Dr. Babasaheb Ambedkar on Hindu Women: २१ व्या शतकातील प्रगत भारतीय स्त्रीच्या आत्मसन्मानाचा प्रवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहे. परंतु, भारतीय स्त्रीच्या अवनतीचे खापर चुकीच्या पद्धतीने गौतम बुद्धांवर फोडण्याचे प्रयत्न काही हितसंबंधी गटांनी त्या कालखंडात केले. या आरोपांचे खंडन बाबासाहेबांनी वैचारिक पद्धतीने केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि मनू यांच्या तौलनिक अभ्यासातून हिंदू स्त्रियांच्या अवनतीला कारणीभूत नेमकं कोण, याचा उहापोह केला होता, त्याचाच हा आढावा.
भारतीय स्त्रीच्या अवनतीला बुद्धाची शिकवण कारणीभूत?
भारतीय स्त्रीच्या अवनतीला बुद्धाची शिकवण कारणीभूत असल्याचा आरोप करणारा लेख ईव्हज विकलीच्या (Eve’s Weekly) २१ जानेवारी १९५० च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखात करण्यात आलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. गौतम बुद्धांवर होणार्या आरोपांचे खंडन बाबासाहेबांनी त्यांच्या ‘The Rise and fall of the Hindu Women : Who was responsible for?’ या लेखात केले आहे. हा लेख १९५१ साली महाबोधी नियतकालिकात (मे-जून द्वैमासिक अंकात) प्रसिद्ध झाला होता.
मूळांचा शोध घेणे आवश्यक
बाबासाहेब लिहितात, “बुद्धांवर टीका होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ज्यांना बुद्धांची महानता सहन होत नाही, असे स्वार्थी आणि प्रभावशाली लोक नेहमीच त्यांच्यावर आरोप करत आले आहेत. ‘ईव्हज विकली’च्या लेखकापेक्षाही हे लोक अधिक शक्तिशाली आहेत. त्यामुळे अशा आरोपांच्या मुळाशी जाऊन, हे आरोप वारंवार का केले जातात, याचा शोध घेणे आता आवश्यक आहे.”
गौतम बुद्धांवर कोणते दोन आरोप केले जातात?
- बुद्धांनी स्त्रियांपासून दूर राहण्याचा उपदेश केला.
- बौद्ध भिक्खुणींच्या संघाचे स्थान पुरुष संघाच्या अधीन होते किंवा त्यांना दुय्यम स्थान दिले जात होते.
१. बुद्धांनी स्त्रियांपासून दूर राहण्याचा उपदेश केला
ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसने प्रकाशित केलेल्या महापरिनिब्बाण सुत्ताच्या प्रकरण पाचमध्ये आनंदाने स्त्रियांशी वागताना आम्ही कसे वागावे? हा प्रश्न बुद्धांना विचारला आहे. त्यावर बुद्धांनी सांगितले स्त्रियांकडे बघू नये, बोलू नये, प्रसंगी सर्वोपरी जागरुक असावे. या प्रकारच्या संदर्भामुळे बुद्धावर स्त्री-पुरुषांमध्ये भेद केल्याचा आरोप होतो. म्हणूनच बाबासाहेबांनी या संदर्भाचे केलेले संशोधात्मक विश्लेषण महत्त्वाचे ठरते.
बाबासाहेबांनी मांडलेले तार्किक मुद्दे;
- सुत्तपिटकाची निर्मिती बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ४०० वर्षांनी झाली.
- ज्या संपादकांनी सुत्तपिठकाचे संकलन आणि संपादन केले ते भिक्खू होते आणि त्यांनी भिक्खूंसाठीच सुत्तपिठकाचे संकलन आणि संपादन केले होते.
- ब्रह्मचर्याचा नियम सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने हे संपादन झाले असावे, अशी शक्यता नाकारता येत नाही.
मग, हे बुध्दांचेच विचार आहेत, असे प्रतिपादन करणे किती योग्य हा प्रश्न बाबासाहेब इथे विचारतात.
सुत्तपिटकातील प्रस्तुत उतारा नंतरच्या काळात समाविष्ट करण्यात आला, हे दर्शवण्यासाठी बाबासाहेबांनी दोन संदर्भ दिले आहेत;
१. ऱ्हिस डेव्हिड्स यांच्या ‘दीघ्घ निकाय’ (भाग २, पान ७२) मधील प्रस्तावनेतील तक्त्याकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते; ती म्हणजे या सुत्तातील बराचसा भाग इतर सुत्तांमध्येही आढळून येतो. मात्र, प्रस्तुत उतारा इतर कोणत्याही सुत्तात सापडत नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सुत्ताचे चिनी भाषेतही भाषांतर झालेले आहे, असा संदर्भ डेव्हिड्स यांच्या ‘एस.बी.बी.’ (खंड २) मधील प्रस्तावनेत (पान ३७) मिळतो. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चिनी ग्रंथात हा विशिष्ट उतारा कुठेच सापडत नाही.
