दरोडा टाकण्यात आला. त्यानंतर बुचा रहिवाशांना त्यांच्या लोकांच्या मृत शरीराचे तुकडे उचलण्यास सांगण्यात आले. बुचातील अनेकांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरसारखा त्रास सहन करावा लागत आहे. या विध्वंसाच्या दरम्यान मोठ्या संख्येने महिला पुढे सरसावल्या आहेत, त्यांनी स्वयंसेवक हवाई संरक्षण युनिट तयार केले आहे; ज्याला आता ‘विचेस ऑफ बुचा’ म्हणून ओळखले जाते.

१९ ते ६४ वर्षे वयोगटातील महिलांचा समावेश असलेल्या या स्वयंसेवक महिलांनी एक अनोखे मिशन स्वीकारले आहे. रशियन ड्रोन, विशेषतः युक्रेनियन पायाभूत सुविधांना लक्ष्य करणारे इराण निर्मित शाहेद आणि रशियन गेरान ड्रोन यांना पाडण्याचे काम या महिला करत आहेत. स्त्रिया व्यवसायाने सैनिक नाहीत, परंतु त्यांनी आपल्या समुदायाचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतली आहे. तीन मुलांची आई असलेली व्हॅलेंटीना युनिटच्या प्रमुख सदस्यांपैकी एक आहे. तिने ‘अल जझीरा’ला सांगितले, “माझ्या आईला मी इथे आले यांचा आनंद झाला. मला इथे नवीन मित्र, सहकारी, भाऊ आणि बहिणी मिळाल्या आहेत. आम्ही सर्वांना एकसमान मानतो, आमचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे विजय मिळवणे.”

१९ ते ६४ वर्षे वयोगटातील महिलांचा समावेश असलेल्या या स्वयंसेवक महिलांनी एक अनोखे मिशन स्वीकारले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

या महिलांना कोणते प्रशिक्षण दिले जाते?

महिलांना देण्यात येणारे प्रशिक्षण खूपच कठोर असते. मॉर्डोर नावाच्या गुप्त ठिकाणी त्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांचे प्रशिक्षक पुरुष असतात, अनेकदा ते या महिलांवर ओरडतात आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत करण्यासाठी अपशब्दही 5वापरतात. प्रशिक्षणात कठोरपणा असूनही महिला ड्रोन पाडण्यासाठी आवश्यक कौशल्ये पारंगत करण्याचा निर्धार करतात. “जेव्हा तुम्ही गणवेश घालता तेव्हा तुम्ही स्त्री किंवा पुरुष नसता, तुम्ही संरक्षक असता,” असे त्यांचे कमांडर कर्नल अँड्री व्हर्लाटी स्पष्ट करतात. ते सांगतात की, अनेक स्त्रिया त्यांची लष्करी कर्तव्ये पार पाडण्यात पुरुषांपेक्षा जास्त सक्षम आहेत. महिला जुन्या मॅक्सिम M1910 मशीन गन चलविण्याचे प्रशिक्षण घेतात, याद्वारे त्यांना पूर्वीच्या ताशी १५० किलोमीटर वेगाने उडणारे ड्रोन खाली पाडण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ५० किलोग्राम स्फोटकांनी भरलेले हे ड्रोन धोकादायक आणि नष्ट करणे कठीण असते, अनेकदा ड्रोन झुंडीत उडतात.

युक्रेनियन सैन्यात महिलांचा सहभाग

रशियन आक्रमणानंतर युक्रेनच्या सैन्यात महिलांचा सहभाग वाढला आहे, सध्या सुमारे ६५ हजार महिला सैन्यात सेवा देत आहेत; ज्यात चार हजार महिला युद्धात सहभागी आहेत. ‘बुचा विचेस’ त्याचाच एक भाग आहेत. यापैकी अनेक स्त्रिया केवळ संरक्षकच नाहीत तर इतरही सर्व जबाबदऱ्या पार पाडत आहेत. कीवमधील आर्ट गॅलरी मालक कॅटेरीना म्हणाल्या, “मी सैन्यात सामील होण्यापूर्वी काळजीत होते. मी यापूर्वी कधीही बंदुकीला हात लावला नाही.” या युनिटमध्ये सामील होणे पूर्णपणे ऐच्छिक आहे, सदस्यांना त्यांच्या कामासाठी कोणताही पगार मिळत नाही. त्यांना याची प्रेरणा त्यांच्या घरांचे आणि प्रियजनांच्या रक्षणाच्या उद्देशातून मिळाली आहे.

महिलांना देण्यात येणारे प्रशिक्षण खूपच कठोर असते. मॉर्डोर नावाच्या गुप्त ठिकाणी त्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘बुचा विचेस’मध्ये सामील होण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली?

बऱ्याच स्त्रियांसाठी या युनिटमध्ये सामील होणे म्हणजे मानसिक तणाव दूर होण्यासारखे आणि आत्मविश्वास जागवण्यासारखे आहे. या महिलांनी प्रत्येकाचे अनुभव सांगितले. या सदस्यांपैकी एक व्हॅलेंटीना यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब मृत्यूपासून थोडक्यात बचावले; ज्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. तिने सांगितले, तिला एक भयानक क्षण आठवतो, जेव्हा रशियन सैनिकांनी तिची कार थांबवली आणि तिच्या मुलाच्या डोक्यावर बंदूक ताणली. “हा माझ्यासाठी एक मोठा धक्का होता,” ती सांगते की, या आठवणीमुळेच तिला ‘बुचा विचेस’मध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळाली. हे महिलांसाठी शारीरिक आणि भावनिक सशक्तीकरणाचे स्रोत ठरत असल्याचेही तिने सांगितले. युनिटची देखरेख करणारे कर्नल व्हर्लाटीही महिलांच्या वचनबद्धता पाहून प्रभावित झाले आहेत.

हेही वाचा : New Covid XEC Variant : जगभरात वेगाने पसरतोय करोनाचा नवा विषाणू; हा विषाणू किती संसर्गजन्य अन् किती घातक?

‘बुचा विचेस’ रशियन ड्रोनला युक्रेनवर लक्ष्य करण्यापासून रोखत आहेत. धैर्याला कोणतेही लिंग नसते, हे सिद्ध करत आहेत. काही महिलांनी तर युक्रेनियन सशस्त्र दलांशी करार केला आहे, ज्यात एक महिला ‘फायर सपोर्ट प्लाटून कमांडर’ झाली आहे. तिच्या वाहनाच्या वेगामुळे तिला ‘फास्ट अँड फ्युरियस’ असे नाव दिले आहे. बुचाच्या महिला युक्रेनच्या संरक्षण दलातील महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या चळवळीचा भाग आहेत. व्हॅलेंटिना म्हणते, “हे युद्ध आमच्याशिवाय संपणार नाही. आपण शस्त्र उचलू शकतो आणि आपल्या भूमीचे, आपल्या समाजाचे रक्षण करू शकतो,” असे तिचे म्हणणे आहे.