उल्लेख संशयास्पद
बाबासाहेबांनी एकूणच हा संदर्भ संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. बुद्ध आणि स्त्रियांचे संबंध (माता, भगिनी किंवा शिष्या म्हणून) नेहमीच अत्यंत आदराचे होते. आनंदाचा स्वभाव आणि बुद्धांची शिकवण पाहता, आनंदाने असा उथळ प्रश्न विचारला असण्याची शक्यता शून्य आहे किंवा आनंदाने असा प्रश्न विचारलाच असता, तर बुद्धांनी जे उत्तर (स्त्रियांपासून दूर राहण्याचे) दिले आहे, ते त्यांच्या मूळ स्वभावाशी विसंगती दर्शवणारे आहे. हे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी पुढील गाथेचा संदर्भ दिला आहे.
संदर्भांमधील विसंगती
महापरिनिब्बाण सुत्ताच्या इतर गाथांमध्ये बुद्ध म्हणतात, बंधुनो, संघातील भिक्खू, भिक्खूणी किंवा धम्मोपासक, धम्मोपासिका आनंदाला भेटल्यानंतर आणि आनंदाने त्यांना धम्म शिकविल्यानंतर ते प्रफुल्लित होत असत आणि बंधुनो, आनंद मौन असताना मात्र ते अस्वस्थ होत असत. या गाथेवरुन हे स्पष्ट होते की, आनंदाचे स्त्रियांशी भेटणे, इतकेच नव्हे तर ज्या धम्मोपासिका संघाच्या सदस्या नव्हत्या अशांनाही भेटणे ही नित्याची व सामान्य बाब होती. असे असताना आनंद वरील प्रश्न बुद्धाला विचारेलच का?
किंबहुना पहिल्या संगितीत (परिषदेत) आनंदाच्या विरोधात पाच तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यात ‘भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पार्थिवाला स्त्रियांना प्रथम वंदन करण्याची परवानगी देऊन त्यांच्या अश्रुमुळे भगवंताच्या पार्थिवाच्या झालेल्या विटंबनेस तो कारणीभूत आहे असाही आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच महापरिनिर्वाणापूर्वी बुद्धांनी दिलेल्या उपदेशाची अवहेलना आनंदाने केली असती का? हा प्रश्न बाबासाहेब इथे विचारतात.
वारांगनेच्या भोजनाचे निमंत्रण
येथे बाबसाहेबांनी विशाखा आणि आम्रपालीचे उदाहरण दिले आहे. विशाखा ही बुद्धांच्या प्रमुख ८० शिष्यांपैकी एक होती. शिवाय बुद्धांनी लिच्छवींचे आमंत्रण नाकारून वारांगना असलेल्या आम्रपालीचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारले होते. महाप्रजापती गौतमी पाचशे दानी-स्त्रियांबरोबर बुद्ध श्रावस्ती येथे वास्तव्यास असताना भेटायला गेली होती. पज्जुनाची सौंदर्यवती कन्या कोकानदा बुद्धांचे वास्तव्य वैशालीत असताना भेटायला गेली होती. प्रसेनजीताची पत्नी राणी मल्लिका बुद्धांकडून उपदेश घेण्यासाठी जात होती. जर बुद्धांनी आनंदाला दिलेला उपदेश खरा असेल तर तो त्यांनीही आचरणात आणला नसता का? असा प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केलेला आहे.
ब्रह्मचर्याचा नियम हेच कारण
गौतम बुद्धांवर दुसरा आरोप स्त्रियांना संघात घेण्यावरून केला जातो. त्यांनी स्त्रियांना संघात प्रवेश नाकारला होता हा प्रमुख आरोप आहे. यासंदर्भातही आनंदाने बुद्धांना विचारले होते. बुद्ध म्हणाले होते, तत्त्वज्ञान आणि शिकवण समजून घेण्यास स्त्रिया पूर्णत: समर्थ असून त्यांच्या परिव्रज्या घेण्याच्या मागणीला विरोध असण्याचे हे कारण नाही. बुद्ध ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करण्यासाठी अत्यंत जागरूक होते यात वाद नाही. भिक्खूंनी स्त्रीला माता, भगिनी आणि कन्येसमान समजावे, असा त्यांचा शिकस्ता होता. त्यामुळे त्यांच्या संघातील नियमविषयक दृष्टिकोन बहुतांशवेळा चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. म्हणूनच, स्त्रियांना संघात प्रवेश दिल्यानंतरही स्त्री-पुरुष असे दोन वेगळे संघ करण्यात आले. यामागे ब्रह्मचर्याचा नियम हेच कारण होते. स्त्रियांना कमी लेखण्याचा कोणताही हेतू नव्हता.
कन्या रत्न सद्गुणी
आजही भारतीय समाजात मुलीचा जन्म ही आनंदाची बाब मानली जात नाही. परंतु, बुद्धांनी कन्यारत्न सर्वश्रेष्ठ मानलं आहे. हे स्पष्ट करणारा एक दाखल बाबासाहेबांनी दिला आहे. बुद्ध श्रावस्तीतील जेतवनात असताना एकदा राजा प्रसेनजीतने बुद्धांची भेट घेतली. त्यावेळी राजप्रासादातून एक सेवक राणी मल्लिका हिने एका कन्येला जन्म दिला ही बातमी घेऊन आला. ही बातमी ऐकल्यावर राजाच्या चेहऱ्यावरील तेज मावळले, तो दु:खी आणि विषण्ण दिसायला लागला. त्याच्या चेहऱ्यात झालेला बदल बुद्धांच्या लक्षात आला आणि त्याला त्याचे कारण विचारले. त्याच्याकडून सारी हकीकत कळल्यावर बुद्ध म्हणाले “दुःख का करावे? हे राजपुरुषा, पुत्रापेक्षा कन्या अधिक चांगली अपत्य. ती ज्ञानी आणि सद्गुणी होऊ शकेल. ज्या पुत्राला ती जन्म देईल त्याच्या हातून महान कार्ये घडू शकतील, तो मोठमोठ्या राज्यांवर अधिसत्ता गाजवू शकेल.
बुद्ध क्रांतिकारी
बाबासाहेब म्हणतात, ब्राह्मणांनी स्त्रियांचा संन्यासी होण्याचा अधिकार नाकारला. याउलट बुद्धांनी स्त्रियांना संन्यास किंवा परिव्रज्या (भिक्खुणी) घेण्यास परवानगी दिली परंतु या क्रांतिकारक कार्याची दखल घेतली जात नाही. ब्राह्मणी तत्त्वज्ञानानुसार स्त्रियांना ज्ञानार्जन करण्याचा हक्क आधीच नाकारलेला आहे. मनू म्हणतो, स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांचे संस्कार वेदमंत्राविना करावे. स्त्रियांना धर्माचे ज्ञान नसते कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नाही. वेदमंत्राचे उच्चारण पापक्षालन करण्याकरिता उपयोगी आहे. स्त्रियां वेदमंत्र उच्चारु शकत नाही त्याअर्थी त्या असत्य (पापमय) आहेत.
परंतु, बाबासाहेबांनी मनूला विरोध केला तरी प्राचीन काळातील स्त्रियांचा उच्च दर्जा नाकारला नाही. हेच खऱ्या संशोधकाचे लक्षण आहे.
बाबासाहेब म्हणतात, अथर्व वेदानुसार हे स्पष्ट आहे की एकेकाळी स्त्री ‘ उपनयन ‘ या विधीला पात्र होती. श्रौत सुत्रानुसार हे स्पष्ट आहे की स्त्रियां वेदमंत्रोच्चार करू शकत होत्या आणि त्यांना वेद शिकविले जात होते. स्त्रियां गुरूकुलात (विद्यापीठात) जाऊन वेदांच्या विविध शाखांचा अभ्यास करून त्यांची मीमांसा करण्यात निष्णात होत्या. पाणिनीचा ‘ अष्टाध्याय ‘ हा या गोष्टीचा पुरावा आहे. स्त्रियां या शिक्षिका होत्या आणि त्यांनी विद्यार्थिनींना वेद शिकविले हे पतंजलीच्या महाभाष्यावरून दृष्टीसपथास येते.
स्त्रियां पुरुषांशी धर्म, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र इत्यादी गहन विषयावर चर्चा करीत होत्या अशा गोष्टींची वाण नाही. मनूपूर्व काळात भारतीय स्त्रियांनी ज्ञान आणि विद्वतेच्या जोरावर अत्युच्च शिखर गाठले होते, हे जनक आणि सुलभा, याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क्य आणि मैत्रयी यांच्यात झालेल्या जाहीर वादविवादाच्या गोष्टींवरून दिसून येते; एकेकाळी स्त्रियांचा मोठा आदर केला जात असे यात दुमत नाही. प्राचीन भारतात राजाच्या राज्यभिषेक प्रसंगी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या रत्नींमध्ये राणीचाही समावेश असे आणि इतरांप्रमाणेच तो राणीलाही नजराणा देत असे.’ निवडलेल्या या राजाने केवळ राणीचाच सन्मान केला नव्हता तर त्याने कनिष्ठ जातीतील इतर पत्नींचा सुद्धा सन्मान केला होता. तसेच राज्याभिषेकांच्या समारोहानंतर राजा प्रतिष्ठित स्त्रियांना वंदन करीत असे. स्त्रियांचा हा जगातील अत्युच्य दर्जा होय. असे असताना त्यांच्या अवनतीकरिता कोण जबाबदार आहे? हिंदुंचे कायदे करणारा ‘ मनू’ना? असा प्रश्न बाबासाहेब विचारतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीतील कायद्यांचे विश्लेषण करून मनूचा स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन कसा ‘अन्यायकारक’ आणि ‘स्त्री-विरोधी’ होता हे स्पष्ट केले आहे.
१. चारित्र्यावर शिंतोडे आणि अविश्वास
मनूने स्त्रियांना उपजतच चंचल, कामवासनेने भरलेल्या आणि पुरुषांना भ्रष्ट करणाऱ्या ठरवले. अगदी माता, भगिनी किंवा मुलगी असली तरी त्यांच्यासोबत पुरुषाने एकांतात राहू नये, असा नियम करून त्याने स्त्रियांवर अविश्वासाचा शिक्का मारला.
२. स्वातंत्र्यावर पूर्ण बंदी
स्त्री बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि वृद्धपणी मुलाच्या नियंत्रणात असावी; तिने कधीही स्वतंत्र राहू नये, असा मनूचा कायदा होता. साध्या घरगुती कामातही तिने स्वतःचे निर्णय घेऊ नयेत, तिला कायम कोणावर तरी अवलंबून ठेवावे.
३. लग्नाचे आणि घटस्फोटाचे दुटप्पी नियम
मनूने पुरुषाला पत्नीचा त्याग करण्याची, तिला विकण्याची आणि दुसरे लग्न करण्याची मुभा दिली. परंतु, पतीने पत्नीला विकले किंवा तिचा त्याग केला तरीही ती पत्नी पतीच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही, असा क्रूर नियम लादला. स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नाकारून त्यांना एकाच पुरुषाच्या दास्यात जखडून ठेवले.
४. आर्थिक आणि धार्मिक हक्क नाकारणे
पत्नीला तिची स्वतःची मालमत्ता ठेवण्याचा अधिकार नव्हता. तिने मिळवलेले धन पतीच्या मालकीचे मानले जाई. स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्यास आणि यज्ञ करण्यास मनूने मनाई केली. तिने केवळ पतीची पूजा करावी, हाच तिचा धर्म मानला.
५. संरक्षणाचा अभाव आणि शिक्षेची तरतूद
मनूने पतीला पत्नीवर हात उचलण्याचा (मारण्याचा) अधिकार दिला. सर्वात धक्कादायक म्हणजे, त्याने ‘स्त्री-हत्या’ हा एक क्षुल्लक गुन्हा मानला. यावरून मनूच्या नजरेत स्त्रीचे आयुष्य किती कवडीमोलाचे होते, हे स्पष्ट होते.
- मनूने निरिश्वरवादी सम्प्रदायात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना सामान्य व्यक्तिप्रमाणे देण्यात येणारे अंत्यसंस्कार नाकारले आहे. हा निरिश्वरवादी सम्प्रदाय म्हणजे बौद्ध धर्म होता यात कुठलीही शंका नाही, असे बाबासाहेब नमूद करतात.
बाबासाहेब म्हणतात, “मनू हा बौद्ध धर्माचा कट्टर विरोधक होता. स्त्रियांवर लादलेल्या अनेक अन्यायांचे हे मर्म आहे. त्याला हे माहीत होते की जर आपले घर बौद्ध तत्त्वज्ञानाच्या आक्रमणापासून सुरक्षित ठेवावयाचे असेल तर ती केवळ स्त्री आहे जिला बंधनात ठेवणे अत्यावश्यक आहे आणि ते त्याने केले. भारतीय स्त्रियांच्या अवनतीचा दोष बुद्धावर नसून तो संपूर्ण मनूवर येतो.
